Pages

Tuesday, October 15, 2019

"सब 2" मॅरेथॉन बनले सत्य

  

भारतात आजकाल  मॅरेथॉन लोकप्रिय होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस भारतातील विविध ठिकाणी मॅरेथॉन चे आयोजन होते आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो. या मॅरेथॉन पळणाऱ्यांमध्ये  १२ ऑक्टोबर २०१९ रोजी एकच खळबळ माजली . त्या दिवशी जे आतापर्यंत अशक्य मानले जात होते ते सत्यात उतरले होते. ती अशक्य वाटणारी गोष्ट म्हणजे 26.2 मैलांची पूर्ण मॅरेथॉन 2 तासांच्या आत ("सब - 2" ) पूर्ण करायची .

व्हिएन्ना येथे 26.2  मैलाची  मॅरेथॉन 1 तास 59 मिनिटे आणि 40 सेकंदात  पूर्ण करून एलिउड किपचोज ने  २ तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा जगातील पहिला माणूस ठरला. दोन तासांचे लक्ष्य गाठण्यासाठी त्याला दर 17.08 सेकंदात १०० मीटर अंतर किंवा सरासरी २१.१ किलोमीटर प्रति तास वेगाने धावावे लागले. या अलौकिक पराक्रमास जगातील सर्वोत्कृष्ट ऍथलिट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 42 धावपटूंच्या पथकाने सहाय्य केले.  34-वर्षीय केनियाच्या या धावपटूने एक असा टप्पा पार केलाय की असे करणे कुणाला शक्य होणार नाही असे वाटत होते.  त्याने प्रत्येक मैलांसाठी सरासरी 4.34 सेकंद घेतले.  

किपचोज  बरोबर रस्त्यावर जगातील  सर्वोत्तम ऍथलिट्सचा संपूर्ण ताफा धावत होता .  हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी पाच धावपटू व्ही आकारात त्याच्यासमोर धावत होते आणखी दोन धावपटू त्याच्या मागे धावत होते. प्रत्येक 9.6 किमी (6 मैलांच्या) लॅप्समध्ये हे धावपटू बदलत होते. एक इलेक्ट्रिक कारने वर बसवलेली लेझर प्रणाली पेसरनी कुठे धावावे  हे दर्शवित होती.

पेसर्स म्हणून ज्यांचा सहभाग होता त्यात  ऑलिम्पिक 5000 मीटर रौप्यपदक विजेता पॉल चेलिमो, ऑलिम्पिक 1500 मीटर विजेता मॅथ्यू सेंट्रोझित्झ, तसेच नॉर्वेचे इंग्रेब्रिग्त्सेन बंधू: जाकोब, फिलिप आणि हेन्रिक यांचा समावेश आहे. पाच वेळा ऑलिम्पियन बर्नार्ड लागटही या यात सहभागी होता.

किपचोजला आधीपासूनच आतापर्यंतचा महान मॅरेथॉन रनर म्हणून ओळखले जाते. रासायनिक कंपनी इनियॉसने आयोजित केलेल्या नायके-प्रायोजित कार्यक्रमाच्या तयारीसाठी, किपचोजने खूप मेहनत घेतली होती.  व्हिएन्नामधील  प्रयत्नांना अधिकृत जागतिक विक्रम म्हणून मान्यता मिळणार नाही कारण एकतर  ती खुली स्पर्धा नव्हती आणि पेसर्स सतत बदलत होते.

किपचोजने 2016 मध्ये ऑलिम्पिक मॅरेथॉन जिंकली होती आणि 16 सप्टेंबर 2018 रोजी बर्लिन मॅरेथॉनमध्ये मॅरेथॉनचा ​​विश्वविक्रम 2:01:39 केला होता . त्याने त्यावेळी मागील विश्वविक्रम 1 मिनिट 18 सेकंदाने मोडला. 1967 पासून मॅरेथॉनच्या जागतिक विक्रमी वेळेतली ही सर्वात मोठी सुधारणा होती. परंतु किपचोजच्या म्हणण्यानुसार ऑलिम्पिक पदकांसह त्याला मिळालेल्या इतर पारितोषिकांपेक्षा 2 तासांच्या आता मॅरेथॉन पूर्ण करण्याचे यश त्याच्यासाठी अधिक मोलाचे आहे.

No comments: