Pages

Friday, October 04, 2019

रोपटे

2015 मध्ये एके दिवशी बाल्कनी मधल्या बागेत एक छोटेसे रोपटे गुलाबाच्या कुंडीत उगवलेले दिसले. मी तर  कोणत्याच बिया कुंडीत टाकल्याचे आठवत नव्हते. रोपटे थोडेसे मोठे झाल्यावर वाटले की पेरूचे झाड असावे पण पानांना वास पेरूच्या झाडांसारखा नव्हता. झाड जस जसे मोठे होऊ लागले तसे कुंडीतले गुलाबाचे  झाड सुकून गेले. त्यानंतर ते झाड अधिकच जोमाने वाढू लागले. अनेकांना फोटो पाठवून ते झाड कोणते असावे असे विचारले पण कुणीही ठाम पणे मला पटेल असे उत्तर नाही देऊ शकले. झाडाचा बुंधा देखील पेरुच्या झाडासारखा गुळगुळीत! झाडाला कुंडी अपुरी पडणार असे दिसू लागले.

एका वर्षाने वृक्षारोपणाच्या निमित्ताने मी ते झाड विद्यापीठाच्या आवारात माझ्या केबिन मधून दिसेल असे लावले. जाता येता सहज पाणी पण देता येईल अशा ठिकाणी.

सकाळी झाड नेते वेळी मुलगा म्हणाला 'राहूदे ना बाबा ते झाड घरीच कुंडीमध्ये'
मी त्याला म्हणालो " झाड मोठे झालेय रे..नाही पुरेशी पडायची कुंडी त्याला थोड्या दिवसांनी.. मग त्याची वाढ नाही होणार"
त्यालाही त्याला ते पटले..

कुठेतरी विचार चमकून गेला की उद्या त्याला  देखील नवी क्षितिजे खुणावतील. त्याचे विश्व विस्तारेल ...हे सर्व होत असताना आपल्या परीने आम्ही दोघे त्याच्या असंच जवळ असायला हवेत ... शेवटी झाड काय किंवा नाते काय.. पाळे-मुळे ही घट्ट असावीच लागतात.

२०१९ मध्ये तीन वर्षे  झाली झाडाला. मी महिन्याच्या सुट्टीत माझ्या एका सहकर्मीने फोटो पाठवला आणि लिहिले होते "सर, आपकी मेहनत रंग लायी ... झाडाला पेरू लागलेत !"

No comments: