Pages

Sunday, September 08, 2019

दोन अश्रू त्या विश्वाम्भरासाठी!!

चंद्रयान मोहिमेचा शेवटच्या टप्प्यावर आपल्याला अपयश आले आणि सोशल मीडियावर मुख्य विषयाव्यतिरिक्त इतर अनेक पोस्ट ना ऊत आला आहे. ज्यांना तंत्रज्ञानाचा गंध ही नाही असे शब्दपंडित मग  "मिठी मारून रडणे इस्रो सारख्या संस्थेच्या प्रमुखास कसे शोभत नाही" असा विचार मांडताना दिसत आहेत!  काही मंडळींसाठी "रडणे" म्हणजे "भेकडपणा" हे समीकरण असते. त्यात खरेतर त्यांचा दोष नाही. समाजामध्ये रडणे हे मनाच्या कमकुवत पणाचे लक्षण आहे हा विचार लहानपणापासून विशेषतः मुलांच्या मनावर बिंबवला जातो हेच अशा विचारांमागचे कारण.
जेव्हा कुणी रडतो त्यामागे त्याचे स्वतःशी असलेले सहजसुंदर नाते कुणी लक्षात घेत नाही. किती लोक आपल्या भावनांशी प्रामाणिक असतात? भावनांचे प्रदर्शन न करणे यात जर पुरुषार्थ असेल तर ते बाकीच्या साऱ्या भावनांना पण लागू व्हावे!
त्याच पोस्ट मध्ये नासाचे शास्त्रज्ञ कधी असे रडले नाहीत असा दाखला पण देण्यात आला होता! (ते रडले असते तर इस्रो च्या प्रमुखांचे रडणे समर्थनीय ठरले असते काय?) नासाचे शास्त्रज्ञ राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडले नसतीलही पण त्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या ओबामांना कॅमेऱ्यासमोर रडताना कित्येकदा जगाने पाहिलंय. अमेरिकेसारख्या  बलाढ्य राष्ट्राच्या प्रमुखास असे रडणे शोभत नाही असे कुणी बोलल्याचे पाहिले नाही!
मानसशास्त्रा मध्ये “अश्रूंचा दोन टप्प्याचा सिद्धांत” प्रस्तावित केला आहे, ज्यामध्ये रडणे हे तणावग्रस्त किंवा भावनिक घटनेनंतर जे जलद भावनिक स्थित्यंतर घडते त्याला आपल्या शरीराने दिलेला  प्रतिसाद असतो असे सांगितले आहे. त्यामुळे आपण जेव्हा "रडणे" या गोष्टीला अशा नजरेतून पाहतो तेव्हा एका नैसर्गिक मानवी भावनेला स्वतःपासून दूर करत असतो.
चांद्रयान सारख्या जटिल प्रोजेक्ट साठी इस्रोतील कित्येक शास्त्रज्ञांनी आपल्या आयुष्यातील कित्येक तास मोजले असतील. अशा मोहिमेकरिता अनंत अडचणी उभ्या ठाकतात त्या सर्वांवर मात करत ते या टप्प्यावर येऊन पोहचले होते. संशोधन करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतात किती अडचणी  येतात हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवले असेल. कित्येकदा एखादी चिप उपलब्ध होते पण त्याचे सखोल specifications निर्माती कंपनी उपलब्ध करून देत नाही. जिथे चीन मध्ये 24 चिप फॅब्रिकेशन लॅब्ज आहेत तिथे भारतात फक्त दोन लॅब्ज आहेत. अशा परीस्थितीत काम करताना इस्रोच्या संशोधकांनी आपले सर्वस्व पणाला लावले असणार हे नक्की आणि तेवढाच पाठिंबा त्यांना सरकार कडूनही मिळाला असणार हे आजची घटना दाखवून देते.
- दिनेश गिरप

No comments: