Pages

Sunday, April 19, 2020

धारावी

लॉकडाऊनमध्ये बरेचजण धारावी बद्दल बोलताना दिसले. धारावी मध्ये कोरोना ची लागण झाली तर ती आटोक्यात आणण्यासाठी कठीण जाईल असा काहीसा सूर प्रत्येक लेखामध्ये व्यक्त केलेला होता. सुदैवानं सुरुवातीच्या काही केसेस वगळता अजून तरी धारावी सुरक्षित आहे. धारावी किती गलिच्छ आहे असे जरी प्रथमदर्शनी बहुतांशी लोकांचे मत बनत असले काही भाग वगळता  तेथे पण बऱ्यापैकी स्वच्छता बाळगण्याचा प्रयत्न रहिवासी करतात.

दहावी झाल्यानंतर जुनियर कॉलेज माझी रवानगी मुंबईत करण्यात आली. खरेतर   मी जिथे नातेवाईकांकडे राहायचो ती रूमही फक्त 180 स्क्वेअर फुटांची होती.  मी रहात असलेली इमारत म्हाडाने बांधलेल्या परळ व्हीलेजमधील लिफ्ट नसलेल्या पाच मजली इमारतींपैकी  एक होती. मधोमध पॅसेज आणि दोन्ही बाजूला खोल्या अशी त्या इमारतींची रचना. एका फ्लोअरवर चाळीस एक कुटुंब तरी नक्कीच राहायची.
लहानपणापासून जरी गावातल्या ऐसपैस घरांमध्ये राहायची सवय असली तरी आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन राहण्याचे बाळकडू आईने लहानपणीच  दिल्यामुळे  छोट्या खोलीमध्ये राहणं  फारसं अवघड गेले नाही किंबहुना मुंबईमध्ये हे असेच राहावे लागते हेच कुठेतरी डोक्यामध्ये पक्के होते. पण अजूनही निसर्गाची वेड असलेल्या मला एकंदर मुंबईचे जीवन मनापासून आपलेसे वाटत नाही हेच सत्य आहे.

दहावीला मार्क चांगले असल्यामुळे सायनच्या एस आय ई एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या थोडं पुढं गेलं की धारावी झोपडपट्टी येते.  त्यावेळी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांबद्दल, लोकांच्या राहणीमानात बद्दल नुसते ऐकूनच होतो प्रत्यक्षात भेट देण्याचा जाण्याचा कधी योग आला नव्हता पण नंतर लवकरच तो आला.
माझ्या वर्गात रमेश नावाचा एक मुलगा होता. त्यालाही दहावीत चांगले मार्कस होते. तो धारावी मध्येच राहायचा. एस आय ई एस मध्ये मुख्यत्वेकरून, माटुंगा सायन आणि चेंबूर या भागातील साउथ इंडियन आणि सिंधी लोकांचा भरणा जास्त होता. वर्गातील एकूण 60 मुलांच्या मध्ये आम्ही मोजून दहा ते पंधरा मराठी मुले होतो, साहजिकच आमचा एक वेगळा ग्रुप होता. रमेश पण मराठीच होता.  पण त्याची भाषा  आमच्या सगळ्यांपासून एकदम वेगळी होती! तो मराठी बोलत असू देत किंवा हिंदी, शिव्या प्रत्येक वाक्यागणिक त्याच्या तोंडात असायच्या. आम्ही दोन चार मित्रांनी त्याला नंतर सतत सांगून सांगून त्याच्या बोलण्यातल्या शिव्या कमी केल्या!

आमच्याबरोबर कुर्ल्याला राहणारा पियुष नावाचा अजून एक मित्र होता. पियुष हा मुंबईतच वाढलेला, सुखवस्तू घरातला.  त्याचे वडील इंजिनियर. अकरावी बारावीला त्याला शिकवायला घरी स्पेशल ट्युशन टीचर यायचे. रमेश त्याच्या घरी मासे छान बनतात असे नेहमी सांगायचा.एकदा मी आणि पियुष ने त्याला सांगितलं की आम्हाला त्याच्या घरी जेवायला यायचे आहे. रमेश हा मूळचा कोकणातला.  त्याच्या घरी  आई-वडील आणि आजी राहायची. मी त्याला सांगितलं की आम्हाला आजीच्या हातचे मासे खायचे आहेत. त्याने पहिल्यांदा थोडे आढेवेढे घेतले पण नंतर तो त्याच्या घरी जेवायला न्यायला तयार  झाला. नंतर पियुष च्या जेव्हा लक्षात आले की आपल्याला जेवण्यासाठी धारावीत जावे लागणार तेव्हा मात्र तो डगमगला. शेवटी मीच त्याला तयार केले.
दुपारी लंच अवर मध्ये रमेश च्या घरी जेवायला जायचे ठरले. घर धारावीत असल्यामुळे फारसे दूर नव्हते. अगदी उशीर झालाच तर एखादे लेक्चर बंक करावेच लागले असते. त्या दिवशी आयुष्यात प्रथम धारावीत पाय ठेवला. वेगवेगळ्या चिंचोळा गल्ल्यांमधून रमेश आम्हाला नेत होता. आत गेल्यावर प्रथम जाणवला तो तेथील टिपिकल वास. आजूबाजूच्या घरातून बनत असलेल्या जेवणाचा, तेथेच घरासमोर धुतल्या जात असलेल्या कपड्या भांड्यांचा, तंबाखू भाजल्याचा, कुठल्यातरी भट्टीच्या धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुराचा संमिश्र वास! दोन्ही बाजूला पत्र्याची घरे आणि त्यांच्या मधून जाणारी ती चिंचोळी वाट.  ज्या वाटेवरून आम्ही चाललो होतो त्याच्या खाली बहुदा वाहणारे सांडपाणी असावे, त्याच्या वर कडप्पा टाकलेले होते.  धुणी-भांडी हे सगळे घराच्या समोरच चाललेले. हे सगळे चुकवत चुकवत आम्ही रमेशच्या घराच्या दिशेने जात होतो. सर्वात पुढे रमेश त्याच्यानंतर मी आणि माझ्या पाठीमागे पियुष. मी अधून मधून पियुष आहे की पळून गेला हे मागे वळून पहात खात्री करून घेत होतो. शेवटी मजल दरमजल करत आम्ही आत मध्ये असलेल्या रमेश च्या घरी पोहोचलो. दुपारची वेळ असल्यामुळे फार गरम होत होते.  त्यात सर्वत्र पत्र्याची घरे.  रमेशने आम्हाला हात बोलवले. बाहेरच हात पाय धुवून आम्ही आत गेलो. घरात फक्त आजी होती. रमेशने तिची ओळख करून दिली. तिथेच एका कोपऱ्यामध्ये ती जेवण बनवत होती. आत आल्यावर तो बाहेरचा टिपिकल वास कमी झाला, त्याची जागा शिजणाऱ्या बांगड्याच्या आमटीने घेतली होती.  आम्ही तिघे बसल्यानंतर घरात अजून जागा शिल्लक राहिली नव्हती. मी पण कोकणातलाच आहे आणि शिक्षणाकरीता मुंबईला आलोय हे कळल्यानंतर आजीला खूप आनंद झाला. पियुष बहुदा जळगाव साईडचा होता.

आम्ही तिघे जेवायला जमिनीवर खाली बसलो होतो. आजीने आम्ही सांगितल्यामुळे खास मालवणी पद्धतीची माशाची आमटी, भात, चपाती असे जेवण बनवले होते. मालवणी पद्धतीचे माशाचे जेवण म्हटल्यानंतर मी मन लावून जेवत होतो पण पियुष ची मात्र जेवताना तारांबळ उडाली होती. एक तर आत फिरणारा एकुलता एक फॅन पण  गरम हवाच फेकत होता आणि त्यात माशाची आमटी पण छानपैकी तिखट होती.  त्यामुळे जेवताना पियुष घामाघूम झाला होता. कशीबशी एक चपाती आणि थोडासा भात खाऊन तो उठलाच! मागाहून मी आणि रमेशने जेवण संपवले.  जेवण संपल्यानंतर काही वेळ थांबलो असतो तर रमेशने आजूबाजूची धारावी दाखवली असती पण पियुष ने लेक्चर च्या नावाखाली आम्हा दोघांना ओढत बाहेर आणले!!

बऱ्याच वर्षानंतर "थ्री इडीएट्स" बघत असताना राजू रस्तोगी च्या घरचा सिन पाहताना मला या आमच्या जेवणाची आठवण आली होती! पियुष ला पण नक्की आली असणार.. आज दोघेही संपर्कात नाहीत. आज रमेश त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगली नोकरी किंवा बिझनेस करत नक्कीच कुठेतरी चांगल्या ठिकाणी रहात असणार आणि आपल्या मुलांना जुन्या धारावीतील दिवसांच्या आठवणी सांगत असणार!

No comments: