Pages

Tuesday, March 17, 2015

कोकण रेल्वे अणि दंडवते

कोकण रेल्वेचे संगमेश्वर स्थानक. समोरून येणाऱ्या गाड़ीमुळे आमची मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस सायडिंग ला थांबलेली. पाय मोकळे करण्यासाठी मी प्लॅटफ़ॉर्म वर उतरलो असताना पैंट्रीचे दोन कामगार आणि एक पैसेंजर यांच्या मधला हा  संवाद तुमचे नक्की मनोरंजन करेल.
कुणीतरी या पैंट्री कर्मचाऱ्यांची फोनवरुन त्यांच्या कंपनीला तक्रार केल्यामुळे ते त्रस्त होते. आपल्याला उत्तर भारतीय रेल्वे कामगार बघायाची सवय. कोकण रेल्वेच्या कृपेने समोरचे हे दोघे बहुदा कामाला लागलेले. त्यातला एक वैतागुन दुसऱ्याला सांगत होता " आता समोरून आलेल्या गाड़ीसाठी ही गाड़ी थांबवली म्हणून सुध्दा रेल्वे मंत्र्यांना तक्रार करा म्हणावे"
" लोकांचे काही खरे नाही... लोकं ते पण करतील" दुसऱ्याने त्याची री ओढली
(रेल्वे मंत्री  कोकणचे असल्याचा परिणाम असावा)
त्यावर समोर उभा असलेला प्रवाशाला बहुदा राहावले नाही त्यामुळे त्याना समजावयाच्या सुरात म्हणाला " नाही हो..मिळून मिसळून रहायचे ही कोकणची संस्कृती, म्हणून तर येथे एवढे बाहेरचे लोक येवून राहतात" ( बोलण्यात खंत होती का अभिमान ते कळले नाही)
दोघे कर्मचारी माना डोलावतात. त्यामुळे प्रवाशाला हुरुप येतो. तो पुढे चालू करतो " ही कोकण रेल्वे धावते आहे ती त्या मधु दंडवतेंमुळे. नाहीतर किती मंत्री आले आणि गेले. कुणाला जे नाही जमले ते त्यानी केले. कोकणातल्या प्रत्येक माणसाने कोकण रेल्वेत चढ़ते वेळी दंडवतेंची आठवण काढली पाहिजे. मी तर माझ्या घरातल्यांना असे बजावून ठेवले आहे"
समोरचे दोन कामगार आता पुरते भारावून गेलेले असतात. त्यातला एक- " बरोबर आसा, बाकी कोनी आठवण काडुनी काय नको, मी मातर प्रत्येक टायमाक आठवण हमखास काडतय !"
" मग? काढायलाच हवी..कोकणाने किती मोठ-मोठे नेते देशाला दिले आहेत माहिती आहे?" कोकणी माणूस गप्पा मारायला लागला की ग्रामपंचायतीच्या तात्या सरपंचापासून ते आता बराक ओबामा पर्यंत सगळ्यां विषयी तेवढयाच अधिकार वाणीने बोलू शकतो याचे मूर्तिमंत उदहारण होता तो प्रवासी!
मला वाटले आता तो बॅरिस्टर नाथ पै यांच्या पासून सुरु करणार म्हणून मी मनातल्या मनात तो आणखी कोणती नावे घेणार याचा अंदाज घेऊ लागलो!
तोवर प्रवाशाने नावे सांगायला सुरुवात केली.."मधु दंडवते...आणि ते आपले....."
पुढची नावे त्याला आठवेनात. थोड्या पॉज नंतर तो पुन्हा बोलता झाला  " आगरकर, टिळक... हे नक्की कोकणचे की बाहेरचे माहित नाही पण महाराष्ट्रने सुद्धा देशाला या सारखे कितीतरी नेते दिले!"
त्याची गाड़ी आता कोकणातून राज्यपातळी वर येऊन पोहचली होती.
तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला त्यामुळे त्याला देश आणि जागतिक पातळी गाठता आली नाही!

No comments: