Pages

Wednesday, October 16, 2019

वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने

आजकाल वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'वाचन प्रेरणा दिवस' साजरा करण्याची खरोखरच गरज भासते आहे. जग समजून घ्यायचे असेल तर 90 च्या दशकापूर्वीच्या पिढीसाठी वाचन हा एकमेव पर्याय उपलब्ध होता त्यामुळे वाचनासाठी प्रेरणा ही आपोआपच मिळत असे. पण आज स्थिती वेगळी आहे. क्रॉसवर्ड्स मध्ये पुस्तकात गुंग होऊन बसलेली मुले दिसली की आता चक्क कौतुक वाटते. जे काही शिकायचंय त्याचे विविध स्वरूपातील व्हिडिओ उपलब्ध आहेत. पुस्तकातील धडे ऑडिओ च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. तीच गत अगदी गोष्टींच्या पुस्तकांची. आज माझ्याच मोबाईल वर ध्वनिमुद्रित पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या 'स्टोरीटेल ऍप' साठी मी महिना तीनशे रुपये भरतोय खरा पण फावल्या वेळेतील वाचन आणि लिखाण यांच्या मधून वेळ मिळाला तरच पुस्तके ऐकणे होते! या सर्व गोष्टींमुळे वाचनाची सवय फक्त लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्ये पण हळू हळू कमी होत चालली आहे हे खरंय. 

माझे दहावी पर्यंतचे शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावात झाले असले तरी प्रत्येक गावी सगळ्यात प्रथम शोधले जायचे ते त्या गावचे वाचनालय. मी सहावी पर्यंत जिथे शिकलो ते अगदी खेडेगाव होते.. तेथून साधारण सात किलोमीटर  त्यातल्या त्यात मोठे आठवड्याचा बाजार भरणारे गाव होते.  दर रविवारी बाजाराच्या निमित्ताने तेथे जाणे झाले की तेथील वाचनालयात पुस्तक बदलून घेण्याचे काम माझे होते. त्यावेळी दोन पुस्तके एके वेळी मिळत असत आणि माझ्यासाठी आठवड्याभराचा वेळ ती दोन पुस्तके संपविण्यासाठी पुरेसा असे. त्यामुळे सहावी होण्याच्या आधीच 'छावा', 'मृत्युंजय' या सारख्या कादंबऱ्यांबरोबरच इतर अनेक आत्मचरित्रे, रहस्यकथा यांचा अस्मादिकांनी फडशा पाडला होता. सातवीत असताना तर वडिलांनी मी  सुहास शिरावळकरांच्या कादंबऱ्या वाचतो म्हणून माझ्या शिक्षकांना तक्रार केल्याचे आठवतेय!! 

ठिकठिकाणच्या वाचनालयानी माझे बालपण समृद्ध केले. माझ्या शाळेतला वि. स. खांडेकरांचा समृद्ध वारसा लाभलेला. जवळ जवळ वीस वर्षे त्यांनी त्या शाळेत अध्यापन केले होते. जवळच दोन किलोमीटर वर जयवंत दळवींचे गाव, पुढे नऊ किलोमीटर वर पाडगावकरांचे जिथे बालपण गेले ते गाव. या सगळ्या साहित्यिक पार्श्वभूमीचे ठसे मनावर न उमटले तर नवलच! 

पुढे मुंबईला स्थलांतर झाल्यावर मात्र वाचन हळू हळू मागे पडले. अभ्यासासाठी द्यावा लागणारा वेळ आणि वाचन यांची सांगड होईना. त्यात इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजी पुस्तकांचे आणि वर्तमानपत्रांचे वाचन जोमाने सुरू करावे लागले. आतापर्यत नुसत्या पानावरुन नजर फिरवीत तीन तासात एका पुस्तकाचा एका बैठकीत फडशा पाडणाऱ्याला इंग्रजी पुस्तक संपवायला कोण कष्ट घ्यावे लागत होते पण नंतर नंतर ते ही अंगवळणी पडले. पॅपीलॉन, द रुट्स या सारखी पुस्तके त्यावेळी एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायची. मराठीतील अनेकविध आत्मचरित्रांनी अनुभव विश्व खूप समृद्ध केले. 

आज मागे वळून पाहताना जाणवते की आज आपण जे काही आहोत ते निव्वळ पुस्तकामुळे.
आज मुंबईमध्ये चक्क जागे अभावी पुस्तके विकत घेऊ शकत नाही म्हणून खंत वाटते. तरी एक खोली पुस्तकांनी भरलेली आहे! त्यात जास्तीत जास्त पुस्तके इंजिनिरिंग आणि मेडिकल ची आहेत हे सांगायला नको! पण असे असूनही आजही एखादे चांगले पुस्तक दिसले की ते विकत घेण्याचा मोह आवरता घेता येत नाही!

No comments: