Pages

Monday, April 13, 2020

पनवेलचे मासेमार्केट

जुन्या पनवेल मध्ये एक मोठे मासेमार्केट आहे. मोठी खरेदी करायची असली की नवी मुंबईतील दूर दूर वरून लोक या मार्केट मध्ये येतात. 

एरवी बाहेर पाचशे रुपयाला मिळणारी कोळंबी इकडे गेलात की अडीजशे रुपयाला उपलब्ध असते. तुम्ही एकदम खुश होता! तुम्हाला एवढ्या लांब आल्याचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. मनातल्या मनात हिशोब करता...'चला, चार किलो कोलंबीचे घेतली तर हजार रुपये वाचले' तुम्ही मासे विकणारीला चार किलोची ऑर्डर देता. तराजू लहान असल्याने ती एका वेळी एक किलो मोजणार असते.  ती एक किलोचे माप तराजूच्या एका पारड्यात टाकते आणि दुसऱ्या बाजूला कोळंबी टाकायला सुरुवात करते.  गेली कित्येक वर्ष तुम्ही मासे विकत घेत असल्यामुळे तुम्हाला यांच्या कॉमन ट्रिक्स माहिती असतात. ती कोळंबी मोजत असताना तुम्ही सूचना देता- 'ताई, तराजूच्या भांड्यामध्ये कोळंबी बरोबर पाणी टाकू नकोस, बर्फ टाकू नकोस'

ती पण मग तुम्हाला 'बघ भाऊ, कुठे पाणी आहे, कुठे बर्फ आहे' असे म्हणून आश्वासित करते! जेव्हा कोळंबी एक किलो भरते तेव्हा तुमच्या सराईत नजरेला लक्षात येतं की ही एक किलो नक्कीच नाहीयेय. तुमच्या लक्षात येतं की मापाच्या वजनामध्ये काहीतरी गोलमाल आहे. मग तुम्ही तिला सांगता की 'ही कोलंबी कमी आहे, काटा न मारता मोज'

तेवढ्याच शांतपणे ती ही तुम्हाला सांगते 'भाऊ, काटा न मारता पाहिजे असेल तर 400 रुपयाला पडेल! तुम्ही हो म्हणाला तर पहिले माप काढून दुसरे माप टाकते किंवा पहिल्या मापात आणखी वजन टाकते आणि यावेळी कोळंबी जास्त भरते!

जे नेहमी इथे येतात त्यांना या गोष्टीची कल्पना असल्यामुळे ते सुरुवातीलाच सांगून टाकतात की 'काटा न मारता  सांग कशी देणार ते सांग'

पण एक गोष्ट मला आवडली, हा सगळा व्यवहार प्रामाणिकपणे चालतो! म्हणजे तुम्हाला कोळंबी जरी कमी दिली तरी त्याचा भाव पण कमीच असतो. चारशे रुपये सांगून तुम्हाला कमी वजनाची कोलंबी दिली जात नाही!! घेणारा नवशिक्या असेल तर अडीजशे ने कोळंबी मिळाली म्हणून तो खुश होऊन घरी जातो ( अर्थात घरी गेल्यावर 'तुम्हाला काय कोणी पण फसवेल, साधी कोळंबी पण बघून  घेता येत नाही' इथून सुरुवात होऊन 'तिकडे कामावर काय गोधळ घालत असाल कुणास ठाऊक' येथवर सारे ऐकून घ्यावे लागत असते ही गोष्ट वेगळी!)

पण हे झाले कोळंबीच्या बाबतीत, ज्याचा अंदाज तुम्हाला लावता येतो. पण इतर मासे जे किलोच्या भावाने विकले जातात त्याचा अंदाज लावणे थोडे कठीण असल्यामुळे ताईने भावाला सांगितलेल्या भावाकडे दुर्लक्ष करून, भावाने माशाचा आकार पाहून  घासाघीस करावी हे उत्तम!!

#उरल्या_फक्त_आठवणी
#लॉकडाऊन_शेफ

No comments: