Pages

Wednesday, March 11, 2020

शाखा आणि मी

मिलिंद सोमण वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. त्याने त्याच्या मेड इन इंडिया या पुस्तकामध्ये लहानपणी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचा असे लिहिले आहे. त्याने शाखेला 'देसी स्काऊट' असेही म्हटले आहे.शाखेवर होत असलेल्या जातीयवादाच्या कडव्या टिकेबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केलेय. इंटरनेट वर  बऱ्याच जणांना त्याने लिहिलेले रुचलेले दिसत नाही आहे. ट्विटर वर त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्या सतत वाढतेय!
एखाद्या धर्माची तत्वे समजून न घेता त्यावर सरसकट टीका करणारा  समाज पहायला मिळतो,  एखादा ऍक्ट-कायदा न समजून घेता कुणीही त्यावर भाष्य करून मोकळा होतो, घरचे बजेट न सांभाळू शकणारा बजेट जाहीर झाल्यावर जसा अचानक अर्थतज्ञ बनतो अगदी तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या आपल्या लोकशाहीत संघावर टीका होणे स्वाभाविकच आहे !
आज मिलिंद सोमण ने लिहिलेला त्याचा चाळीस वर्षांपूर्वीचा अनुभव वाचताना माझे ही मन पस्तीस वर्षे मागे गेले. सहावीत मालवणला असताना आमच्या जिल्हा संघचालकांचा मुलगा माझा वर्गमित्र होता. आमचे दोघांचे घरही एकदम जवळ जवळ. बोर्डिंग ग्राउंडवर दर संध्याकाळी भरणारी आमची बालशाखा म्हणजे त्या दोन वर्षातील एक अविस्मरणीय अनुभव होता. मला शाखेत जाण्यास प्रोत्साहन देण्यामागे माझ्या शिक्षक असलेल्या वडिलांचा उद्देश 'शिस्त अंगी बाणावी' हाच होता. मालवणच्या बोर्डिंग ग्राऊंडवर शाखा भरायची. दररोज आम्ही पंधरा एक मुले नित्यनेमाने संध्याकाळी एकत्र जमत होतो. बौद्धिके, वेगवेगळे खेळ, योगासने, विविध विषयांवरील चर्चा यात तो एक तास कसा संपायचा कळायचे नाही. त्याकाळी टीव्ही पण नसल्याने आम्हा मुलांकडे खेळासाठी, वाचनासाठी वेळच वेळ असायचा.  उद्या शाखा लावल्यानंतर कोणकोणते खेळ खेळायचे, कोणत्या विषयावर बौद्धिक अथवा चर्चा होणार, कोणते चरित्र, पुस्तक वाचायचे हे आम्हीच आदल्या दिवशी ठरवत असू.  त्या संस्कारक्षम वयामध्ये असे कुठेही जाणवले नाही की आपल्याला धर्माचे बाळकडू पाजण्यात येत आहे. या उलट प्रत्येक गोष्ट ही जाज्वल्य देशभक्ती जागृत करत आहे हेच जाणवत होते. त्या लहान वयात सुद्धा अगदी लाठी चालवायला शिकत असताना  देशासाठी लढायला जायचे आहे असा भास व्हायचा!
पुढे सातवीमध्ये मालवणहुन बांद्याला आल्यावर शाखेचा संपर्क थोडा कमी झाला पण त्यावेळी काही काळ  माझे घर प्रचारकांचे विश्रांतीस्थळ होते. सातवीत  बांद्याला असताना मालवण ला संघाचे तीन दिवसाचे शिबिर होते. एरवी कुठेही लांब एकटे पाठविण्यास तयार नसणाऱ्या माझ्या आईने शिबिरास जाण्यासाठी मात्र पटकन परवानगी दिली. ते शिबिरातील तंबूमध्ये राहून घालवलेले  तीन दिवस आज ३४ वर्षानंतरही तेवढेच ताजे आहेत. पहाटे उठून थंडीमध्ये सारे आवरायचे आणि मग कवायत, संचलन वगैरे. शेवटच्या दिवशी शहरातून भव्य संचलन झाले तेव्हा चालताना छाती देशाभिमानाने एकदम फुलून आलेली! त्याच दरम्यान कुठेतरी सैन्यात भरती होण्याची इच्छा जागी झाली होती! नंतर बारावी झाल्यावर NDA च्या परीक्षेचा फॉर्म भरून सुद्धा परीक्षेला न जाऊ देण्यात घरातले यशस्वी झाले ही गोष्ट वेगळी !!
नंतर शाखेत नियमित जाणे होत नसले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की जाणे व्हायचे. ती राखी दुसऱ्याला बांधताना समोरचा कोण आहे हे कधी पाहिले गेले नाही. आजही रक्षाबंधनाला त्या भगव्या राखीची आठवण हमखास येतेच.  आज इतकी वर्षे शाखेत प्रत्यक्षात कधी जाणे झाले नसले तरी "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे" आठवले की तेच राष्ट्रभक्तीचे भाव जागरूक होतात. सैन्यात जाऊन अगदी सीमेवर नाही जाता आले तरी 'शिक्षण' आणि 'आरोग्य' या सारख्या क्षेत्रात राहून, राष्ट्राच्या उभारणीस आमच्या दोन पिढ्यांचा हातभार लागण्याचे 'सुख' म्हणजे कदाचित या अशाच संस्कारांचीच देण असावी!

No comments: