Pages

Friday, September 20, 2019

मी ,परी आणि प्रवास

मागच्या वर्षी म्हणजे २०१७ ला मी आणि "परी" ने   केलेल्या मुंबई ते माही(केरळ) अशा जवळ जवळ 1100 किलोमीटर च्या प्रवासाची आठवण फेसबुक ने करून दिली.
"परी" म्हणजे आमची लॅबडोर जातीची कुत्री. खरे तर प्राण्यांची आवड असताना सुद्धा मुंबई मध्ये फ्लॅट मध्ये कुत्रा पाळायचे टाळले होते. पण परीचे आमच्या घरी येणे हे विधिलिखित होते. जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा सहा महिन्यांची असेल. पहिल्या मालकिणीने हौसेने हट्ट करून नवऱ्याकडून कुत्र्याचे पिल्लू आणून  घेऊन  त्याचे नाव  "परी" ठेवलेले. पण नंतर या पिल्लावरून होणाऱ्या नवरा बायकोच्या भांडणात  परीची मात्र खूप हेळसांड झाली होती. तिला व्हॅक्सिनेशन तर सोडाच पण खायलासुद्धा तिला नीट दिले गेले नव्हते. वजन पण कमी होते. शेवटी नवऱ्याने परीला घराबाहेर काढायचे ठरवलेच. माझ्या मेहुण्याने तिला आमच्या घरी आणले . एके दिवशी कामावरून घरी गेलो तर हे पिल्लू हॉल मध्ये एक कोपरा व्यापून छान झोपलेलं.  मग ती घरातलाच एक भाग झाली. माझा SIES मधला वर्गमित्र आणि आता नवी मुंबईतील प्रख्यात व्हेटर्नरी डॉक्टर आदित्यच्या देखरेखीखाली तिची वाढ पण नंतर व्यवस्थित झाली. आता एप्रिल मध्ये ती चार  वर्षांची होईल. आता तर ती घरातलाच एक मेंबर बनलीय. आम्ही जिथे जिथे जाऊ तेथे तेथे ती सोबत असते. किंबहुना आमचे प्लॅन्स पण तिच्या सोयी नुसार बनतात!
गेल्या वर्षी घरातली सर्व मंडळी लग्नासाठी अगोदरच केरळ ला पोहचलेली. मी थोडा उशिरा निघणार होतो पण माझ्यासमोर परी ला कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. आतापर्यंत बाहेर जाताना बोर्डिंगमध्ये किंवा कॅनल मध्ये ठेवण्याचा प्रश्न न आल्यामुळे कुठे चांगली व्यवस्था आहे हेही माहिती नव्हते आणि तसे सोडून जायला मन पण तयार होत नव्हते.
लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. शेवटी मी कार घेऊन जायचे ठरवले. एकट्याने परीला घेऊन एवढ्या दूरचा प्रवास करणे खरेतर कठीण होते म्हणून  " माझ्या बरोबर कुणी येणार का?" असे सगळे मित्रमंडळी आणि नातेवाईकांना विचारून झाले पण कुणालाच शक्य झाले नाही. बेंगलोर ला राहणाऱ्या माझ्या मोठ्या मेहुण्याने शक्य झाले तर हुबळीला भेटतो म्हणून सांगितले. तो आला तर मला एकट्याला सलग जवळ जवळ 24 तास गाडी चालवावी लागणार नव्हती!

निघण्या अगोदर लांबच्या प्रवासात कुत्र्यांची कोणती काळजी घ्यावी हे वाचून झाले! दर दोन तासांनी ब्रेक घेऊन थोडेसे फिरवून आणावे असे बरेच ठिकाणी वाचण्यात आले. दुपारी साडे बाराच्या सुमारास मी निघालो. परीसाठी  उकडलेले चिकन बरोबर घेतले होते. पाठीमागची पूर्ण सीट तिचीच असल्याने सुरुवातीचा उत्साह मावळताच तिने मस्तपैकी ताणून दिली. पहिला ब्रेक लोणावळा घाट सुरू होण्याच्या आधीच्या फूड मॉल मध्ये घेतला. तिला फिरवून आणताना अजून एक असाच प्रवासी कुत्रा भेटल्याने स्वारी खुश झाली!  दुसरा ब्रेक पुण्यानंतर साताऱ्याच्या अलीकडे घेतला. रस्त्याच्या कडेलाच गाडी थांबवुन तिला थोडे फिरवून आणले.गाडी थांबली रे थांबली की ही उठून बाहेर जाण्यासाठी तयार असायची. त्यानंतर मात्र मी लवकर कुठे थांबायचे नाही ठरवले. कोल्हापुर, बेळगाव होऊन धारवाडजवळ पोहचेपर्यंत साडे नऊ दहा वाजले. रस्त्याच्या कडेला एका धाबे वजा हॉटेल पाशी गाडी थांबवून मी परीला फिरवून आणले आणि तिचे चिकन देण्यासाठी म्हणून डिकीमधून डब्बा काढला. थोडेसे तिला थाळीत दिले असेन एवढ्यात तो डब्बा माझ्या हातातून निसटला आणि पूर्ण तिच्या अंगावर रिकामी झाला!! आता अशा अवस्थेत तिला नुसते पुसून काढून भागणार नव्हते. अशाने गाडीत पूर्ण वास पसरला असता! मग तेथल्याच दुकानावरून शाम्पू, टॉवेल असा सारा सरंजाम विकत घेऊन तिला व्यवस्थित आंघोळ तर घातलीच पण पूर्ण कोरडे होई पर्यंत पुसून पण काढावे लागले!

एव्हाना माझा मेहुणा जो मला  भेटणार होता तो पण येऊ शकणार नाही हे निश्चित झाले होते. त्यामुळे आता उरलेला संपूर्ण प्रवास मला एकट्यालाच करायला लागणार होता. एव्हाना झालेल्या प्रकारामुळे बराच वेळ पण वाया गेला होता. कसे बसे मी दोघांचेही जेवण आटपून पुढच्या प्रवासाला निघालो.
आतापर्यत पुणे बंगलोर चौपदरी महामार्गावर गाडी चालवली होती त्यामुळे फारसा त्रास झाला नव्हता पण आता यापुढे खरी कसोटी होती. हुबळी कारवार  रस्ता  फारसा रुंद नाही. दुतर्फा वाहतून आणि घाट रस्ता असल्याने पूर्णपणे जागरूक राहणे गरजेचे होते. एव्हाना मुंबईहून निघून बारा तास उलटून गेले होते. ब्रेक घेण्याचा विचार, NH66 वर (पश्चिम किनाऱ्याने मुंबई ते कन्याकुमारी जाणारा महामार्ग)पोहचल्यानंतरच करू शकणार होतो. जेव्हा जेव्हा थोडेसे थकल्यासारखे वाटत होते तेव्हा तेव्हा एखादा पेट्रोल पंप बघून गाडी बाजूला घेऊन दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेत होतो. कर्नाटकात अशाच एका पेट्रोल पंपावर थांबलो असताना तिथला वाँचमन मला गाडी काढण्यासाठी सांगू लागला. प्रवासाच्या क्षीणाने अगोदरच त्रासून गेल्यामुळे माझा पारा जरा चढलेलाच होता. पण रात्रीच्या वेळी अनोळखी ठिकाणी भांडण करणे बरोबर नसते ठरले त्यामुळे मी पोलीस असल्याची थाप ठोकून दिली! ही मात्रा मात्र बरोबर लागू  पडली! खूप वेळ गाडी चालवल्यावर जर झोप येते आहे असे वाटले तर लगेच गाडी सुरक्षित जागी बाजूला घेऊन डुलकी काढली की तुम्ही एकदम फ्रेश होता. पण तशीच गाडी दामटत  राहिला तर अपघात होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते.

जवळ जवळ रात्री तीन च्या दरम्यान मी कुमटा शहरापासून वीसेक किलोमीटर आधी नॅशनल हायवे 66 ला लागलो. आता मात्र पाठीची वाट लागली होती. थोडा वेळ पण बसणे अशक्य झाले होते. झोपेची पण नितांत आवश्यकता भासत होती. सीट पूर्ण पाठीमागे करून झोप काढण्याचा माझा प्रयत्न परीमुळे फोल ठरत होता. गाडी थांबवताच आता उतरायला मिळणार म्हणून उत्साहित होऊन ती एवढ्या मोठ्याने श्वास घ्यायला लागायची की पूर्ण गाडी त्यामुळे हलायची! आशा स्थितीत झोप लागणे अशक्य होते. आता रस्त्यावर दिसेल त्या हॉटेल मध्ये, मी रूम मिळते का चौकशी करत सुटलो.  बाहेर रिसेप्शनवर झोपलेल्या माणसाला उठवायचे आणि रूमची चौकशी करायची म्हणजे वेळखाऊ काम होते. कधी हॉटेल फुल आहे तर कधी pets ना परवानगी नाही म्हणून नकार असे चार पाचदा झाल्यावर मात्र खूप वैतागलो. कुठून हा सगळी उठाठेव केली हा प्रश्न मी स्वतःला किती तरी वेळा विचारला असेन! अजून जवळ जवळ पाऊणे चारशे किलोमीटर किंवा नऊ तासाचा प्रवास बाकी होता! NH66 वर तुमचा average स्पीड 40 च्या वर जाऊच शकत नाही! काही ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग गल्लीतल्या रस्त्या एवढा पण छोटा होतो. वैतागून मी पणजीला आईबाबांकडे घरी  जावे असा विचार पण केला. कुमट्या पासून पणजी 175 किलोमीटर आहे! रस्त्यावर कुठले हॉटेल दिसते का हे पहात मी पुढे पुढे जात राहिलो. शेवटी होन्नावर येथे एका हॉटेल मध्ये चार वाजण्याच्या  सुमारास रूम मिळाली.

त्या रिसेप्शन वरच्या माणसाने कुत्र्यासाहित मला राहायची परवानगी दिली याचा प्रथम माझा विश्वासच बसत नव्हता. मी दोनदा विचारून खात्री केली आणि मग आत गेलो. सलग सोळा तास गाडी चालवल्यावर मला झोपायला मिळणार होते. मी बेड वर पडलो तरी परीचे सर्वत्र हुंगून पाहण्याचे सोपस्कार चालूच होते. कपडे बदलायचे पण त्राण अंगात नव्हते त्यामुळे अंगावरच्या कपड्यांसाहित बेड वर लोटून दिले. जेमतेम चार तास मी झोपलो असेन. आठ वाजता मी उठलो. आता आवरून पुढच्या प्रवासाला निघायचे होते. पटापट सगळे सोपस्कार आटपून तयार झालो. विश्रांती मिळाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.
आता दिवसा गाडी चालवायची म्हणजे अँऔव्हरेज स्पीड कमी होणार. सकाळी लवकर निघालो तरच लग्नाच्या आधीच्या रात्री जी पार्टी असते ती अटेंड करायला मिळणार होती. केरळ मध्ये लग्न साधे पणाने होते पण या आदल्या दिवशीच्या पार्टीला सारे गाव, सगेसोयरे, लोटतात! त्यामुळे मला संध्याकाळ पर्यंत घरी पोहचणे आवश्यक होते. होन्नावर वरून निघून उडुपी, भटकळ, कुंदापुर, मंगलोर करत मी दुपारी केरळ च्या पहिल्या जिल्ह्यात म्हणजे कासारकोड मध्ये प्रवेश केला. केरळ मध्ये पोहचल्या पोहचल्या एक गोष्ट जाणवते म्हणजे राष्ट्रीय महामार्ग हा एकदम अरुंद होऊन जातो. त्या तसल्या रोड वर तुम्हाला तुफान वेगात चालणाऱ्या बसेस ना तोंड द्यायचे असते!

दुपारी जेवणाचा एक ब्रेक घेऊन संध्याकाळी पाच च्या सुमारास मी माहीला पोहचलो! माही हा खरे तर पुडूचेरी केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. घरी पोहचल्यावरचा आनंद माझ्यापेक्षा परीला जास्त झाला असणार! नंतर नंतर परी पण प्रवासाला एवढी कंटाळली होती की मध्ये मध्ये गाडीतून उतरून फिरवून आणल्यावर परत गाडीत बसण्यासाठी ती नाखूष असायची! एक दोन वेळा तर मला जबरदस्तीने उचलून गाडीत तिला घालावे लागले होते! एवढ्या मोठ्या प्रवासाचा शीण घालवायला पुढचे आठ दिवस, मासे आणि ऐसपैस जागा या दोन्ही गोष्टी पुरेशा होत्या हे ही खरे!
आठ दिवसानंतर परतीच्या प्रवासात आमच्याबरोबर माझा मेहुणा असल्याने फारसा त्रास जाणवला नाही. दोघे असल्यामुळे प्रवासादरम्यान बेकल फोर्टला पण भेट देऊ शकलो. गाडीची पाठीमागची पूर्ण सीट वापरायला मिळाल्यामुळे परी ला पण प्रवासाचा त्रास एवढा जाणवला नसावा. प्रवासादरम्यान तिचे जेवण नॉर्मल होते. आज परी चार वर्षाची आहे पण तो प्रवासाचा उत्साह तिचा तसाच आहे. गाडीत बसायला तिला प्रचंड आवडते. गाडीच्या लॉक चा पीक् पीक् आवाज ऐकला  की हिचे कान टवकारून गाडीच्या दिशेने ओढणे सुरू होते आणि दरवाजा उघडताच टुणकन आत उडी मारून आपली जागा अडवले!

No comments: