Pages

Wednesday, April 26, 2017

एक रुपए से ईन्सान की कीमत बढती है या कम होती है?

रविवार ची सकाळ थोडी आळसावलेली असते. रविवारी सकाळी लवकर  उठून मी पेट्रोलपंप वर गेलोय असे फार कमी वेळा होते. त्या दिवशी सव्वीस जानेवारीला युनिव्हर्सिटी मध्ये झेंडावंदनाला जाताना पेट्रोल पंप वर थांबलो. सकाळची वेळ आणि त्यात बँक हॉलिडे त्यामुळे फारशी वर्दळ नव्हती. पंपावर मोठ्या आवाजात देशभक्ती पर गाणी चालू होती.  

नेहमी त्याच पेट्रोल पंप वर पेट्रोल भरत असल्याने तेथील चेहरे ओळखीचे झालेत. त्यातलाच हा एक अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा. पाच फूट उंच, सडपातळ, सावळ्या वर्णाचा हा मुलगा गाडी आली की मोठ्या उत्साहाने हातवारे करून गाडी लावायला मदत करणारा. सतत काही न काही बडबड करणारा पण कामात अजिबात टंगळमंगळ नाही. ड्युटी आत्ता सुरू झालेली असुदे की संपत आलेली, हा तेवढ्याच उत्साहात दिसायचा.  गाडी समोर लागली की टाकीचे झाकण उघडे पर्यंत याला धीर नसायचा. मागे एकदा असेच गाडी लावल्या लावल्या पेट्रोल च्या टाकी चे झाकण लवकर उघडावे म्हणून त्याने दोन तीनदा गाडीवर थापा मारल्या होत्या तेव्हा त्याला ओरडलो होतो. पण आज मी त्याला पाहिल्या बरोबर ओळखीचे हसलो.

"साब, सुबह सुबह ऐसे कोई मुस्कुराता है तो अच्छा लगता है! सब ने ऐसेही हंसते रहना चाहिये"तो मला म्हणाला. 

"हां भाई, मुस्कुराते रहना ही जिंदगी है" मी पण एक डायलॉग ठोकून दिला!

"साब, आप ही बताईये- एक रुपये से ईन्सान कि किमत बढती है या कम होती है?" त्याने अचानक प्रश्न केला! 

त्याचा प्रश्न ऐकून काय झाले असावे माझ्या लगेच लक्षात आले. माझ्या आधीच्या गाडीवाल्यावरोबर त्याचे मघाशी काहीतरी बोलणे चालू होते. 
सुट्टे नसल्याच्या नावाखाली पेट्रोलपंप वर काम करण्याऱ्यांचा एखादा रुपया कमी देण्याकडे नेहमी कल असतो. याने पण तसेच काहीसे केले असणार आणि समोरच्याने चांगले झापले असणार!

आता मी उत्तर काय देतो यावर माझी यावेळची (आणि यापुढे प्रत्येक वेळी पेट्रोल भरायला आलो की ) "कीमत" ठरणार असा धोका मला स्पष्ट दिसत होता! तसे मी बऱ्याचदा त्याला टीप द्यायचो पण काही काही पेट्रोल पंप वर कामचुकार पणा करणारा स्टाफ, पेट्रोल मध्ये होणारी गडबड यामुळे टीप देणे हा विचारही आपल्याला शिवत नाही. 

बोलो सर, एक रुपये से ईन्सान कि किमत बढती है या कम होती है?" त्याने पुन्हा विचारले. 

 "उसकी कीमत उसे ही तय करने दो| तुम क्यों दुःखी हो रहे हो?" मी समजावण्याचा सुरात म्हणालो.

"नहीं, फिर भी आप बताईये... एक रुपये से...." तो आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता... मला आता हा "एक चुटकी सिंदूर" च्या धर्तीवर "एक रुपयेकी कीमत तुम क्या जानो राजेश बाबू" असा डायलॉग ऐकवेल की काय अशी शंका आली!!

त्याच्या दृष्टीने विचार केला तर ते बरोबर होते. हजार दोन हजाराचे पेट्रोल भरणाऱ्याला एका रुपयाने काय फरक पडणार असा त्याचा सरळ सोपा विचार. असे दिवसभरात शंभरेक रुपये जमा झाले तर त्याच्यासाठी  मात्र तो निम्मे पगार! ही तफावत कधी दूर होईल असे वाटत नाही आणि जो पर्यंत ही अशी तफावत राहील तो पर्यंत माणसाची किंमत पैशांवर तोलली जाईल हे ही तेवढेच खरे!  

 "जाने दो भाई.. तुम अपना काम अच्छे से करते रहो और मुस्कुराते रहो " म्हणत मी गाडी सुरु केली!

(हा प्रसंग काही वर्षांपूर्वीचा. हातावर पोट असलेल्या या कामगार वर्गाची काय अवस्था इतक्या दिवसांच्या लॉकडाऊन ने केली असेल विचार करवत नाही. हा वर्ग दोन वेळच्या जेवणाची चिंता करत असेल आणि त्याच्या वरच्या वर्गाच्या चिंता पण त्यांच्या त्यांच्या 'किमती' प्रमाणेच कमी-अधिक आणि खऱ्या-खोट्या असतील हे ही तेवढेच खरे )
- श्रीस्वासम

No comments: