Pages

Monday, November 11, 2019

Pratyush


Saturday, November 09, 2019

टोमॅटोची बटाट्या संगे केलेली चटणी

टोमॅटोची बटाट्या संगे केलेली चटणी ! 
'एकटा जीव सदाशिव' असाल किंवा बायको गेली असेल माहेरी. सुनिल च्या हातची आणि माझ्या लेखणीतून उतरलेली ही चटपटीत चटणी करील साथ तुमची! निराश होऊ नका, आता तुम्हीही बनाल सुपर शेफ!!

कृती-
सगळ्यात प्रथम गरम तेलात जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन नंतर त्यात बारीक चिरलेल्या कांद्याची कडीपत्त्यासाहित आहुती द्यायची आणि मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजू द्यायचे. नंतर त्यात ऍड करायचे हळद, हिंग आणि बारीक आणि पातळ चिरलेले बटाटे. दोन मिनिटं बटाटे शिजू द्यायचे आणि मग टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ अर्थात स्वादनुसार!
त्यानंतर पाळी आहे थोडेसे बारीक चिरलेल्या टोमॅटोची. त्याला चांगले परतून घेतल्यावर घालायचा थोडासा गूळ..टोमॅटोचा थोडासा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा... अहाहा.. जोडी नेहमीच झक्कास जमते!
भांड्यावर झाकण ठेवून  आणखीन 2 मिनिटे टोमॅटो- बटाट्याला मंद आचेवर चांगलं भेटू द्या. ते डिस्टर्ब होऊ नयेत ही काळजी तुम्ही भांड्यावरचे झाकण ठेवून घेतलीत तर चटणी तुम्हाला नाराज नाही करायची! सगळे जमल्यावर वरून शेव टाका थोडे आणि नसेल चपाती रेडी तर ब्रेड बरोबर चाखा अवीट चवीची ही चटणी.

Tuesday, November 05, 2019

छंद!

दोन चार कला, छंद हाताशी असले की जगणे कसे थोडे सोपे होते. कविता व लेखन, गाणे, वाचन, फोटोग्राफी या गोष्टी माझे जीवन सुरुवातीपासून सुसह्य बनवत आल्यात. मुळात मी घडलो तो पुस्तकांमुळे. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड.  तिसरी चौथी मध्ये असताना आमच्या प्राथमिक शाळेचे वाचनालय जे दोन चार मोठ्या पत्र्याच्या ट्रंकेत सामावलेले होते त्याची देखभाल करण्यासाठी गुरुजींना मदत करायचो कारण हे की हवे तेवढे जुने 'चांदोबा'  वाचायला मिळायचे! जीवनाविषयीचे अनुभव, जगायचे कसे हे सारे या पुस्तकांनीच तर शिकविले. आजही मनात जेव्हा खूप गोंधळ असतो तेव्हा आध्यात्मावरची पुस्तके त्यातून मार्ग दाखवतात.   
लेखन पण माझ्यासाठी खूप जवळचे होते आणि आहे. बरीच वर्षे मी डायरी लिहिली. जे जे मनात यायचे ते ते मी त्या डायरीत लिहीत गेलो. त्यामुळे मन तर हलके व्हायचेच पण काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचे समाधान पण मिळायचे. डायरीची मागची पाने वाचताना तो दिवस, तो प्रसंग नजरेसमोर जशास तसा उभा राहतो जसा काही भूतकाळाचा आरसाच जणू. त्यातल्या काही गोष्टींचा आज अभिमान वाटतो, आपले वागणे, आपला निर्णय बरोबर ठरल्याचे समाधान मिळते तर काही गोष्टीकडे 'धडा' म्हणून बघायला लागते. आज चाळीशी मध्ये लिहिणे होते ते काहीतरी 'मागे' सोडून जाण्याच्या दृष्टिकोनातून!
गाणे तसे मी कधीच क्लास लावून शिकलो नाही. जे काही गायचो आणि गातो ते स्वतःच्या आनंदासाठी. माझ्यासाठी गाणी ऐकणे आणि गाणे या दोन्ही गोष्टींनी कितीतरी कठीण क्षण सोपे केलेत. लता, आशा, पद्मजा, येसूदास यांच्यासहित इतर कित्येकांनी आपल्या सुरांनी स्वतःला विसरायला लावले.
माझ्या कवितांविषयी काय सांगायचे?  मी कविता 'करतो 'हे म्हणणे खरे तर चुकीचे ठरेल. कधीतरी काहीतरी खोलवर स्पर्श करतं आणि मग आपोआप त्याची कविता होते. अशावेळी लागलेली समाधी ही स्वतः अनुभवल्याशिवाय कळणारी नाही. कॉलेज ला असताना कधीतरी  रात्र  रात्र जागून केलेल्या पेंटिंग च्या वेळी  आणि कविता स्फुरताना लागणारे ध्यान हे एकसारखेच असते हे आज मला जाणवतेय. अगदी हाच अनुभव सगळ्यांना येऊ शकतो फक्त एखाद्या गोष्टीत झोकून द्यायची गरज असते!
फोटोग्राफीही जरी लहानपणापासून आवडत असली तरी ती त्यावेळी 'परवडणारी' नक्कीच नव्हती. मोबाईल मुळे आज ते सहजशक्य झालंय. चालता चालता एखादे झाड, फुल, दगड असे काहीही खुणावते. त्यात कुठेतरी मी मला सापडतो आणि मी त्याला कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचद्या तो यशस्वी पण होतो.
रंगांचे आणि माझे नाते जुनेच. मालवणचे टोपीवाला हायस्कुल आणि शिरोड्याचे ट्युटोरिअल हायस्कुल मध्ये चित्रकलेचे धडे बऱ्यापैकी गिरवायला मिळाले. त्यानंतर कॉलेज मध्ये पेंटिंग्ज केले ते वार्षिक कला प्रदर्शनात भाग घेण्यासाठी. त्यावेळी एखादे पेंटींग करायला घेतले की तहान भूक हरपून जात असे. आजही अधून मधून क्वचित ब्रश हातात घेतले की जग विसरायला होते.
खरेतर आपण "माणूस" असण्याची जाणीव करून देणाऱ्या या साऱ्या गोष्टी, पण "जगण्याच्या" नादातच त्या "आयुष्य" बनायच्या राहून गेलेल्या आणि निव्वळ "छंद" बनून राहिलेल्या!!