Pages

Thursday, October 17, 2019

मी आचारी....!

'जेवण बनवणे  ही एक कला आहे' हे खरे आहे पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे  'जेवण बनविता येणे हा  स्वावलंबनाच्या प्रवासातील पहिला महत्वाचा टप्पा  आहे' हे माझ्या आईचे स्पष्ट मत होते त्यामुळेच की काय शाळेत असल्यापासूनच कुकर लावणे, डाळीला फोडणी देणे अशी कामे लहानपणापासूनच आमच्या वाट्याला आली! शाकाहारी जेवण असेल तर आईने बनवायचे आणि मासे, मटण असेल तर बाबांनी बनवायचे असा आमच्या घरचा अलिखित नियम होता. त्यामुळे पाककलेचे सारे धडे घराच्या घरी आपोआप गिरवले गेले.

माझ्या लग्नानंतरही आमच्या घरातील ही प्रथा कायम राहिली हे काही वेगळे सांगायला नको! पण मी जेवण बनवत असताना किचनचे  रूपांतर रणांगणात झालेले असते. जेवण बनवायला सुरू केल्या केल्या आतला इंजिनिअर जागा होतो! मल्टी थ्रेडिंग मल्टी टास्किंग प्रोसेसिंग आपोआप सुरू होते आणि कमीत कमी वेळेत जेवण बनवणे कसे उरकायचे हे एकच ध्येय समोर असते. एकीकडे गॅस वरील कढईत तेल घालायचे आणि नंतर फोडणीची तयारी सुरू करायची ही माझी सवय! तेल गरम होईपर्यंत कडीपत्ता, मिरच्या, कांदा, लसूण या साऱ्या गोष्टी कापून तयार करायच्या असतात! त्यात हिंग, मोहरी, जिरे जागच्या जागी सापडले तर ठीक नाहीतर शोधाशोध करण्यात सारी उलथापालथ झालेली असते! खडा मसाला परतून घ्यायचा असेल तेव्हाही तीच गत! ठराविक क्रमाने आणि ठराविक वेळीच जो तो जिन्नस पडला पाहिजे हा माझा अट्टाहास असतो पण त्यासाठी त्या साऱ्या गोष्टी अगोदरच काढून ठेवणे मला कधी जमलेच नाही! याच्या अगदी विरुद्ध कहाणी माझ्या सिंगापूरला राहणाऱ्या एका मित्राची. तो जेव्हा जेवण बनवतो ते एखादे निसर्ग चित्र कॅनव्हास वर उतरवावे तसे. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आम्ही दोघे रुमपार्टनर्स होतो. तेव्हाही तो कागदावर पेनने अत्यंत बारीक नक्षी असलेली डिझाईन्स बनवायचा आणि मी दाभोळकर स्टाईल ने रंगांचा शिडकावा असलेली पेंटिंग्ज करायचो. तोच काहीसा प्रकार आमच्या पाककलेत उतरलाय. त्याचे सारे कसे एकदम त्याच्या नक्षीदार डिझाईन सारखे सुबक आणि माझे जेवण बनवणे म्हणजे थेट कॅनव्हास वर मारलेल्या ब्रश च्या फटकाऱ्यांसारखे!


अशी जय्यत तयारी करणे सुनील ला चांगले जमते


हा असा बेक केलेला स्टफ वडापाव म्हणजे कल्पकतेची परिसीमा ... त्यात प्लेट मधील सुंदर  मांडणी 

(सारी छायाचित्रे माझा सिंगापूरवासी मित्र सुनिल ने काढलेली आहेत )

जेवण बनवत असताना माझ्या डोळ्यासमोर असतो तो ऐन गर्दीच्या वेळी एखाद्या हॉटेलच्या किचनमधला शेफ... अर्थात काही वर्षांपूर्वी मीच सुरू केलेल्या  ( आणि आज अस्तित्वात नसलेल्या) 'दर्या-मलबार' रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करण्याचा अनुभव पण घेऊन झालेला असल्याने घरी जेवण बनवताना  त्या जुन्या आठवणी कधी कधी जाग्या होतात! ऐन गर्दीच्या वेळी ऑर्डर्स पूर्ण करताना होणारी शेफ ची कसरत ही अनुभवल्याशिवाय कळणे शक्य नाही! पण रेस्टॉरंटमध्ये लागणाऱ्या साऱ्या गोष्टी तयार ठेवण्यासाठी हेल्पर्स असतात त्यामुळे शेफला फक्त पदार्थ बनविण्यावर लक्ष केंद्रित करता येते. इथे घरी आमचे हेल्पर्स आम्हीच! 'मदत करण्याच्या नादात पदार्थ बिघडला तर उगीच आळ नको' या निरागस विचारामुळे असेल की काय कुणास ठावूक, बहुतांशी वेळा एखादा पदार्थ बनवायला घेतला की त्याची सर्वस्वी जबाबदारी अस्मादिकांवरच सोपविली जाते!


आजकाल जेवण बनवत असतानाची माझी गडबड बघितली की डॉबाला (बायकोतल्या डॉक्टरला) राहवत नाही. "साधे जेवण करताना एवढा स्ट्रेस घेतलास तर कसे रे होणार शरीराचे? किती ती स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होत असतील? जरा घाई-गडबड न करता शांतपणे जेवण बनवलेस तर नाही का होणार?" असा प्रेमळ सल्ला स्वयंपाकघराच्या बाहेरून ऐकायला येत असतो. सारे काही कळत तर असते पण आमचे ऍडर्निलीन का काय म्हणतात ते पण जोमात असते ना!

(वरील लेख हा नुकत्याच बनविलेल्या पंजाबी स्टाईल चिकन चा आस्वाद घेता घेता लिहिला असल्या कारणाने चूक भूल द्यावी घ्यावी! )

No comments: