Pages

Sunday, May 10, 2020

आई

"आई"

दहावी झाली आणि माझे घर सुटले. घर सोडतानाचे सारे प्रसंग काही आठवत नाहीत पण आईचे ‘भरले डोळे’ तेवढे आठवतात. ‘मुंबईतली कॉलेजे चांगली आणि बारावी केल्यावर प्रोफेशनल कॉलेजात शिकण्यासाठी जायचेच आहे तर दहावी नंतरच बाहेर जाणे चांगले’ या बाबांचे म्हणण्याला तिची मूक संमती होती किंबहुना ती गृहीत धरली गेली होती!

सहा भावंडात माझ्या आईचा तिसरा नंबर. तिला चार बहिणी आणि एक भाऊ.  वडील हेडमास्तर असल्याने सगळ्या बहिणींचे शिक्षिका बनणे साहजिकच होते. पण आई थोडीशी बंडखोर! मुंबई महापालिकेतील शिक्षिकेची नोकरी सोडून स्वतःच्या हिमतीवर नर्सिंग ला प्रवेश घेऊन शेवटच्या वर्षी पुणे विभागातील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी परिचारिका म्हणून मुख्यमंत्री पारितोषिक मिळवलेली. त्यानंतरची सारी वर्षे महाराष्ट शासनाच्या आरोग्य सेवेत सिंधुदुर्गासारख्या ग्रामिण भागात ठिकठिकाणी परिचारिका म्हणून खूप चांगले काम केलेली.

खरेतर डॉक्टर बनण्याची इच्छा असणाऱ्या आईला नर्सिंग वर समाधान बाळगावे लागले पण तिच्यातली शिकण्यातील जिज्ञासा कुणी रोखू नाही शकले. लहानपणी कपाटात ठेवलेली जाडजुड इंग्लिश मध्ये असलेली पुस्तके पाहून आईचा कोण अभिमान वाटायचा! ग्लॉसी पेपरवर भरपूर  ब्लॅक अँड व्हाईट  चित्रे असलेली फॉरेनच्या लेखकांची ती मेडिकलच्या विषयाशी संबंधित पुस्तके तिने खूप सांभाळून ठेवली होती आणि ती अधेमध्ये ती रेफर पण करायची. इंग्लिश वाचता न येण्याच्या वयात मी फक्त पाने उलटून त्यातील चित्रे पहात बसायचो!

शिस्तीची  भोक्ती असलेल्या आमच्या आईने घातलेले काही नियम एकदम काटेकोर पणे पाळणे अनिवार्य होते! संध्याकाळी बाहेरून आल्यावर हातपाय धुऊन शुभंकरोती म्हणून पूजा करणे आणि ती झाल्यावर तसेच देव्हाऱ्यासमोर उभे राहून एक ते तीस पाढे म्हणणे हा त्यापैकीचा एक नियम! त्याशिवाय जेवायलाच मिळत नसे! मी जिथे सहावीपर्यंत शिकलो ते तर एकदम खेडेगाव होते. तेथे मला गावातल्या मुलांबरोबर गावात जाऊन खेळण्यास परवानगी नव्हती. माझे मित्र घरी येऊन खेळू शकत होते किंवा हॉस्पिटल च्या आवारात खेळण्यास परवानगी होती! एकदा मी नजर चुकवून गावात खेळण्यास गेलो होतो आणि आईस जेव्हा हे कळले तेव्हा खूप माराचा प्रसाद मिळाला होता. कदाचित गावातल्या मुलांमध्ये मिसळून मी अभ्यासात दुर्लक्ष करेन अशी भीती तिला असावी. एकदा मी असाच कुठूनतरी मालवणी मधील एक शिवी शिकून तिचा प्रयोग आमच्याकडे घरकाम करणाऱ्या मावशींवर केला होता. तेव्हा मला असे काही बदडून काढले गेले होते की अजूनपर्यंत कुणालाही शिवी देण्यास जीभ रेटत नाही! इंजिनिअरिंग ला गेल्यावर  ‘कुणी कुणाला शिव्या देऊन कसे काय बोलवतात आणि ओ देणाऱ्याला त्या शिवीचे काहीच कसे वाटत नाही’ असा नॉन इंजिनिअरिंग प्रश्न मला सुरुवातीला खूप सतवायचा तो याच मुळे! मुद्दा हा की आईचा ‘छडी’ या गोष्टीवर फार विश्वास होता! छडी वापरायचा प्रसंग आला आहे की ती घराबाहेर जाऊन लिंगडीचीच्या झाडाची ‘शिरटी’ तोडून आणायची! मालवणी लोकांना ‘लिंगड’ काय असते आणि ‘लिंगडीची शिरटी’ काय कमाल करू शकते याची कल्पना असेल! त्याची धाक एवढी असायची की मी फावल्या वेळात घराच्या सभोवतालची लिंगडीची झाडी तोडून टाकत असे!!

स्वावलंबनाचे धडे आईने फार अगोदर पासून गिरवायला लावले आणि आमच्यासाठी त्यावेळी  ती गरजसुद्धा होती . बाबा फक्त आठवड्याच्या शेवटी गोव्याहून यायचे त्यामुळे आईलाच तिच्या फिरत्या (हॉस्पिटल च्या सब सेंटर ना भेटी देणे), हॉस्पिटलच्या ड्युट्या आणि आम्हाला सांभाळायचे असायचे. स्वतःचे कपडे स्वतः धुणे, विहिरीवरून पाणी आणणे, जेवण बनवणे, झाडलोट करणे, रेशन दुकानातून सामान आणणे, दळण दळून आणणे अशी कामे अगदी लहानपणापासून अंगवळणी पडतील हे तिने कटाक्षाने पाहिले त्यामुळे मुंबईला नातेवाईकांकडे रहाणे असो वा हॉस्टेल मधले वास्तव्य, कधी कुणावाचून अडले नाही. माझी बहिण पण स्वयंपाक एकदम सुंदर करते त्या याच सवयींमुळे. या लॉक डाऊन मध्ये पण घरची कामे करताना आपण  काहीतरी वेगळे करत आहोत ही भावनाच नसते. ही लाईफ स्किल्स अशीच सतत उपयोगात येतात म्हणून तर त्यांना लाईफ स्किल्स म्हणतात.

मराठी नाटकांची आईला खूप आवड. चित्रपटांपेक्षा नाटके तिला प्रिय आहेत. मी नोकरीनिमित्ताने मुंबईला आल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे तिचे येणे व्हायचे. नंतर बाबांच्या आजारपणा मुळे आणि तिलाही लांबचा प्रवास सतत करणे जमत नसल्यामुळे नंतर तिचे येणे कमी झाले. पण जेव्हा जेव्हा ती मुंबईत यायची तेव्हा तेव्हा आम्ही खूप सारी नाटके पहायचो. एकदा रविंद्र नाट्य मंदिर मध्ये होणाऱ्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा अख्खा पास आम्हाला मिळाला होता. आम्ही दोघांनी त्यातली बरीचशी नाटके पहिली. रीमा लागू, वंदना गुप्ते यांची ती विशेष चाहती. माझ्या गाण्यांच्या हौशीला देखील तीच कारणीभूत आहे. लहानपणी तिने आमच्यासाठी झोपवताना गायलेली-  ‘दैव जाणिले कुणी’, ‘लिंबोणीच्या झाडामागे’, ‘शर आला तो धावून आला काळ’, ‘देव जरी मज’ ही गाणी अजूनही कानात तशीच गुंजतात.

‘रुग्णांची शुश्रूषा’  हे जणू काही व्रत घेऊन देवाने तिला पाठविले आहे. नोकरी करत असताना तिने रुग्णसेवेला वाहून घेतले होते. ड्युटीवर नसताना सुद्धा ती किती तरी वेळ हॉस्पिटल मध्येच असायची. ती प्रसूतिगृहात किंवा ऑपरेशन साठी बरोबर  असेल तर डॉक्टर सुद्धा निर्धास्त असायचे. तिच्या वडिलांचे आजारपण, माझ्या आज्जी आजोबांचे आजारपण हे सगळे तिने एक मुलगी किंवा सून म्हणून तर सांभाळलेच पण एक परिचारिका म्हणून पण अधिकची काळजी तिने घेतली. आजोबा कित्येकदा आईच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असत त्यावेळची तिची धावपळ नजरेसमोर आहे. आज आईला निवृत्त होऊन जवळ जवळ सोळा वर्षे झाली. या सोळा वर्षात ती बाबांची सुश्रुषाच करतेय.

तीन वर्षांपूर्वी तिलाच हार्ट अटॅक आला होता त्यातून ती सावरली. “काहीही झाले तरी माझी बायपास करायची नाही” हे तिने सर्वांना निक्षून सांगितले. अंजिओग्राफी करण्यासाठी पण ती तयार नव्हती , कसे बसे मी तिला तयार केले. सुदैवाने अंजिओग्राफी मध्ये क्लॉट विरघळलेले दिसली. याचे सारे श्रेय खरेतर तिच्या अत्यंत साध्या जेवणाला दिले पाहिजे. दिवसभरात दोन चपात्या आणि अगदी थोडासा भात हा तिचा आहार गेली कित्येक वर्षे ती पाळतेय. चिकन मटण तर ती पहिल्यापासून नाही खात नंतर तिने मासे पण बंद केले. जगण्याविषयीचे तिचे विचार अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट आहेत. त्यात कुठलाही गुंता नाही. नानाविध प्रसंगातून गेल्यावर, सतत रुग्णसेवेत राहिल्यावर जो चिडचिडेपणा, निर्विकारपणा येतो तो तिच्यात आहे पण तरी देखील ती माझ्यासाठी ‘देवमाणूस’ आहे! आजच ती फोनवर कॉविड मुळे मुंबईतील बिघडणाऱ्या परिस्थितीमुळे आम्हा सगळ्यांची काळजी करत होती. फोन ठेवताना तिचे नेहमीचे “ काळजी घ्या बाबा” वाक्य नेहमी आशीर्वादासमानच भासते!

No comments: