Pages

Tuesday, March 03, 2020

परीचा पुनर्जन्म

परीचा पुनर्जन्म
'परी' चार वर्षांपूर्वी आमच्या घराची एक सदस्य झाली आणि त्रिकोणी कुटुंबाचे रूपांतर चौकोनी कुटुंबात झाले. मुंबईत रहात असल्यामुळे इतकी वर्षे मनात असून सुद्धा कुत्रा पाळणे आम्ही टाळले होते. दोघेही नोकरी करत असल्याने आणि घर पण त्यावेळी लहान असल्याने कुत्र्याची नीट देखभाल करणे शक्य होईल का याबद्दल आम्ही साशंक होतो. पण चार वर्षांपूर्वी अचानक सहा महिन्यांच्या 'परी' चे घरी आगमन झाले. माझ्या मेहुणा त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाच्या घरून तिला घेऊन आला. त्या गृहस्थाच्या बायकोने लॅब्राडॉर जातीच्या या पिल्लाचे नाव हौसेने 'परी' ठेवले होते पण त्या नवरा बायकोच्या भांडणात तिची देखभाल व्यवस्थित होत नव्हती. बायको घरातून निघून गेल्यावर तिच्या नवऱ्याने परीला पण बाहेरची वाट दाखविली.
एके दिवशी मी ऑफिस मधून घरी आलो तर हे पिल्लू घराच्या हॉल मध्ये एक कोपरा व्यापून बसलेले. त्याच्या कडे पाहिल्यावर त्याच्या खाण्यापिण्याची पण आबाळ झालीय हे स्पष्ट दिसत होते. त्यावेळी एकत्र कुटुंबात आम्ही राहत असलेले 2000 स्वेअर फुटाचे चे घर चांगले प्रशस्त होते. घरी असलेल्या तीन लहान मुलांमध्ये परीच्या रूपाने आणखी एकाची भर पडली. परी म्हणून हाक मारल्यावर ते पिल्लू मान उंचावून मस्त पहायचे. म्हणून आम्ही पण तिचे तेच नाव  कायम ठेवले.  खरे तर मला लहानपणी प्राणी पाळायची प्रचंड आवड होती पण त्यांचा मृत्यू झाल्यावर खूप वाईट वाटायचे म्हणून मीच नंतर कुत्रा, मांजर पाळणे सोडून दिले होते. आता परी घरी आल्यावर तिच्या देखभालीची सारी जबाबदारी अर्थातच मी आवडीने स्विकारली. माझा एक अकरावी बारावीचा वर्गमित्र नेरुळ ला व्हेटर्नरी डॉक्टर आहे. त्याच्याकडे माझ्या खेपा सुरू झाल्या. कुत्र्याच्या पालकांना  कौन्सिलिंग करण्याच्या बाबतीत त्याचा हात कोणी धरू शकणार नाही. एखाद्या  गायनाकॉलॉजिस्टने गरोदर मातेला, होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन करावे अगदी तसे मार्गदर्शन  करतो! त्यामुळे थोड्याच दिवसात लॅब्राडॉर ची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या आवडीनिवडी,  सवयी या सर्व बाबतीत मी अगदी पारंगत झालो!
माझ्या मेहुण्याचा मुलगा त्यावेळी एक वर्षाच्या आसपास असेल. त्याची आणि परीची तर खूप छान गट्टी जमली होती. तो खुशाल परीचा अंगावर जाऊन झोपायचा, त्याला काही खायला दिलं की तो एक घास परीला भरवायचा आणि दुसरा घास आपण खायचा. त्यावेळेस चौथीत असणाऱ्या माझ्या मुलाची आणि परीची गट्टी जमायला मात्र काही दिवस लागले. परी आमच्या घरी येण्याच्या अगोदर काही दिवस माझ्या मुलाला शेजारच्यांचा कुत्रा चावल्यामुळे इंजेक्शन घ्यावी लागली होती त्यामुळे त्याच्या मनामध्ये कुत्र्याविषयी थोडी भीती  होती परंतु नंतर परी ला घेऊन फिरायला जाणे तिच्याबरोबर खेळणे त्या सगळ्यातून त्याची भीती कमी होत गेली.
आम्ही तीन कुटुंबे एकत्र रहात असल्यामुळे परीला घरी एकटे ठेवण्याचा प्रसंग सहसा नाही आला. जेव्हा बऱ्याच दिवसांसाठी सगळ्यांनाच  बाहेरगावी जावे लागले आहे त्यावेळी मी तिला कार मधून अगदी केरळ पर्यंत घेऊन गेलो आहे. तिला कार मध्ये बसायची खूप हौस आहे. कार अनलॉक करायचा आवाज ऐकला की ती कारच्या दिशेने पळत सुटले आणि दरवाजा उघडल्या उघडल्या सगळ्यात पहिली आपली जागा अडवून बसते! तिला बाहेरचा ट्रेनर न लावता मीच इंटरनेट वरचे व्हिडीओ पाहून आणि फेसबुक ग्रुप वरच्या टिप्स वाचून तिला शिकविले . त्यांच्या सर्व गोष्टी चे रुटीन ठरवले की सहसा प्रॉब्लेम येत नाही. फक्त बेसिक कमांडस् च नाही तर इतर किती तरी गोष्टी ती लिलया शिकली. घरातल्या मुलांप्रमाणे ती पण बहुभाषिक झालीय.  घरातील वेगळी वेगळी लोकं  मराठी, हिंदी, इंग्लिश आणि मल्याळम या भाषांमधून तिच्या बरोबर बोलत असतात!
2019 ची दिवाळी परी साठी वेगळी ठरली. दिवाळी झाल्यावर अधून-मधून ती उलटी करायला लागली. मी खारघर मधीलच एका डॉ ला तिला दाखवले. प्रथमदर्शनी त्यांना वाटले की  ऍसिडिटी मुळे ती उलटी करत असावी. गमतीने   त्याने दिवाळीचा फराळ जास्त झाला असेल असे म्हटलेपण ! त्याने तिला अँटासिड देऊन पाहायला सांगितले. अँटासिड देऊन चार-पाच दिवस निघून गेल्यानंतर सुद्धा तिच्या उलट्या कायम राहिल्या म्हणून ब्लड टेस्ट करून पाहिली. त्यावरून लिव्हर आणि किडनी चा काहीतरी  प्रॉब्लेम आहे असे सांगून  त्यासाठीची लिव्हर औषधे सुरू केली. तरी पण उलट्या काही थांबत नव्हत्या उलट उलट्यांची  फ्रिक्वेन्सी वाढतच चालली होती. आता डॉक्टर कदाचित 'पायोमेट्रा' असेल असे असे मला सांगत होते. पायोमेट्रा म्हणजे गर्भाशयाचे इन्फेक्शन. त्यासाठी गर्भाशय काढण्याचे  ऑपरेशन करावे लागेल असे ते म्हणाले. असे काही ऑपरेशन करण्यापूर्वी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणून मी माझ्या नेरुळ च्या मित्राला फोन केला. त्याने मला ऑपरेशन करण्यापूर्वी  पुन्हा एकदा व्यवस्थित यूएसजी  आणि ब्लड टेस्टकरून घेण्याचा सल्ला दिला. त्याचे म्हणणे होते की मी इतर कुठल्या डॉक्टर कडे ना जाता गोवंडीच्या एका मोठया हॉस्पिटल मध्ये जाऊन  सोनोग्राफी करून घ्यावी.  खारघरमध्ये फक्त एकाच ठिकाणी कुत्रांच्या सोनोग्राफीची सोय होती आणि तीही नवीनच सुरू झालेल्या 'ब्लु क्रॉस' हॉस्पिटल मध्ये. गोवंडीला मला परीला नेणे शक्य नव्हते कारण तिचे उलट्या करण्याचे प्रमाण खूप वाढलं होतं.  आता तिने खाणे पण थांबवले होते. संध्याकाळी कामावरुन घरी परत आल्यानंतर मी तिला रोज सलाईन देण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात होतो तेव्हा पण तिने एक दोन वेळा गाडीत उलटी केली होती. त्यामुळे  'ब्लू क्रॉस' मध्येच  एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड करून घ्यायचं ठरवलं. डॉ निकिता मस्तकार आणि डॉ इशा परुळेकर या दोन सर्जन्स मिळून हे हॉस्पिटल चालवतात . फक्त एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड च नव्हे तर त्यांच्याकडे सुसज्ज ऑपरेशन थिएटर पण उपलब्ध आहे. अल्ट्रा सोनोग्राफी करत असताना डॉ निकिताला परीच्या पोटामध्ये  तीन इंच व्यासाची गोल 'फॉरेन बॉडी' आहे असे दिसून आले. सोनोग्राफी केल्यावर काढलेल्या एक्सरे मध्येपण ती गोल बॉलसदृश्य वस्तू स्पष्ट दिसत होती.
हे निदान होईपर्यंत जवळजवळ पंधरा दिवस निघून गेले होते. इतके दिवस ती फॉरेन बॉडी तिच्या पोटामध्ये होती त्यामुळे तेथे नेक्रोसिस होण्याचा धोका होता. ती फोरेन बॉडी लहान आतड्यात मध्ये अडकून बसली होती त्यामुळे साहजिकच पाणी जरी प्याली तरी परी उलटी करत होती. उलट्या करून करून थकून गेली होती आणि मी ते साफ करून करून ! परीला खरे तर खूप वेदना होत असणार पण ती सांगू शकत नव्हती.
आता माझ्यासमोर प्रश्न होता की ऑपरेशन कुठे करायचे? ऑपरेशन करणे ही थोडी खर्चिक बाब तर होतीच पण ते कितपत यशस्वी होईल याबद्दल पण शंका होती. नेक्रोसिस म्हणजे आतडे जर कुजले असेल तर तो भाग काढून टाकून पुन्हा ते जोडावे लागणार होते. जेवढे ऑपरेशन क्रिटिकल होते तेवढेच महत्वाचे ऑपरेशन नंतरची काळजी घेणे असते. माणसाला सर्व कळत असते पण प्राण्याला स्वतःची काळजी घ्यायला हवी हे कुठे कळायला?
मी पुन्हा माझ्या डॉ मित्राला फोन केला आणि त्याला नविन परिस्थितीची कल्पना दिली. त्याने पण वेळ न दवडता ऑपरेशन  करून घ्यायला सांगितले. त्याने त्याच्या क्लिनिकमध्ये येऊन दुसरे डॉक्टर ऑपरेशन करतील असे सांगितले पण त्याच्याकडे गॅस अनेस्थेशिया नव्हता आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटर पण नव्हते. मग मी परळच्या प्रसिद्ध हॉस्पिटल मधील निष्णात सर्जन डॉक्टर दिनेश लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ऑपरेशन करायची तयारी दर्शविली पण दुसऱ्या दिवशी ते बाहेर गावी जाणार होते त्यामुळे ऑपरेशन एक दिवस लांबले असते. परीच्या अवस्थेकडे पाहून आणखीन एक दिवस ऑपरेशन लांबवणे मला संयुक्तिक वाटले नाही. एव्हाना तिच्या मध्ये काहीच त्राण शिल्लक नव्हते.  घराच्या घरी पण  तिला उचलूनच एका ठिकाणाहून दुसरीकडे करावे लागत होते.  बसल्या बसल्या तिचे डोके पण आता थरथरायला लागले होते. उलट्यांद्वारे शरीरातील सर्व क्षार बाहेर पडले असणार.  गोवंडीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणे खूप खर्चिक काम तर होतेच पण त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर साठी पण पुन्हा पुन्हा तिला तिथे नेऊन आणने सोयीचे ठरले नसते.
मी पुन्हा डॉ निकिताशी संपर्क साधला. यापूर्वीच्या भेटीमध्ये दोन्ही सर्जन मुलींमधला आत्मविश्वास, व्यवसायिकपणा आणि प्राण्यांबद्दलची आत्मियता मला जाणवली होती.
त्यांनी त्यांच्याकडे ऑपरेशन व्यवस्थित होईल असा विश्वास मला दर्शविला. मी त्यांना 'उद्याच' ऑपरेशन करा अशी विनंती केली आणि त्यांनी परीची अवस्था लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या अपॉइंटमेंटस् रद्द  करून ऑपरेशनची तयारी सुरू केली.
सकाळी अकराच्या सुमारास मी परीला त्यांच्याकडे घेऊन गेलो. मला सर्व गोष्टींची कल्पना देऊन, डिक्लरेशन फॉर्म वगैरे भरण्याच्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर आम्ही प्रथम पुन्हा एकदा त्या पोटातल्या वस्तूची जागा नक्की  करण्यासाठी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करून घेतली. ती गोल बॉल सदृश्य वस्तू थोडीशी खाली सरकली होती. त्यानंतर पोटावरची जिथे ऑपरेशन करायची ती जागेवरचे केस काढले. परी एकदम निपचित पडून होती. हे सर्व आपल्यासाठी चालले आहे हे बहुधा तिला कळत असावे.  परीला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेल्यानंतर मला त्यांनी मला चार तासानंतर परत यायला सांगितले.
ऑपरेशन करताना
मी चार तासांनी पुन्हा गेलो त्यावेळी त्यांनी परीला नुकतेच ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणले होते. ती जागी असली तरी ती पूर्णपणे अजून पर्यंत शुद्धीत आली नव्हती. त्यांनी पोटातून काढलेला बॉल मला दाखवला. साधारणतः अडीज  इंच व्यासाचा तो एक टणक बॉल होता. इतके दिवस पोटात राहून त्याचे स्पॉंज सारखे असणारे आवरण वरून एकदम टणक झाले होते.  तो बॉल तिला कुठून मिळाला हे आजही एक कोडेच आहे. बाहेर फिरायला घेऊन जाताना वेळी कदाचित एखाद्या वेळेस तिला तो मिळाला असेल आणि खेळता खेळता अचानक तो पोटात गेला असेल. सुदैवाने नेक्रॉसिस न झाल्यामुळे लहान आतड्याला कट घेऊन तो बॉल बाहेर काढता आला होता. 
गिळलेला बॉल
"आम्ही आमचे काम पूर्ण केले आहे आता तुमची पाळी. अशा ऑपरेशन मध्ये शिवलेले आतडे पुन्हा लीक होण्याचा धोका असतो. तसे झाल्यास पुन्हा पोट उघडावे लागेल. शिवाय आपल्याला इन्फेक्शन पण व्हायला द्यायचे नाही आहे. पुढचे सगळे तुमच्या हातात आहे" असे डॉ निकिताने मला बजावून सांगितले!
परीला घेऊन मी घरी आलो. आता माझ्यावर जबाबदारी होती की तिला आयव्ही,  इंजेक्शन्स औषधे सर्व वेळच्या वेळी देणे आणि हालचाल करताना टाके तुटणार नाहीत याची काळजी घेणे. त्यासाठी सुट्टी टाकण्या वाचून माझ्याकडे पर्याय नव्हता. आयव्ही आणि इंजेक्शन देण्यासाठी पत्नी मदत करत होती.  बाकी वेळच्या वेळी औषध देणं, ड्रेसिंग बदलणं , दर दोन-तीन दिवसांनी क्लिनिक मध्ये घेऊन जाणे हे सारे काम मी करत होतो. सुरुवातीचे पाच दिवस तिच्या पुढल्या पायाला कॅनूला लावला होता.
ऑपरेशननंतर चार-पाच दिवस परीने स्वतःहून काहीच खाल्ले नाही. पाणी पण ती स्वतःहून पीत नव्हती. डॉक्टरांनी दिलेले टिन मधील तिचे खाणे आणि अंड्याच्या पांढर्‍या भागाची केलेली थोडीशी पेस्ट तिला दिवसातून तीन-चार वेळा जबरदस्तीने भरवावी लागत होती.  म्हणजे अक्षरशः मी ती पेस्ट रिकाम्या सिरिन्ज मध्ये भरून दट्ट्याने तिच्या तोंडात हळू हळू सोडत होतो.  कदाचित आपण 'काहीही खाल्ले की उलटी होते' या अनुभवामुळे असेल, ती पाणी पण  गिळायला तयार नव्हती. त्यात सततच्या उलट्यांमुळे तिच्या फुप्फुसांमध्ये पण इन्फेक्शन झाले होते. त्यासाठी डॉ नी दिवसातून चार पाच वेळा नेबुलायझेशन द्यायला सांगितले होते. ते देण्यासाठी मी कोल्ड्रिंक ची पेट बॉटल वापरून तिच्यासाठी खास मास्क तयार केला होता! बॉटल चे झाकण लावतो तो भाग नेबुलायझर च्या नळीच्या आउटलेट ला जोडला आणि दुसऱ्या बाजूचा भाग तिच्या तोंडावर बरोबर बसेल  अशा पद्धतीने कापला. तो मास्क लावला की तिला अजिबात तोंड हलवता येत नसे.
तिच्या रिकव्हरीची दुसरा टप्पा होता की आतड्यांचे कार्य सुरळीत होणे. जवळ जवळ पंधरा दिवस आतड्यांचे कार्य ठप्प पडले होते आणि आता त्याला कापून टाके पण घातले होते. त्यामुळे आतड्यांचे कार्य हळू हळू पूर्वपदावर आणायला हवे होते. सुरुवातीच्या लिक्विड डाएट नंतर डॉ नी आतड्यांची हालचाल वाढवणारी काहीं ओषधे दिली. पाहिले जवळ जवळ सहा दिवस तर तिने शी केली नाही. डॉ निकिता म्हणायची की तिने एकदा शी केली की त्यांना हायसे वाटेल! एके दिवशी त्यांनी तिच्या गुदद्वाराच्या तिथून बोट घालून मला खात्री दिली होती की ती आज शी करेल! आणि झालेही तसेच!! एव्हाना मी तिला बाहेर थोडे फार चालायला न्यायला लागलो होतो.  तिने शी केल्यावर मला फोटो काढून पाठवायला डॉ नी सांगितले होते! त्यावेळी  रस्त्यावर मला कुणी शी चा फोटो काढताना पाहिले असते तर त्यांना नक्कीच विचित्र वाटले असते.
सर्जरी नंतर आठवड्याने लक्षात आले की जिथे कट घेतला होता त्याच्या एका बाजूने इन्फेक्शन झालेय आणि त्यातून पस ड्रेन होतोय. आपोआप ड्रेन होत असल्याने थोडे बरे होते. डॉ नी अँटिबायोटिक चा डोस थोडा वाढवला. पस ड्रेन होत असल्याने ड्रेसिंग वारंवार करावे लागत होते. टाक्या च्या ठिकाणी ओल राहून चालणार नव्हती. ऑपरेशन केलेल्या ठिकाणी 15 सेंटिमीटर ची जखम होती आणि त्यात हे इन्फेक्शन. तिला खूप वेदना होत असणार हे नक्की. पण यांची सहन सहनशक्ती अफाट असते. माणसाला खूप काही शिकविणारी. माझी पत्नी माणसांची डॉक्टर. ती औषधे बघून म्हणाली की यात पेन किलर्स फारशी नाहीयेत. परीला खूप दुखत असेल तेव्हा व्हेट ला विचार. मी डॉ निकिताला तसे विचारले तर ती म्हणाली की प्राण्यांना ऑपरेशन झाल्यावर स्ट्रॉंग पेनकीलर्स देत नाहीत कारण मग वेदना नाहीशा झाल्या की प्राणी जास्त हालचाल करायला लागतात आणि मग टाके तुटण्याची भीती असते. इन्फेक्शन झाल्यामुळे अँटिबायोटिक्स आणि पेनकीलर्स दोन्ही इंजेक्शन ने द्यायला लागायची ती ही एकावेळी तीन चार अशी दिवसातून दोन वेळा. त्यामुळे परीच्या पाठीची वाट लागली होती. मग पाठीला गरम पाण्याने शेकावे लागायचे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे इन्फेक्शन कमी होऊ लागले आणि टाके पण हळू हळू सुकू लागले होते. सतत च्या चिकटपट्ट्या लावणे व काढणे यामुळे तिच्या स्किन ला पण वर वरच्या जखमा होत होत्या. त्यामुळे आता डॉ नी तो भाग उघडा ठेवायला सांगितला. आता परी चालू फिरू लागली होती. त्यामुळे ती कुठेही जाऊन बसणार नाही आणि मुख्य म्हणजे टाके घातलेला भाग चाटणार नाही याची काळजी घ्यावी लागणार होती. त्यासाठी तिला गळ्याभोवती मोठ्ठी कॉलर घालून ठेवायला लागायचे. ही कॉलर पूर्वीच्या लाऊडस्पीकर च्या आकाराची असते आणि ती घातल्यावर कुत्र्याला अंग चाटता येत नाही.  कॉलर घातल्यावर सुरुवातीचा एक दिवस तिने ती काढायचा प्रयत्न केला पण ते जमत नाही हे कळल्यावर तिने तो प्रयत्न सोडून दिला. नंतर नंतर ती कॉलर तिला आवडायला पण लागली! त्या कॉलरचा उपयोग ती चक्क डोके ठेवून झोपायला करायला लागली! आता टाके उघडेच होते त्यामुळे मी तिला दिवसभर माझी जुनी टी शर्टस घालत होतो! रोज वेगवेगळ्या रंगांची टीशर्टस् घालायला तिला पण आवडत होते!
अखेर डॉ नी सारे टाके काढले.
ऑपरेशन नंतर
 परी व्यवस्थित खायला पण लागली. तिचा पूर्वीचा उत्साह आता परत आला होता आणि तिला तसे पाहून खूप समाधान वाटत होते. एक जीव वाचवल्याचे समाधान.  ऑपरेशनला आणखीन एखादा दिवस उशीर केला असता तर ती गेली असती. आता पुन्हा खाली फिरायला नेतानाचे उत्साहाने उड्या मारणे सुरू झालेय, संध्याकाळी मी घरी आल्यावर उद्या मारून आनंद व्यक्त करणे, खाली फिरवून आणण्यासाठी माझ्या मागे मागे फिरणे, माझी घरात घालायची चप्पल गायब करणे हे प्रकार पुन्हा सुरू झालेत. मी एकदा परीला गाडीत घालून गोव्याला घरी घेऊन गेलो होतो तेव्हा माझी आई म्हणाली होती की मुंबईत स्वतःचा जीव सांभाळण्यासाठी कसरत करावी लागते आणि तू कशाला हिची जबाबदारी घेतलीस? तेव्हा माझी बहीण म्हणाली होती, असुदे दे ग, असेल त्याचे 'देणे' कुठले तरी राहिलेले ! मी परीच्या ऑपरेशन साठी सुट्टी मागितली तेव्हा प्रिन्सिपॉल हेच म्हणाले होते.. 'जरूर घ्या सुट्टी सर, अशी कामे व्हायची असतात आपल्याकडून हे विधिलिखित असते' आणि हे खरेच आहे. नाहीतर तर कुठे प्लॅन होता आमचा कुत्रा पाळायचा? कोण कुठली 'परी' घरी येते काय, कुटुंबाचा भाग बनते काय आणि अशी सारी सेवा हातून घडते काय... सारेच विधिलिखित! 

No comments: