Pages

Friday, April 24, 2020

वेंगुर्ल्याचे घर

मी दहा बारा वर्षाचा होई पर्यंत आमचे वेंगुर्ल्याचे घर मातीचे होते. तीन खोल्यांचे छोटेसे घर. घराच्या समोर पाण्याने भरलेला आड (न बांधलेली विहीर) बाजूने वाहणारा खळाळणारा ओहोळ, त्याच्या पलिकडे असलेली एक पूर्ण प्राथमिक शाळा आणि कुलदेवतेचे मंदिर, घराच्या मागे पुढे असलेली गर्द माडाची (नारळाची) झाडे, जेमतेम शंभर दीडशे मीटर वर असलेल्या पण झाडांच्या आड लपलेल्या समुद्राच्या लाटांचा सतत येणारा आवाज अशा  पार्श्वभूमीवरचे आमचे ते छोटेसे मातीचे घर एकदम त्या काळाला साजेसे होते! माझे आजोबा मुंबईत गिरणी कामगार. गावी पाच मुलांचा सांभाळ त्या छोट्याशा घरात एकट्या आजी ने केलेला. घरची शेती अशी काही नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आढळणारी  शेतीची अवजारे किंवा धान्याच्या गोण्या वगैरे असण्याचा संबंध नव्हता.

मी या घरात फारसा राहिलो नसलो तरी आमचे म्हणजेच कुटुंबाचे ते एकमेव स्वतःच्या  मालकीचे घर होते. मी लहानपणापासून आई सोबत हॉस्पिटल क्वार्टर्स मध्ये वाढलो पण सुट्टीत ‘घरी’ जायचे म्हटले की आमच्यासाठी हे वेंगुर्ल्याचेच घर असायचे.

मंगलोरी कौलांचे  चिरेबंदी घर हे १९८६ नंतर बांधले. त्या आधीच्या घराच्या भिंती मातीच्या आणि छप्पर नळ्यांचे होते.  मे महिन्यात "नळे परतणे" हा एक मोठा कार्यक्रम असायचा. पावसाळा आला की घराच्या पावळ्या नारळाच्या झावळी पासून बांधल्या जायच्या. त्यावरून अंगणात ठिबकणारे पावसाचे पाणी अंगणात नक्षीदार छोटे छोटे खड्डे तयार करायचे. मातीच्या भिंतींना पावसाच्या माऱ्यापासून वाचविण्यासाठी विणलेल्या झावळ्यांनी शाकारलेले होते पण त्यावेळी कोकणात एवढा तुफान पाऊस पडायचा की ओल जमिनीतून वर येऊन भिंतीमध्ये चढायची. जमिनी शेणाच्या होत्या त्यामुळे नित्य नियमाने शेणाने सारवणे आले. गावात ज्यांच्याकडे  गाईगुरे होती त्यांच्याकडून शेण आणले जायचे आणि मग घर आणि खळे दोन्ही सारवले जायचे. घरात मुख्यत्वेकरून हातानेच सारवले जायचे. सारवलेली जमीन सुकत असताना आणि सुकल्यावर सुद्धा जमिनीवर बोटांची  उमटलेली अर्धगोलाकार नक्षी छान दिसायची. खळ्यातले सारवणे केरसुणी ने केलेले चालायचे. कधी कधी छोटासा भाग सारवण्यासाठी मी मागून घेऊन माझी हौस पुरी करून घ्यायचो. तसे सारवणे माझ्यासाठी नवे नव्हते. सहावी पर्यंत मी ज्या शाळेत होतो तिथे शेणाची असलेली जमीन सारवण्याचे काम आम्हा मुलांकडेच असायचे.

घराच्या छपरावर उजेड येण्यासाठी मध्येच एखादी काच असे. जमिनीवर झोपलो असताना त्या काचेतून घरात येणारे उन्हाचे कवडसे पहात रहाणे मजेशीर वाटायचे. विशेषतः जेव्हा चुलीचा धूर घरात भरून राहिला असेल तेव्हा त्या कवडशामध्ये न्हाऊन निघालेल्या हजारो कणांचे नर्तन चालू असायचे तेव्हा. घराच्या बाजूला एक 'व्हाळ' होता. म्हणजे अजूनही आहे. 'व्हाळ' म्हणजे ओहोळ. हा व्हाळ बऱ्यापैकी मोठा आहे. थोडा पुढे जाऊन तो समुद्राला मिळतो. समुद्राच्या भरती ओहोटी बरोबर त्यातल्या कमी जास्त होणाऱ्या पाण्याची पातळी पहायला मजा येई. त्यावर सुरुवातीला लाकडाचा साकव (पूल) होता. सुरुवातीला बांबूचा असणारा हा साकव नंतर लोखंडाच्या स्ट्रक्चर वर फळ्या टाकून बनवण्यात आला. फक्त माणसे आणि सायकली त्यावरून ये जा करू शकत होत्या. आम्हा मुलांना त्याच्यावरून चालताना विशेष काळजी घ्यायला लागायची कारण त्याची मधलीच एखादी फळी निघालेली असायची.  आजी सांगायची की  पूर्वी एवढा  पाऊस पडायचा की व्हाळाचे पाणी तुडुंब भरून अंगणात यायचे. त्यात कुठून कुठून साप, विंचू वगैरे प्राणी पण वाहत यायचे. त्यामुळे कधी पूर आलाच की रात्री सगळे जागेच असायचे. सुदैवाने मी कधी असा पूर आलेला पाहीला नाही. याचे एक कारण की आजोबांनी मातीचा भराव घालून जमिनीची उंची वाढविली. त्यावेळी आम्ही घरातली सर्व लहान मोठी मंडळी आपापल्या परीने समुद्रकिनाऱ्यावरून वाळू आणत असू. ओहोळाचे पात्र पण थोडे रुंद आणि खोल केले. पूर्वी पावसाळ्यात पाण्याच्या तीव्रतेमुळे घराच्या बाजूची जमिन सारखी ढासळत असे. नंतर सिमेंट आणि दगडांनी ती बाजू बांधून घेतल्यावर ढासळणे बंद झाले.

सुरुवातीला घरी लाईटची जोडणी नव्हती त्यामुळे तो कंदिलांचा आणि रॉकेल च्या दिव्याचा प्रकाश अजून स्मरणात आहे. कंदील जेवढा शांत तेवणारा तेवढाच रॉकेल चा दिवा भणभण करणारा! तिसरीत वगैरे असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नवीन पुस्तके घ्यायला आजोबांबरोबर वेंगुर्ल्याच्या बाजारात गेलो होतो. घरापासून बाजार पाच सहा किलोमीटर होता. संध्याकाळची एस टी चुकल्यावर आजोबा आणि मी चालत घरी आलो होतो. केव्हा एकदा घरी  पोहचून ती नवीन पुस्तके वाचून काढतो असे झाले होते!  मग सर्व पुस्तके वाचून होई पर्यंत रोज रात्री कंदिलाच्या उजेडात नव्या पुस्तकांचा सुवास मनात साठवुन ठेवत वाचणे व्हायचे. प्रथम मराठी, त्यानंतर इतिहास, मग भूगोल वगैरे क्रम असायचा! नंतर लाईटचा मीटर लागल्यानंतर  होते ते पिवळा प्रकाश देणारे बल्ब.

घरासमोर  विहीर होती म्हणजे अजूनही आहेच. पण आत्ता ती पूर्ण पणे बांधलेली पक्की विहीर आहे पण पूर्वी बांधलेली नव्हती. अजूनही ही विहीर गावातल्या सर्व विहिरी आटल्या तरी आटत नाही. त्याकाळी विहिरीमध्ये एक मोठा झरा होता तो सतत खूप पाझरायचा. नवीन विहीर बांधताना त्याचे पाणी तात्पुरते बंद करण्यासाठी त्यावर एक दगड ठेवला गेला. जेव्हा तो दगड हटवला तेव्हा कळले की झऱ्याने आपला मार्ग बदललाय. आजूबाजूला खणून खूप प्रयत्न केले गेले पण तो झरा पूर्वरत नाही झाला. तरी सुद्धा आजही पाणी मुबलक असते. त्यावेळी नारळाच्या झाडांना शिंपण्यासाठी या विहिरीतील पाणीच वापरले जाई. ते काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकार वापरला जाई त्याला बोलीभाषेत “लाट” म्हणत. त्यामध्ये लाटेच्या (झाडाचे सरळ लाकूड ज्याची लांबी विहिरीच्या किंवा आडाच्या दीड पट असेल) एकबाजूला उभा बांबू बांधलेला असे ज्याला पाणी भरायचा कोळंबा (भांडे) लावलेला असे आणि दुसऱ्या बाजूला काउंटर वेट म्हणून दगड बांधलेले असत. ही लाट एका टेकू वर (जमिनीत रोवलेल्या  Y आकाराच्या लाकडावर मजबूत फांदीवर) बॅलन्स केलेली असे. एका बाजूच्या दगडाच्या वजनामुळे बेचक्यातल्या लाटेचे एक टोक जमिनीवरच राहाते. पाणी काढणारा माणूस उभा बांबू हातात पकडून विहिरीवर आडव्या टाकलेल्या एका झाडाच्या बुंध्यावरून किंवा फळी वरून चालत कोळंबा पाण्याच्या दिशेने खाली खेचायचा आणि भरल्यावर दुसऱ्या बाजूला असणारे दगडाचे वजन कोळंब्याला वर उचलायचे. कोळंबा खाली खेचताना सुरुवातीला त्यावर पायाने जोर दिला जायचा. हे पाणी मग एका छोट्या हौदात ओतले जायचे जेथून सर्व झाडांपर्यंत खेळवले जायचे. हे असे पाणी काढणे सर्वानाच शक्य नाही व्हायचे. ज्यांना लाट हा प्रकार प्रत्यक्षात पहायचा आहे त्यांच्यासाठी यु ट्यूब वर त्याचा व्हिडिओ खालील लिंक वर उपलब्ध आहे.  https://youtu.be/u9Z407G4G3w

उन्हाळ्यात मुंबईकरांचे आगमन व्हायचे मग घरातली पडवी गजबजलेली असायची. आमची खेळण्याची ती हक्काची जागा होती.  पडवीत फणस कापला की आम्ही मुले त्याच्या भोवती बसून गरे खायचो. दुपारी जेवण झाल्यावर मोठी माणसे वामकुक्षीसाठी तेथेच थोडी लवंडायची! खळ्या मध्ये (अंगणात) कोकमे आणि त्याच्या बिया वाळत घातलेल्या असायच्या. बाजूला एका परातीत फणसाच्या बिया पण वाळत असायच्या, पावसाळ्यातली बेगमी म्हणून.

१९८६ साली हे मातीचे घर पाडून त्या ठिकाणी चिऱ्याचे म्हणजे जांभ्या दगडाचे घर बांधले गेले. पहिल्यांदा छप्पर उतरवले गेले. बिना छप्पराचे लक्ख प्रकाशाने भरलेले घर वेगळेच भासत होते. त्या घरात एवढा प्रकाश बघायची डोळ्यांना सवय नव्हती. हळू हळू भिंती खाली आल्या. त्याजागी नवीन वास्तू उभी राहिली पण जुनी कायमची स्मरणात राहिली. त्या वयात आणि आता सुद्धा घराच्या भपकेबाज पणाच्या कल्पना मनाला कधी शिवल्या नाहीत. गावात काही  घरे तर नारळाच्या झावळ्यांपासून बनलेली होती.  पण ते ही “घरच” वाटायचे. आज्जीच्या तोंडून त्याच घरात राहून कशा परिस्थितीत पाच मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले हे ऐकले की त्या घर म्हणजे सर्वांच्या मागे रक्षणारसाठी उभा असलेला पर्वत वाटायचा. कोकणात पाचवीला पूजलेल्या भावाभावाच्या वाटण्यांनंतर पदरी पडलेल्या जमिनीच्या तुकड्यावर आजी आजोबांनी शून्यातुन सुरुवात करून मोठ्या कष्टाने उभे केलेले ते घर होते. आजूबाजूची सारी झाडे आजीने लावून मोठी केलेली. सात जणांच्या कुटुंबाला साहजिकच अपुऱ्या पडणाऱ्या गिरणी कामगाराच्या पगाराला हातभार लावण्यासाठी प्रसंगी बाजारात जाऊन मासे आणि नारळ विकलेल्या आजीला याच घराने मोलाचे पाठबळ दिले होते. अजूनही मी जेव्हा गावी जातो तेव्हा घरासभोवतीची फार जुनी नारळाची झाडे पहातो तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात आज्जीच्या तोंडून ऐकलेल्या या गोष्टींची आठवण झाल्यावाचून रहात नाही.
- श्रीस्वासम
#आठवणी

No comments: