Pages

Sunday, September 29, 2019

फसलेला दांडिया आणि शिकलेला धडा !

आज नवरात्री दरम्यान खेळला जाणार दांडिया पाहिला की पंचवीस-सव्वीस वर्षापूर्वीची घटना आठवते. त्यावेळी दांडिया खेडोपाडी पसरलेला नव्हता. गावचा नवरात्र उत्सव हा देवळात घटस्थापना करण्यापुरता मर्यादित असायचा.  आम्ही मित्रमंडळी त्यावेळी बारावी तेरावी ला असू.  आमचा सात आठ मुलांचा  ग्रुप होता. कोणाच्या तरी मनात आलं की आपण ह्या वर्षी गावात दांडिया आयोजित करायचा. टीव्ही वर दाखवली जाणारी मुंबईतील मोठ मोठया दांडिया ची दृश्ये गावी सगळ्यांनाच आकर्षित करायची.  त्यामुळे आपल्या गावात अगदी मुंबई सारखा नाही पण छोट्याशा प्रमाणात दांडिया आयोजित करायची कल्पना सर्वानाच आवडली. आमच्या पैकी सारेच नुकतेच बारावी झालेले. कमावणारे कुणीच नाही त्यामुळे दांडियासाठी लागणारे पैसे हे आमच्या साठवलेल्या पैशातून द्यायला लागणार होते. कुणाच्याही घरून दांडियासाठी म्हणून पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती उलट नसत्या उचापती कशाला करताय असा फुकट सल्ला मिळाला असता!
कमीत कमी खर्चात एक दिवस का होईना पण आपण दांडिया आयोजित करायचाच असे सर्वांचे मत पडले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जागेचा होता.  आमच्याच एका मित्राच्या वाशील्याने शाळेचे पटांगण आम्हाला वापरायला मिळाले. आमच्या  ओळखीच्यापैकी एकाचा म्युझिक सिस्टम भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. त्याच्याशी जरा घासाघीस करून म्युझिक सिस्टम आणि लाइट्स भाड्याने घेतल्या. आता एवढ्या तयारीनिशी आम्ही दांडिया नाईट आयोजित करण्यासाठी तयार होतो! त्यावेळी आता सारखी पोलिसांची परवानगी, रात्री 10 पर्यंतची मर्यादा असा काही प्रकार नव्हता.
मोबाईल, व्हॉट्सॲप नसल्यामुळे आमच्या दांडिया ची प्रसिद्धी तोंडी जेवढी करता येईल तेवढी आम्ही केली! दोन दिवस जो भेटेल त्याला "रात्री दांडियाक ये हा नक्की" असे सांगत सुटलो होतो.
तो जमाना ऑडिओ कॅसेट चा होता. दांडियाला वाजवता येतील अशी गाणी असलेली कॅसेट्स गावातल्या दुकानांमध्ये शोधुन झाल्या. आज आपल्याला हवी ती गाणी आपल्याला मोबाईलच्या एका क्लिक वर उपलब्ध आहेत पण त्यावेळी गाण्यांसाठी 'ऑडिओ कॅसेट' हा एकच पर्याय उपलब्ध होता.
संध्याकाळी दोन तीन तास राबून आम्ही सारी तयारी करून ठेवली. एवढी सारी मेहनत केल्यावर आता धाकधूक होती ती दांडिया खेळायला कुणी येते की नाही. नाहीतर आम्हा मित्रांनाच  खेळायला लागला असता. रात्री आठ साडे आठ च्या दरम्यान हळू हळू  आमच्याच ओळखीचे शाळा कॉलेज मधील मुले मुली यायला लागले त्यामुळे आम्हा सगळ्यांना हायसे वाटले. काहीजण दांडिया खेळण्याच्या तयारीने आले होते तर काही जण नुसते पाहण्यासाठी. नऊ साडेनऊला आतासा कुठे दांडिया जोर धरू लागलेला असतानाच अचानक आरडाओरडा ऐकू आला आणि काही कळायच्या आत पाच सहा लोकांनी येऊन तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांचा सर्व राग त्यांना विश्वासात न घेता गावात असा कार्यक्रम आयोजित केला कसा गेला यावर दिसत होता. कुणी त्यांना आवरायच्या आत आमच्या स्पीकर्स आणि लाईट्स चे नुकसान त्यांनी केले होते. त्यावेळचा आमचा दांडिया सुरू झाल्या झाल्या तेथेच संपला!

दुसऱ्या दिवशी झालेल्या नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही सकाळीच एकत्र आलो. झालेली गोष्ट घरापर्यंत नेण्यात काही अर्थ नव्हता पण आता साऊंड सिस्टीमवाल्याचे नुकसान कसे भरून द्यायचे हा मुख्य प्रश्न होता! आम्हाला आता फक्त एकच पर्याय दिसत होता आणि तो म्हणजे  सरळ आमदारांच्या घरी जाऊन त्यांच्या कानावर झालेला प्रकार सांगून आर्थिक मदत मागायची! आमदारांचे घर गावातच होते. नुकतेच मतदार झालेलो आम्ही तेथे जाऊन पोहचलो आणि त्यांच्या कानावर झालेला प्रकार घालून आता तुम्हीच 'तारणहार' असे साकडेही घातले! अर्थात त्यांच्यासाठी आम्ही मागत असलेली आर्थिक मदत ही नगण्य होती पण आमच्यासाठी ती रक्कम उभी करणे म्हणजे एक दिव्य होते. आमदारांनी पण अगदी वेळ देऊन आमचे सारे म्हणणे ऐकून घेतलेच पण झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत पण दिली!
त्यानंतर आता आमच्यापैकी जे कुणी गावी स्थायिक झाले त्यांनी नंतर अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविले पण राजकीय पाठबळ पाठीशी आहे ही खात्री बाळगून हे नक्की!

No comments: