Pages

Monday, October 07, 2019

करियर मंत्र

भारतात करिअर करायचे म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही दोनच क्षेत्रे उपलब्ध आहेत असा बहुतेकांचा समज होता. आता हळू हळू चित्र बदलतंय. ही दोन क्षेत्रे सोडून इतर क्षेत्रांमध्ये पण करिअर करता येते हे आजकाल लोकांना कळलेय त्यामुळे आज इंजिनिअरिंग कडे लोकांचा ओढा कमी झालेला पहायला मिळतोय. मी गेली एकवीस वर्षे मुंबईमध्ये मी इंजिनिअरिंग च्या मुलांना शिकवतोय. एखाद्या मुलाला कलेच्या क्षेत्रात रुची असेल आणि त्यातच आपले करिअर करायचे असेल तरी त्याला इंजिनिअरिंग करायला पाठवले गेल्याची कित्येक उदाहरणे मी शिकत असताना आणि शिकवत असताना पहिली.

मला माझ्या शाळेतला 1989 सालचा दहावीचा  निरोप समारंभ आठवतोय. आम्हा विद्यार्थ्यांना भाषणे करायचे होती. अशावेळी अपेक्षित असते ते विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतल्या अनुभवांबद्दल बोलावे परंतु अस्मादिक बोलले ते शिक्षण पद्धतीविषयी. 'पालकांनी आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लागणं कसं गैर आहे, मुलांना ज्या क्षेत्रामध्ये आपलं करियर करायचं आहे त्या क्षेत्रात करू द्यावं' असे माझे म्हणणे मी ठाम पणे तिथे मांडले. अर्थात त्यानंतर मुख्याध्यापकांनी आणि इतर  शिक्षकांनी आपले अर्धे अधिक भाषण पालक कसे बरोबर आहेत ते सांगण्यामध्ये घालवले ती गोष्ट वेगळी! आज तीस वर्षांनंतर परिस्थिती थोडी थोडी बदलतेय. 'आम्ही सांगू तेच करायचे' यापासून 'तुला आवडते ते कर बाबा' म्हणण्यापर्यंत प्रगती आपण केलीय!

ही गोष्ट लक्षात घेऊनच जेव्हा नवीन बॅच चे  पहिले लेक्चर असायचे तेव्हा मुलांना मी काही प्रश्न विचारायचो. माझा पहिला प्रश्न असायचा की आपल्यापैकी किती जण इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचंच या हेतूनं इथे आलेले?  मग साधारणतः 20 टक्के हात वर उठायचे. मग विचारायचो  की आपल्यापैकी किती जण आई-वडिलांनी किंवा काका-मामांनी सांगितलं म्हणून इकडे आलेले आहेत मग बरेचसे हात वर उठायचे. त्यानंतर  विचारायचचो की आपल्यापैकी किती जण इतरत्र कुठे ॲडमिशन मिळाली नाही म्हणून इथे आलेले आहेत? मग थोडासा  हंशा पिकायचा पण तुरळक हात या प्रश्नालाही वरती उठायचे. मग मी माझ्या मुख्य मुद्द्याकडे वळायचो. आता इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतलेलाच आहे तर  इंजिनिअरिंग व्यवस्थित कसे कसे पूर्ण करायचं हे सांगण्यात मग पहिला तास संपायचा. हे सारे करत असताना इंजिनिअरिंग करता करता आपला छंद कसा जोपासायचा, इंजिनिअरिंग केल्यावर सुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर कसे करता येईल किंवा आपण आत्मसात केलेले इंजिनिअरिंगचे ज्ञान व  आवडीचे क्षेत्र यांचा मेळ कसा घालता येईल हे हळू हळू मी त्यांच्या लक्षात आणून द्यायचो.

जे आपण शिकलो आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर सगळेच करतात परंतु एकदा स्वीकारलेले प्रोफेशनल बदलण्यासाठी जी हिम्मत आणि धडाडी लागते ती सगळ्यांकडेच असते असे नाही. माझ्या मुळच्या कलासक्त स्वभावामुळे असेल कदाचित की माझ्या शेकडो विद्यार्थ्यांमधून अगदी कायमचे लक्षात राहणारे विद्यार्थी हे असेच काहीशी वेगळी वाट चोखाळणारे होते. त्यातले काही तर नंतर अगदी कुटुंबाचा भाग बनून गेले.

यात पाहिले नाव 'कोमल मेहता'. अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगी. वडिलांच्या इच्छेखातर इंजिनियरिंग तर केले पण स्वप्न होते लेखक बनण्याचे. 'सर, मुझे एक दिन बुकर प्राईझ जितना है' म्हणणारी. लेखक बनायचेय या स्वप्नासाठी IIM अहमदाबादच्या मुलाखतीला न जाणारी. बॉलिवूड च्या लखलखत्या दुनियेत विविध प्रोडक्शन कंपन्यांच्या मार्केटिंग विभागाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळल्यावर सुद्धा लेखक बनण्याची उर्मी जपणारी आणि शेवटी पेंग्विन सारख्या इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस साठी दोन पुस्तके लिहिणारी 'कोमल मेहता' ! तिचे चालले नाही ते फक्त नियतीपुढे. वयाच्या फक्त 33 व्या वर्षी काळाने ओढून नेले नसते तर तिने तिचे बुकर चे स्वप्न पण नक्की पुरे करून दाखवले असते!

साहित्य जसे मला जवळचे तसेच अभिनय क्षेत्रही. चेंबूरच्या विवेकानंद कॉलेज मध्ये असताना 2003 च्या आसपास स्व. मच्छीन्द्र कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक वर्ष 'ड्रामा क्लब' ची जबाबदारी सांभाळली होती! त्यावेळी अभिनयाचे धडे गिरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा असा काही तुफान प्रतिसाद  मिळाला होता की चक्क पालकांच्या तक्रारी यायला लागल्या की आम्ही आमच्या मुलांना इंजिनिअरिंग करायला पाठवलंय अभिनय शिकायला नाही! ( सारे इंजिनिअरिंग स्टुडंट्स इंजिनिअरिंग करता करता आपोआप अभिनय करायला शिकतात हे वेगळे!)  त्यामुळे अर्थात हा प्रयोग फक्त एकच वर्ष चालला पण त्या एका वर्षाच्या काळात ज्या मुलांनी भाग घेतला होता त्यातील संकेत म्हात्रे आज एक चांगला अभिनेता तर आहेच पण त्याही पेक्षा हॉलिवूड आणि अनिमेशन च्या क्षेत्रातील सिनेमांचे हिंदी डबिंग  कलाकार म्हणून त्याने मोठा नावलौकिक कमावलाय. छोटा भीम मधील जग्गु, बेन 10, डेडपूल यांच्या आवाजाबरोबरच असंख्य इंग्रजी, तेलगू चित्रपटांचे हिंदी डबिंग त्याने केलेय.

संगीता मध्ये करिअर करायचं झालं तर त्याला खूप मोठी साधना लागते. यामुळे साहित्यिक बनावे किंवा अभिनयक्षेत्र अजमावून पहावे अशी स्वप्न मी कधीतरी चुकून बघितली असली तरी संगीत क्षेत्राबद्दल असा विचार कधीही मनात नाही आला. माझ्यासाठी गाणे म्हणजे कॉलेजचे स्नेहसंमेलन, युथ फेस्टिवल , कराओके एवढ्यापुरता मर्यादित राहिले. परंतु इंजीनियर्स आणि डॉक्टर्सनी अभिनय आणि संगीताच्या क्षेत्रात आपलं करिअर करावं हे काही नवीन नाही. अगदी मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो त्या दरम्यानच्या काळात कॉलेजमध्ये असणार्‍या पैकी किमान दोघांनी संगीतात करियर घडवलेलं त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि गायक चिन्मय कोल्हटकर आणि दुसरा, 'देवाधीदेवा' आणि 'एकम् सत' या अल्बम चा गायक आणि संगीतकार अमेय डाबली.  चिन्मय त्याच्या हार्मोनियम वादनासाठी संगीताच्या जगात ओळखला जातो पण आपले इंजिनिअरिंग चे ज्ञान वापरून चिन्मय साउंड इंजिनिअरिंग चे काही कोर्सेस पण घेतो. अमेय डाबली हा सुफी संगीतासाठी ओळखला जातो. भारतातील एकही 'रॉयल वेडिंग' असे नसेल की तिथे पूर्ण संगीताची जबाबदारी अमेय ची कंपनी सांभाळत नसेल! आत्ता मी हा लेख लिहीत आहे तेव्हा अमेय चा ए आर रेहमान बरोबर BKC ला शो चालू आहे!  पण माझ्या सारख्या इतर कित्येकांनी संगीताशी असलेले नातं हे छंदापुरते मर्यादित ठेवले. माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर बाकीचे मित्र अमेरीका गाठायची स्वप्ने पाहत असताना आपण  संगीतकार बनायची स्वप्ने बघणारे आणि ते पुढे जाऊन ते साकार  पण करून दाखवणाऱ्या दोघांशी माझे  सूर पटकन जुळले. त्यातला एक शॉन एडवर्ड आणि दुसरा निखिल पाचपांडे. दोघेही अनेक वाद्ये वाजवण्यात निपुण. दोघांचेही स्वतःचे रॉक बँड. एकाच 'नाद' तर दुसऱ्याचा 'स्पर्श'. मुंबई सारख्या शहारामुळे अनेक स्पर्धा, कॉलेज, FM , रियालिटी शो मध्ये त्यांना भाग घेणे सोपे जात होते. आज दोघेही आपापल्या परीने संगीताच्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.
अर्थात ही झाली मी डोळ्यांनी पाहिलेली उदाहरणे पण आपल्या आजूबाजूला अशी कित्येक उदाहरणे आढळतील. हळू हळू चित्र बदलतंय.
आज कला आणि इतर क्षेत्रे यामध्ये फारसे अंतर राहिलेले नाही. प्रत्येक गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजी चा वापर होतोय. उदाहरणार्थ चांगल्या संगीतकाराला संगीताचे ज्ञान जेवढे आवश्यक आहे तेवढेच त्यात येऊ घातलेल्या नवनवीन टेक्नॉलॉजीचे पण. आज कुठलीही फिल्म त्यातल्या स्पेशल इफेक्टस शिवाय बनू शकत नाही. व्हॉईस ओव्हर च्या क्षेत्रात हळू हळू डिजिटल व्हॉईस शिरकाव करत आहेत. पेंटिंग्ज डिजिटल बनताहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज तुम्ही इंजिनिअर जरी बनला तरी आवड असेल तर कलेच्या क्षेत्रात तुमच्या ज्ञानाचा उपयोग करू शकता. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम मुळे एखादा संगीता सारखा विषय घेणे आता भारतात शक्य होईल.

माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये इलेक्ट्रोनिक्स बरोबरच फॅशन डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, फूड टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असे कोर्सेस आहेत. मी गेली कित्येक वर्षे विद्यार्थिनींना या इतर क्षेत्रातील प्रॉब्लेम्स,  अप्लिकेशन्स किंवा प्रॉडक्ट्स हे  इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स वापरून बनविण्याचे प्रोजेक्ट्स हाती घ्यायला प्रोत्साहन देत आहे. कालांतराने असे लक्षात येतंय की या इलेक्ट्रॉनिक्स च्या विद्यार्थिनी असा प्रोजेक्ट करताना दुसऱ्या क्षेत्रातही पारंगत होतात. आपल्या शिक्षणाची सांगड छंदांशी घालत करियर करता येणं आज शक्य झालंय. येता काळ या अशा प्रोफेशनल्स चा असणार आहे जे एकापेक्षा जास्त क्षेत्रात पारंगत आहेत. आणि त्यातील टेक्नॉलॉजी हे क्षेत्र कॉमन असणार आहे.   

No comments: