Pages

Tuesday, May 12, 2015

शिरोडा वेळागर भेट

खुप साऱ्या वर्षांनी शिरोडयाच्या समुद्रकिनारी म्हणजे वेळागरावर जायचा योग आला. तब्बल पंचवीस सव्विस वर्षापूर्वीचे दिवस आठवले. माझ्या 9 वर्षाच्या मुलास मी एक एक आठवणी सांगत होतो.
किनाऱ्यावर जायच्या रस्त्यावर डाव्या बाजूला भली मोठी मोकळी जाग आहे. तिथे कुणी शेती करत असल्याचे आठवत नाही. ती आमची सीजन बॉल क्रिकेट खेळायची जागा होती. ती जागा थोडीशी सखल असल्यामुळे बऱ्यापैकी हिरवळ असायची. तेथे मॅट टाकून क्रिकेट खेळायचो. साऱ्या मित्रानी मिळून क्रिकेटचे किट्स घेतले होते. मुलाला हे सारे सांगितले तर तो विचारतो की ते किट आता कुठे आहे! म्हटले, माझा एक मित्र अजूनही क्रिकेट खेळतो.. त्याच्या कड़े आहे! नाही म्हटले तरी  यातली अर्धी गोष्ट खरी आहे. माझा गावचा एक वर्ग मित्र "आशिष" अजूनही म्हणजे वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा विशिच्या जोमाने क्रिकेट खेळतो. कांगा लीग ला राम राम ठोकल्यावर गावी स्थायिक झाल्यानंतर नोकरी करत आणि मुख्यत्वे दुखपतींचा सामना करत त्याने आपले क्रिकेट सुरु ठेवले.
शिरोडयाच्या किनाऱ्यावर सुरुच्या झाडांचे छान बन आहे. आता इतक्या वर्षानंतर झाडे विरळ झाली आहेत पण पूर्वी घनदाट झाडी होती. दहावीचा अभ्यास आम्ही सारे मित्र मिळून या बनात करायचो ते आठवले. आपली आपली पुस्तके घेऊन सायकल वर टांग मारुन आम्हा मित्रांचा ग्रुप तिथे दुपारी पोहचायचा आणि एक एका मोठाल्या झाडाच्या बुंध्याला टेकुन आम्ही संध्याकाळ पर्यंत अभ्यास करायचो. संध्याकाळ झाल्यावर समुद्रावरचे पाण्यात डुंबणे किंवा विस्तीर्ण किनाऱ्या वरचा फेरफटका खुप आनंद देऊन जायचा.
कधी कधी मित्रांचा मिळून पूर्ण दिवसाचा प्लॅन बनायचा. शिरोडयापासून जवळच सागरतीर्थ म्हणून आरवलीचा सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. तेथे पूर्ण दिवस घालावायचा. घरुन जेवण बनवून आणायचे आणि बरोबर खुप सारे खायचे पदार्थ. दिवसभर समुद्राच्या पाण्यात डुंबायचे आणि अहोटी सुरु झाली की किनाऱ्यावरच्या कडक वाळूत क्रिकेट खेळायचे. त्या दिवशी सुरुच्या बनात बसून केलेल्या जेवणाची सर इतरवेळी यायची नाही.
वि. स. खांडेकर ज्या टेकडीवर बसून लिखाण करायचे ती "भिके डोंगरी" टेकडी येथेच आहे. तेथून विहंगम दृष्य दिसते. शाळेत असताना वचनाचा भयंकर नाद...एका मागोमाग एक अशी विविध विषयांवरची पुस्तके वाचायचो.  दर दिवशी खटखटे  वाचनालयाची फेरी चुकत नसे. मी ज्या शाळेत जायचो त्या ट्यूटोरियल हायस्कूल मध्ये खांडेकरानी कित्येक वर्षे अध्यापन केले होते. जेव्हा जेव्हा त्या टेकडीवर जाणे व्हायचे तेव्हा तेव्हा  वि स खांडेकर तेथे बसून लिहित आहेत असा आभास व्हायचा.
आता काळ बदलतोय आणि एवढ्या वर्षे जैसे थे असलेला मालवणी मुलुख सुद्धा बदलतोय. पर्यटनाच्या नावाखाली किनाऱ्यालगत रिसॉर्ट्स उभारली जात आहेत. शिरोडा ते वेळागर या रस्त्यावर  छोटी छोटी होटेल्स दिसली. किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स चालु केलेले आढळले. उंटाला पाहुन तर धन्य झालो. थोड्या फार फरकाने हाच प्रकार मी दापोली, दिवे आगार, हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर पण पहिलाय. पण सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर पर्यटनसाठी निव्वळ हे टिपिकल गोवा मॉडेल कितपत यशस्वी होईल याबाबत मी साशंक आहे. त्यासाठी तारकर्ली मालवण येथे ज्या प्रकारे वेगवेगळे पर्याय उपलब्ध केलेले आहेत तसे काहीसे पर्याय येथील प्रत्येक किनाऱ्यांवर उपलब्ध करुन द्यायला हवेत.

No comments: