Pages

Monday, April 20, 2020

सांगेल राख माझी – आरती प्रभू

संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी गेल्यावरी जळून.

खोटी खरी दुधाची होती कशी बिजे ती,
बरसून मेघ जाता येईल 'ते' रुजून.

रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?
वेळूत संध्यावेळी येईल ते कळून.

लागे मला कशाची केव्हा कशी तहान :
चर्चा कशास? नाव काठास की अजून.

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले?
शेल्यावरी कुणाच्या असतील स्पर्श ऊन?

का ते कशास सांगू मांडून मी दुकान?
शब्दास गंध सारे असतील की जडून.

काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र
केव्हातरी पिकून गळणे नगण्य पर्ण.

आज कशी कोणास ठावुन ही कविता कुठल्यातरी पेज वर समोर आली आणि मग आजचा सारा दिवस “आरतीमय” झाला. आरती प्रभूंचा म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकरांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ले तालुक्यातील, बागलांची राई, तेंडोली येथला. माझे दुसरे श्रद्धास्थान कविवर्य मंगेश पाडगावकरांचा जन्मही वेंगुर्ल्यातलाच पण एक वर्ष अगोदरचा. ( १२ मार्च १९२९). दुर्दैवाने आरती प्रभू वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी वारले. ते दीर्घायुषी ठरले असते तर मराठी साहित्यात आणखी कितीतरी अनमोल भर पडली असती हे नक्की.

कोकणातील माणसाचं आणि निसर्गाचं नाते अतूट आहे. कोकणातल्या मातीत घडलेल्या खानोलकरांच्या साहित्यात  अंधार, डोंगर, कडे, आकाश, फुलं, पानं, गाभारा, समुद्र, विवर, नक्षत्रं, वारा, पाषाण, पाऊस, झाडं, वेली, विविध निसर्गरंग इत्यादी शेकडो प्रतिमा ठिकठिकाणी भेटतात. खानोलकरांचं बालपण आजोळी बागलांच्या राईत, वेंगुर्ल्याला गेलं. तेथील  मठातील घंटानाद, समुद्राच्या लाटांचा गजर, वाड्यांमधील हिरवाई, खोल घळीं मधला गूढ अंधार, माणसा माणसातील नाती ,स्वभावांतील कंगोरे. हे सगळं त्यांच्या लेखनात आढळते. कोकणातील पार्श्वभूमी व तेथील प्रचलित चालीरीती, कथा यांच्या अंगाने लिखाण भेटत राहते. कोकणातल्या निसर्गाप्रमाणे संवेदनशील माणूस त्यांच्या लेखनात भेटत राहतो.

“माझ्याभोवती मला सामावून जे जग आहे, जे संगीत आहे, ज्या चवी आहेत, ज्या रंगांचा विलास आहे, जे सुगंध आहेत, जो भोग आहे आणि जो संभोगही आहे, जो माणूस आहे आणि जो निसर्ग आहे त्याच्यावर मी मनापासून प्रेम करतो. मी आहे तोवर जशी मला माझ्या शरीरमनाची जाणीव आहे तसेच मी आहे तोवर माझ्या भोवतीच्या विस्ताराला अर्थ आहे. आयुष्याचा 'हा आत्ताचा' क्षण मी ज्या ताकदीनं पाऱ्यासारखा पकडीन, लोलकासारखा पाहीन, त्या प्रमाणात माझी संवेदनाग्रहणाची शक्ती वाढणार आहे... मी आजवर खूप लिहिलं. खूप लिहिणार आहे. त्यातलं काय शिल्लक राहील ते राहील. मी त्या वेळी नसेन. पण काळ तर उदंड आहे. त्याची खोली मला जमेल तसल्या डोळ्यांनी सध्या पाहतोय. कोंडुऱ्याचा नाद कानी घेऊन, त्या गाभाऱ्याची आठवण ठेवून, त्यातल्या गारगार सुगंधाची जाणीव ठेवून चालणे सुरू आहे. ईश्वराकडे मागतोय एक चिरंजीव अशी जाणीव, माझ्या या शब्दांसाठी.” – खानोलकर.

अवघ्या शेहचाळीसाव्या वर्षी काळाने आपली झडप त्यांच्यावर घातली हे मराठी साहित्याचे दुर्दैव. पण त्या अल्पशा काळात पण जो ठेवा, जो वारसा ते आपल्यासाठी ठेवून गेलेत तो अमूल्य असा.

आरती प्रभूंवर काही वाचावे असे
http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_637.html?m=1

No comments: