Pages

Thursday, May 07, 2020

भंडारदरा भटकंती

दुपारी जेवण करून भंडारदऱ्याची भटकंती करायला बाहेर पडलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पावसाळ्यातील हिरवळ, उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगरकड्यावरून खाली येणारे ढग असे काही नजरेस पडणार नाही हे माहित असून सुद्धा माझी सुट्टी सुरु झाल्या झाल्या आम्ही येथे आलो ते थोडा निवांत वेळ शहराच्या धकाधकी पासून दूर घालवावा म्हणून.
शेंडी, मुरशेत, उदावणे,  घाटघर, सामराद, रतनवाडी, शेंडी असा वर्तुळाकार मार्ग चार तासात फिरलो. डावीकडे धरणाचा जलाशय, उजवीकडे उंच उंच डोंगराची शिखरे, अधून मधून विखुरलेली छोटी छोटी घरे सारा निसर्ग कसा मनात साठवून ठेवण्याजोगा. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधली विविधता मोहित करून टाकते. सातारा, कास, बामणोली चा परिसरा एवढाच भंडारदऱ्याचा परिसर भव्य वाटला. चहोबाजूने डोंगर कपाऱ्याने वेढलेलीे ही अगस्ती ऋषींची भूमी तेवढीच धीरगंभीर वाटलीे. पावसाळ्यात धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि पावला पावलावर डोंगरां वरून वेगाने खाली झेपावणारे पाणी आज दिसणारे रूप पालटून टाकत असणार याची खात्री आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्यानी काळ्या डोगराच्या पार्श्वभूमीवर आपत्या पांढऱ्या रंगाच्या सोडलेल्या खुणा पाणी कोसळत असल्याचा आभास निर्माण करतात. 
फोटो काढायला चांगली जागा दिसली की माझा पाय आपोआप ब्रेक वर जातो. मी आता बाहेर जाणार हे जाणताच आमच्या छोट्या हिरोची कुरबुर सुरु होते! गळ्यात दुर्बीण, खांद्यावर लटकलेला SLR आणि हातात मोबाईल कॅमेरा अशी आयुधे सांभाळत उन्हात गाडीबाहेर येऊन, परिसर न्याहाळून व फोटो काढून  " आता इथेच राहायचंय का?" असा प्रश्न सौ विचारायच्या आत शक्य तेवढ्या लवकर परत गाडीत परत  यायला किती कसब पणाला लावावे लागते याची कल्पना सर्वानाच नाही यायची!! नाही म्हणायला आज वाटेत करवंदाची आणि जांभळाची झाडे सापडल्यावर सहपत्नीक करवंदे, जांभळे तोडण्याचा योग आला!
सांधण व्हॅली पर्यंत चालत यायला दोघेही तयार नसल्याने ती इच्छा अर्धवटच राहिली! पुन्हा पावसाळ्यात आल्यावर पाहू जमते का! हजार वर्षापूर्वीचे हेमाडपंथी बांधणीचे रतनवाडीचे  अमृतेश्वर मंदिर पाहायला मिळाले. खूप सुंदर आणि सुबक असे हे छोटेसे मंदिर. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीपाशी पोहचायला चिंचोळ्या पायऱ्या उतरून जावे लागते व दुसऱ्या बाजूने पायऱ्या चढून वर यायचे. अशी पद्धत इतर कुठल्याच शंकराच्या मंदिरात पहायला मिळाली नव्हती.आम्हाला पाहून दोन तीन छोट्या फुले विकणाऱ्या  मुली धावत आल्या. त्यांच्या कडून दहा रुपयाची ती जास्वंदीची फुले घेऊन आम्ही देवळात गेलो. आत मंदिराचे निरीक्षण करत असताना एक सुरकुुतलेल्या चेहऱ्याचे एक म्हातारबाबा तेथे आले.
"कुठून आलात, मुंबईहून का?" त्यांनी विचारले
मी हो म्हणालो.
"हे पांडवकालीन मंदिर हाय. आता आमाला आमच्या आईबाबान सांगितलं म्हणून माहिती.. त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या सांगितले" बाबांनी माहिती दिली.
त्या नंतर बराच वेळ मी कशा कशाचे फोटो घेतोय ते पहात ते बसले होते!
एवढे सारे अनुभवायला मिळाल्यावर एकाच गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. शासनाने लक्ष घातले तर इथे खूप कायापालट होऊ शकतो. रस्ता चांगला करायला हवा, पर्यटकांसाठी सुविधा हव्यात आणि मुख्यत्वे करून येथील रहिवासी जो खूपच गरीब दिसला त्याची परिस्थिती सुधारायला हवी.
#भटकंती #भंडारदरा

No comments: