Pages

Sunday, October 27, 2019

आकाशकंदील बापलेकांचा

या वर्षीची दिवाळी स्पेशल कारण आकाशकांदील घरी बनवलाय यावर्षी!!  दुपारपासून बाप लेकाची स्वारी कामाला लागली. आकाशकंदील बनवायचा प्लॅन सकाळीच ठरला त्यामुळे ऐन वेळी इथे ओला बांबू शोधायच्या भानगडीत न पडता घरी असलेल्या एका बांबू पासून लागणाऱ्या काड्या तयार केल्या.  आपला पारंपरिक आकाशकंदील न बनवता एक वेगळे डिझाईन लेकाने निवडले.  मी नको म्हणण्याचा प्रश्न नव्हता कारण तसे केल्यास 'आता तूच बनव' असे सांगून स्वारी निघून गेली असती! हा सारा प्रपंच त्याला आकाशकंदील बनवायचा अनुभव घ्यायला मिळावा म्हणून तर मांडला होता.
पस्तीस वर्षांपूर्वी बाबा आणि मी मिळून एक फिरता आकाशकंदील बनविला होता त्याची आठवण आजतागायत ताजी आहे. ती आतल्या फिरणाऱ्या कागदाच्या  सिलिंडरवर कोरलेल्या चित्रांची सावली बाहेरच्या रंगीत कागदांवर पडायची आणि ती चित्रे जणू सजीव व्हायची! त्यावेळी गावी बहुतेक जण आकाशकंदील स्वतःच  बनवत त्यामुळे  कुणी बनविलेला आकाशकंदील सर्वात मोठा आणि छान दिसतोय याची आम्हा मुलांत चढाओढ असायची! त्यावर्षी आम्ही चक्क फिरता आकाशकंदील बनविला होता त्यामुळे तो आजतागायत चांगला लक्षात राहिला.
आजचा माझा प्रयत्न हा एक दिवाळी  आकाशकांदीलासाठी लेकाच्या लक्षात रहावी  म्हणून होता! युट्युब वर जे डिझाईन होते त्यापेक्षा मोठा बनवायचा असल्याने त्याची मॅथ्स मधील Ratio आणि भूमितीमधील त्रिमिती वगैरे ची उजळणी पण झाली! काड्या एकमेकाला जोडण्यासाठी दोरा, फेवीक्विक, ग्लुगन असे विविध पर्याय वापरून झाले. शेवटी संध्याकाळ पर्यंत सांगाडा तयार झाला. रात्रीची डेडलाईन लक्षात घेता आम्ही आमचे मूळ डिझाईनमध्ये फेरफार करून त्याला थोडे सोपे केले! ( मुळचा डायमंडचा आकार होता त्याच्या खालच्या भागाला आम्ही डच्चू दिला!)
नंतर दुकानात जाऊन रंगीत कागद व इतर गोष्टींची खरेदी केली. रंगसंगतीच्या बाबतीत लेक सांगेल ती पूर्व दिशा असते. त्याचे रंगांचे ज्ञान माझ्यापेक्षा निर्विवाद चांगले आहे. ( पठ्ठ्याने त्यादिवशी माझी वॉटर कलर्स मध्ये निसर्गचित्र काढायला शिकविण्याची मागणी चक्क धुडकावून लावली होती!) मग रात्रीचे आणखी दोन तास खपून आमचा झाला एकदाचा आकाशकंदील बनवून! खालचा भाग पण पूर्ण केला असता तर अजून छान दिसला असता पण शेवटी स्वहस्ते बनविलेल्या आकाशकांदीलकी बात ही कुछ और होती है! जसा फराळ जरी पणशीकारांकडून एक्स्पोर्ट क्वालिटीवाला आणला तरी घरची थोडी कडक बनलेली चकली पण खुसखुशीतच लागतात ना तशीच !

No comments: