Pages

Monday, April 13, 2020

लॉकडाऊन आणि पाककला

लॉक डाऊन चा काळ आहे आणि प्रत्येक जण आपापल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वर त्यांनी बनविलेल्या पदार्थांचे फोटो टाकत आहे.  नवरा आणि बायको दोघेही  स्वयंपाकघरात आपापल्या परीने जमेल ते पदार्थ बनवायचा प्रयत्न करत आहेत.  भारतात घरगुती एलपीजी  सिलेंडर ची डिमांड खूप वाढली आहे आणि तिकडे अमेरिकेमध्ये मैदा आणि यीस्ट ची मागणी वाढली आहे कारण खूप सारे लोक ब्रेड आणि केक्स बेक  करत आहेत.

खरे तर खूप सारे लोक यावेळी चिंताग्रस्त आहेत आणि हे संकट कधी संपेल याची वाट प्रत्येक जण बघतो आहे. अशा परिस्थितीमध्ये  लोकांचे हे विविध पदार्थ बनवणं आणि सोशल मीडिया वर पोस्ट करणे काही जणांना थोडं विपरीत वाटेल पण खरं तर माझ्यापुरतेच सांगायचे झाले तर  माझ्यासाठी कुकिंग ही एखाद्या थेरपी सारखी आहे. अर्थात सोशल मिडीयावर फोटो, व्हिडीओ टाकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

स्वयंपाक म्हणजे माईंडफुलनेस (मनाची सजगता)

कांदा पातळ चिरणे, रवा किंवा शेंगदाणे भाजणे, ताक घुसळून लोणी काढणे , बेकिंग साठी पीठ मळणे या सगळ्या क्रिया  किंवा एखाद्या पदार्थाची रेसिपी तंतोतंत पाळणे यामध्ये आपण एवढे एकाग्र चित्त होतो की दुसरे कोणतेच विचार स्पर्श करत नाहीत. यालाच माईंड फुलनेस म्हणतात. जेव्हा आपण चिंताग्रस्त असतो तेव्हा मुख्यत्वेकरून आपण विचार करत असतो तो भविष्याचा परंतु जेव्हा मन लावून जेवण बनवतो तेव्हा मी तो क्षण जगत असतो.   

स्वयंपाक म्हणजे सुगंधोपचार

मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी काही ठिकाणी सुगंधोपचार पद्धती ( अरोमा थेरेपी) वापरली जाते. भारतीय स्वयंपाक म्हणजे विविध सुगंधाची उधळण. जगात कुठल्याही पद्धतीच्या स्वयंपाकादरम्यान एवढ्या विविध सुगंधाची उधळण होत असेल असे वाटत नाही. साधा चपाती भाजण्यापासूनचा सुगंध असुदे की मस्तपैकी शाही बिर्याणीचा... हवेत पसरला की सारे लक्ष वेधून घेतो.  साधे आले आणि गवती चहाची पात टाकलेल्या चहाचा दरवळणारा सुगंध आठवून पहा... छाती भरून दीर्घ श्वास आपोआप घेतला जातो!  हाच  हवेत दरवळणारा सुगंध ताण हलका करण्यास मदत करतो.

स्वयंपाक म्हणजे क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता)

स्वयंपाक बनवणे ही एक कला आहे. म्हणूनतर आज त्याच रेसिपीज ची  एवढी सारी पुस्तके लिहिली गेली, एवढे सारे यु ट्यूब वर व्हिडीओ अपलोड केले गेले तरी रोज त्यात भर पडतच आहे. याचे कारण आहे लोकांची क्रिएटिव्हिटी.
इतर कुठल्याही कलेप्रमाणे पाककलेमध्ये ही सर्जनशीलतेस खूप वाव आहे पदार्थाचा रंग, रूप , चव, बनविण्याची पद्धत, त्याला लागणारे जिन्नस, त्या जिन्नसांचे प्रमाण  एवढेच नव्हे तर वाढताना त्या पदार्थाची केली जाणारी मांडणी  यात वैविध्य आणून प्रत्येकवेळी एखाद्या नवीन कलाकृतीप्रमाणे तो पदार्थ सादर केला जाऊ शकतो. अशा वेळी मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो.  शेवटी आपण नेहमी आनंदाच्या शोधतच जगत असतो.  सर्जनशीलतेतून मिळणारा आनंद हा आणखी जगण्यास प्रवृत्त करतो, जगणे आनंदी करतो

स्वयंपाक म्हणजे प्रेम

कधीतरी मी एखादा पदार्थ बनवतो आणि तोंडात टाकताच आठवते ती आईच्या हातची चव! आजही नारळाच्या दुधातल्या शिरवाळे (शेवया) पहिल्या की आठवण येते ती आजीची आणि तिच्या आम्हा नातवंडांवरच्या प्रेमाची. आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो अशांसाठी छानसे जेवण बनवायचा विचारच मला वाटते ऑक्सिटोसीन हे लव्ह हार्मोन शरीरामध्ये पाझरायला मदत करत असावा! हे ओळखूनच कुणीतरी  पुरुषांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो हे शोधून काढले आहे! स्त्रियांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग भल्या भल्यांना अजुन सापडलेला नाही ही गोष्ट वेगळी!

No comments: