Pages

Thursday, October 31, 2019

50 वर्षांपूर्वी आईला मिळालेले मुख्यमंत्री गुणवत्ता पारितोषिक

मुंबईत महापालिकेच्या शाळेत करत असलेल्या शिक्षिकेच्या नोकरीमध्ये तिचे मन कधीच रमले नाही. तिला वैद्यकीय क्षेत्र खुणावत होते.  तिचे वडील  हेडमास्तर , त्यांनी आपल्या पाचही मुलींना शिक्षिका बनवलेले. त्यातली एक म्हणजे आमची आई! 

त्यावेळी डॉक्टर होण्यासाठी पहिल्यांदा BSc व्हावे लागायचे. त्यावेळच्या अकरावी नंतर DEd करून शिक्षिका बनलेल्या आईला ते शक्य नव्हते म्हणून वडिलांच्या विरोधाला न जुमानता महापालिकेतील शिक्षिकेची नोकरी सोडून तिने स्वबळावर नर्सिंग साठी ऍडमिशन घेतले. 

वैद्यकीय क्षेत्राची आणि रुग्णसेवेची अतोनात आवड असणाऱ्या आमच्या आईला CPR कोल्हापूर येथे शिकत असताना 1970-71 चे पुणे विभागातील 682 विद्यार्थिनी परिचरिकांमधून सर्वोत्तम परिचारिका म्हणून मुख्यमंत्र्यांचे गुणवत्ता पारितोषिक मिळाले. माझ्या शालेय जीवनात हे पारितोषिक नेहमीच स्फूर्ती देत राहिले. 

80 च्या दशकात रेडिओ हेच अप्रूप असायचे. त्यावेळी कधी कधी आईचे रत्नागिरी रेडिओ केंद्रावरील मुलाखतीचे किंवा चर्चासत्राचे कार्यक्रम ऐकताना खूप अभिमान वाटायचा! 
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असताना  सिंधुदुर्गातील कट्टा, मळेवाड, कुडाळ, सावंतवाडी, फोंडा, बांदा, भेडशी आणि शिरोडा येथील रुग्णालयांमध्ये केलेली उत्कृष्ट रुग्णसेवा आणि त्यामुळे लोकांचे मिळालेले प्रेम ही आमच्यासाठी मोठी शिदोरी होती. तिने ज्या ज्या डॉक्टर्स बरोबर काम केले त्यापैकी प्रत्येक जणाला आईच्या अनुभवावर, ज्ञानावर आणि कौशल्यावर खूप विश्वास असायचा हे आम्ही नेहमी अनुभवले आहे. अविरत रुग्णांच्या सेवेला वाहून घेतलेल्या आईने नोकरी करताना कधीही तत्वांशी तडजोड नाही केली. रुग्णालयाची स्वच्छता या बाबत ती एवढी जागरूक असायची की तिच्या हाताखाली काम करणारे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी कायम वचकून असायचे! 

आज निवृत्त झाल्याच्या 16 वर्षांनंतर पण ती नर्स ची भुमिका पार पाडतच आहे. स्वतःला एक हार्ट अटॅक येऊन गेला असला तरी अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या बाबांची काळजी फक्त पत्नी म्हणूनच नव्हे तर  एका नर्सच्या दृष्टीने पण घेतेच आहे. 

आज फोन ची फोटो गॅलरी चाळत असताना तिच्या मुख्यमंत्री गुणवत्ता परितोषिकाचे सर्टिफिकेट नजरेस पडले आणि आठवणींचा हा पेटारा उघडला!

No comments: