Pages

Sunday, May 12, 2019

हॅप्पी मदर्स डे!

रविवारची सकाळ तशी थोडीशी आळशीच असते.  त्यामुळे लवकर उठायचा प्रश्नच नव्हता.  सकाळी सकाळी दाराची बेल वाजली!
‘रविवारी… एवढ्या सकाळी कोण आलंय?’ मनाशी पुटपुटत त्याने दार उघडले.
तू? ...आज?... अशी?.. अचानक? त्याने गोंधळलेल्या अवस्थेत प्रश्न केले
‘अरे हो हो...मला आत तर येऊ देशील की नाही?’ तिने त्याच्याकडे मिश्किल नजरेने पहात  विचारले.
‘हॉल मध्ये किती पसारा करून ठेवलायास हा?’ आत आल्या आल्या तिने विचारले
‘झ.. झालाय खरा…’ तो चाचरत म्हणाला .. किचन मधल्या पसऱ्यासाठी आता काय काय बोलले जाणार त्याची तयारी त्याने त्याचवेळी केली!
‘तू आज इथे कशी?’
‘ अरे असा काय करतोस? आज मदर्स डे आहे ना?’
खट्याळ हसत तिने विचारले.
“ओह.. हो आहे ना .. “  त्याला आठवले, मदर्स डे च्या निमित्ताने कालच तिने त्याला आईला फोन करण्याविषयी  बजावून सांगितले होते.
‘अरे आज मदर्स डे,  तू आईला फोन करणार ..तुला तिच्या हातच्या पुरणपोळीची आठवण येणार.. मग मी विचार केला आईच्या या लहान बाळाचे लाड मलाच पुरवावे लागणार ना?’
तिच्या या वाक्याने तो किती सुखावला! आयुष्यभराचा ठेवा त्याला तेथेच सापडला..
‘हॅलो… पुरणपोळ्यांसाठी लागणारे सामान आहे का किचन मध्ये?’ तिच्या प्रश्नाने तो भानावर आला!
‘नाही.. मी हा गेलो आणि घेऊन आलो!’ तो एवढ्या उत्साहात म्हणाला की जणू त्याचा पुन्हा जन्म झाला!
हॅपी मदर्स डे!!!
©दिनेश गिरप  

No comments: