Pages

Friday, October 04, 2019

संस्कृता स्त्री पराशक्ती


२०१४ साल असेल. ऍडमिशन चे दिवस होते. या दिवसात  ऍडमिशनसाठी विचारणा करायला सतत कुणी ना कुणी येत असते. त्यादिवशी मी माझ्या केबिन मध्ये बसलेलो असताना आवाज आला"मे आय कम ईन सर?"
मी कामातून डोके वर करून दाराच्या दिशेने पाहिले तर एक  छोटी काटकुळीशी मुलगी दारात उभी होती.  मी तिला आत यायला सांगितलं तशी ती थोडीशी घाबरत घाबरतच आत आली. उंची जेमतेम साडेचार पावणेपाच फूट, तोळामासा प्रकृती, चष्मा लावलेला आणि एकदम साधासा ड्रेस घालून ती माझ्यासमोर उभी होती. तिच्या एकंदर दिसण्यावरून तिच्या घरच्या बिकट परिस्थितिची जाणीव होत होती.

"बोला, काय काम आहे?"मी तिला विचारलं.

"सर एडमिशन मिल सकती है?" तिने घाबरत घाबरत हिंदीमध्ये विचारले.
मी तिला तिचे शिक्षण विचारले.

"बारहवी किया है" ती म्हणाली.

"परसेंटेज?"

"56 परसेंट" ती हळू आवाजात उत्तरली. सद्यपरिस्थितीत आपले  मार्कस तुलनेने कमी आहेत त्यामुळे ऍडमिशन मिळणे कठीण आहे हा विचार असावा त्या 'हळू'  आवाजामागे.

"आपला नाम?" मी विचारले. तिने सुरवातीला आपले नाव सांगितलेच नव्हते.

"किंजल चौहान" ती म्हणाली.

" किंजल, मिल जायेगी ऍडमिशन"
एवढ्या सहजासहजी ऍडमिशन मिळेल याच्यावर तिचा विश्वास बसला नसावा.

"सच में मिल जायेगी सर?" तिने अविश्वासाने विचारले.

" हां, मिल जायेगी" मी हसून म्हणालो. माझे उत्तर ऐकल्यावर मघापासून पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळालं.

"थॅंक्यु सर" ती म्हणाली. गव्हरमेंट एडेड कॉलेज मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकते ते ऐकून तिला हायसे वाटले होते.

"आपके साथ कोई आया है?" मी विचारले.

"मेरे पापा आये है" थोडेसे चाचरतच ती म्हणाली.

"फिर उनको भी बुला लो अंदर" मी तिला म्हणालो.

ती बाहेर जाऊन दोन-तीन मिनिटं आपल्या वडिलांना आत मध्ये येण्यासाठी सांगत होती ते मी ऐकत होतो. शेवटी हो ना करत तिचे वडील आत आले. साधारण तिच्याच एवढीच उंची आणि जेमतेम प्रकृती, खांदे एकदम झुकलेले. आत आल्यावर मी त्यांना बसायला सांगितले.

"आप काम क्या करते हो?" मी विचारले.

"रेल्वे मे हूँ" इकडे तिकडे पहातच त्यांनी उत्तर दिले.

"रेल्वे मे क्या करते हो?"

"टेक्नीशियन का जॉब है" ते थोडासा चाचरत उत्तरले. मला कुठेतरी वाटले की ते खरे बोलत नाहीयेत.

"सेलरी कितनी मिलती है?" मी विचारले. 
जेव्हा कुणी ऍडमिशन साठी येते तेव्हा त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्याकडे माझा कल असतो जेणेकरून कोर्स पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींची कल्पना पालकांना देऊ शकेन आणि ज्यांना आर्थिक चणचण असेल त्यांना विविध स्कॉलरशिप, फ्रीशिप, आणि इतर पर्याय उपलब्ध करून देऊ शकेन.
माझ्या या प्रश्नावर त्याने थोडासा विचार केल्यासारखे केलं आणि पुन्हा एकदा चाचरत उत्तर दिले-

"सर आपको तो पता ही होगा ना की टेक्निशियन को सेलरी कितनी मिलती है?"

त्यांच्या या उत्तरावरून माझ्या लक्षात आलं की ते काहीतरी लपवत आहेत.  त्यामुळे मी त्यांना पुढे काही विचारले नाही. पण किंजल मला खूप प्रामाणिक वाटली.

"ठीक आहे,  तुम्ही ऍडमिशन ची पुढची फॉर्मॅलिटी पूर्ण करा" मी म्हणालो.

किंजलने दोन-तीन वेळा मला थँक्यू म्हटले आणि ती वडिलांना घेऊन माझ्या केबिनच्या बाहेर गेली.
ती बाहेर गेल्यावर मी माझ्या ऍडमिशन इन्चार्ज ना बोलावून त्यांना या मुली बद्दल आणि तिच्या वडिलांबद्दल सांगितले. प्रथमदर्शनी तरी वडील काहीतरी लपवत आहेत असे वाटत होते.

कॉलेज सुरू झाल्यावर किंजल नियमित कॉलेजला येऊ लागली. मी एक गोष्ट नेहमी बघत होतो की किंजल तिच्या वर्गातल्या इतर मुलींसारखी नाहीयेय. वर्गात इतर मुलींमध्ये न मिसळता ती शांत बसलेली असायची.  कपडे अत्यंत साधे किंबहुना तेच-तेच रंग विरलेले दोन ड्रेस असायचे.  तिचे अक्षर छान होतं पण वर्गात विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला तिला उत्तर द्यायला जमायचे नाही. तिचा आवाजच एवढा लहान असायचा की जेमतेम तिच्या बाजूच्या मुलीलाच फक्त ऐकायला जाईल.  पण दिलेल्या असाइनमेंट मात्र ती वेळच्यावेळी करून आणायची.

आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी किंजल ला एक मेंटॉर नेमून दिला. माझ्या कॉलेज मधील मॅथ्स शिकविणाऱ्या मॅडम तिच्या मेंटॉर होत्या. त्यांना तिच्याकडे विशेष लक्ष दयायला सांगितले. इंजिनीयरींग करायचे तर छान बोलता तर आले पाहिजे हा माझा नेहमी आग्रह असतो आणि  त्याप्रमाणे संभाषण कला अवगत होण्यासाठी विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घ्यावी लागते. इथे किंजल कडे  चार चौघात बोलण्याचा बिलकुल आत्मविश्वास नव्हता.  हळू हळू त्यांनी किंजल ला विश्वासात घ्यायला सुरुवात केली आणि मग तिच्या घराची परिस्थिती समोर आली. 

तिला आई नव्हती. आई गेल्यावर गुजरात मधून वडील तिला घेऊन मुंबईला आले आणि त्यांच्या धारावी मध्ये राहणाऱ्या  बहिणीच्या घरी राहू लागले. तिच्या वडिलांना कुठलाच कायमस्वरूपी जॉब नव्हता. कुठले तरी बारीक सारीक काम ते करत असत ते सुद्धा मनस्थिती ठीक असेल तर . सोबतीला दारू  होतीच. कित्येकदा मानसिक स्थिती बिघडल्यावर त्यांची लोकांशी भांडणे होत आणि  प्रसंगी त्यांना मार पण पडे.  आत्येकडे घरातली सर्व कामे  किंजल ला करावी लागत. कॉलेज वरून घरी गेल्यावर रात्री नऊ वाजेपर्यंत किंजल एके ठिकाणी बुकबाईंडींग चे काम करत होती ताशी वीस रुपये पगारावर! नंतर घरी जाऊन जेवण बनविणे, इतर कामे व त्यानंतर अभ्यास. अशाही परिस्थितीत तिने कधी कॉलेज आणि असाइनमेंटस चुकविल्या  नाहीत. आता मला तिच्या फार हळू बोलण्यामागचे काय कारण असेल याची कल्पना आली. घरी कधी मोठ्याने बोलण्याचा प्रसंगच आला नसेल तिच्यावर. आत्यंतिक गरिबी असलेल्या कुटुंबात जे होते तेच तिच्या वाट्याला आले असे पण अशाही स्थितीत तिला शिकायची इच्छा होती ही खूप चांगली गोष्ट होती. माझ्या केबिन मध्ये जेव्हा ती काही कामानिमित्त  यायची किंवा मी जेव्हा जेव्हा तिच्या क्लास वर जायचो तेव्हा तिचा बोलण्याचा  आत्मविश्वास कसा वाढवता येईल यांच्याकडे मी लक्ष द्यायचो.   

तिची  परिस्थिती लक्षात आल्यावर माझा स्टाफ पण तिच्याकडे आणखी लक्ष देऊ लागला.आतापर्यंत तिने कॉम्पुटर कधी फारसा हाताळला नव्हता. तिच्या परिस्थिती मुळे ते शक्य झाले नव्हते. आम्ही तिला कॉलेज चा एक लॅपटॉप उपलब्ध करून दिला पण ती तो कॉलेज मधेच वापरायची. घरी घेऊन गेली तर तो शाबूत राहील की  नाही याची तिला शाश्वती नव्हती. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ती काही खात  नाही हे लक्षात आल्यावर आमच्या एका लेक्चररनी तिचे कॉलेज संपे पर्यंत तिच्यासाठी घरून डब्बा आणला. 
पहिल्या वर्षी दिवाळीला मॅथ्स च्या मॅडमनी  काही नवीन ड्रेस शिवण्यासाठी तिला ड्रेस मटेरियल दिले. बरेच दिवस झाले तरी तिच्या अंगावर नवीन ड्रेस दिसेना म्हणून त्यांनी तिला विचारले कि ती नवीन ड्रेस  का नाही वापरात आहे. या वर  होते की " मॅडम , नये ड्रेस है ..कैसे पहनु ?" 

पाचव्या सेमिस्टर मध्ये इंटर्नशिप असते. किंजलच्या परिस्थितीची कल्पना देऊन आम्ही अशा कंपनी मध्ये तिला इंटर्नशिप मिळवून दिली जिथे तिला महिना पाच हजार रुपये विद्यावेतन मिळेल आणि अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करायची संधी मिळेल. तिच्या शैक्षणिक कुवती विषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती. फक्त प्रश्न होता तो म्हणजे तिला जास्तीत जास्त वेळ अभ्यास करायला कसा मिळेल याचा कारण कॉलेज झाल्यावर जॉब आणि घरकाम यातच तिचा सारा वेळ जात होता. महिना पाच हजाराच्या तिला खूप हातभार लागणार होता. 
मुलींना इंटर्नशिपला पाठविल्यावर प्रत्येक महिन्याला कॉलेज मधून लेक्चररकडून  त्या कंपनीमध्ये भेट दिली जाते. विद्यार्थिनी कसे  आणि काय काम करत आहेत, त्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी ही  भेट दिली  जाते. पाचव्या सेमिस्टर मध्ये आमची एक लेक्चरर किंजल जिथे इंटर्नशिप करत होती तिथे गेली तेव्हा तिने तेथून मला एक फोटो पाठवला आणि त्याखाली लिहिले होते 
" फोटोमध्ये किंजलकडे पहा सर, चक्क हसतेय ती !" 
कॉलेज मध्ये गेल्या एका  वर्षात बहुतेकांनी तिच्या चेहऱ्यावर हसू क्वचितच पहिले होते. अभ्यास, जॉब आणि घरातील कामे यात ती पुरती बांधली गेलेली होती. इंटर्नशिप च्या दरम्यान ती खूप खुश होती. स्टायपेंड मुळे घरात बऱ्यापैकी हातभार लागत होता आणि कंपनीमध्ये पण तिला खूप चांगले वातावरण भेटले होते. कंपनीचे मालक हे स्वतः एक प्रख्यात इलेक्ट्रॉनिकस डिझाईनर आणि आमचे इंडस्ट्री मेन्टॉर असल्यामुळे आम्ही ज्या आत्मियतेने किंजल ला घडवत होतो त्याच आत्मियतेने ते पण तिला मदत करत होते. 

कंपनी मध्ये किंजल ने खूप चांगले काम केले. जिला कॉम्पुटर हाताळता येत नव्हता ती सोजो सॉफ्टवेअर वापरून ३२ बिट मायक्रोकन्ट्रोलर वर आधारित अँप्लिकेशन्ससाठी यूजर इंटरफेस बनवत होती. त्यानंतर आठव्या सेमिस्टर मध्येही तिने त्याच कंपनी मध्ये इंटरशिप केली. या एका वर्षाच्या इंटरशिप मध्ये तिने इंडस्ट्री मध्ये मोलाचा अनुभव तर मिळविलाच पण त्याच बरोबर कॉलेज च्या फी पेक्षा जास्त रक्कम विद्यावेतनाद्वारे कमविली. 
डिप्लोमा झाल्यावर तिच्या इंटर्नशिप दरम्यानच्या अनुभवावर दुसऱ्या एका कंपनीमध्ये जॉब ऑफर केला गेला पण त्याच दरम्यान त्यांचे पुन्हा गुजरातला रहायला जायचे घाटत होते म्हणून तिने तो जॉब स्वीकारला नाही. पण नंतर जाणे रद्द झाल्यावर मुंबईमधील  एका नावाजलेल्या  इंजिनीयरींग कॉलेज मध्ये ती कामावर रुजू झाली. 

आज जरी किंजल शी भेट होत नसली तरी जेव्हा जेव्हा कुणी परिस्थितीने  हतबल झालेली विद्यार्थिनी भेटते तेव्हा तेव्हा मी आणि माझा स्टाफ तिला किंजल चे उदाहरण नक्की देतो !   

( लेखामधील नाव आणि फोटो बदललेले आहे ) 

दिनेश गिरप 
dineshgirap@gmail.com

No comments: