Pages

Tuesday, August 06, 2019

मी श्रीमंत झालो!

आज एक आज्जी तिच्या बारावी झालेल्या नाती सोबत माझ्या समोर ऍडमिशन साठी बसल्या होत्या. आज्जींच्या चेहऱ्यावरून त्यांनी आयुष्यात खाल्लेल्या खस्ता साफ दिसत होत्या.
आज्जींची मुलगी आणि जावई म्हणजे नातीचे आईवडील दोघेही हयात नव्हते. त्यांच्या मुलीचा प्रसूती दरम्यान 11 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता  तर जावयाचा मृत्यू सहा वर्षांपूर्वी झालेला. त्यानंतर नातीचा सांभाळ या आज्जी- आजोबांनी केलेला. कुर्ल्याला एका छोट्याशा घरात आज्जी आजोबा, मामाचे कुटुंब आणि ही मुलगी असे सात जणांचे कुटुंब रहात होते.  
"आज्जी, तुम्ही निर्धास्त रहा. तुमच्या नातीच्या शिक्षणासाठी काहीही खर्च येणार नाही!" मी म्हणालो.
नातीच्या ऍडमिशन साठी या वयात एका कॉलेज मधून दुसऱ्या कॉलेज मध्ये फिरणाऱ्या त्या आज्जी साठी हे शब्द नवीन होते बहुदा. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून मी त्यांना समजावले.
"माझा इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा चार वर्षाचा आहे. प्रत्येक वर्षाची फी अंदाजे पंधरा हजार. म्हणजे चार वर्षाचे झाले साठ हजार. तेवढेच पैसे मी तुम्हाला एका वर्षाच्या इंटर्नशिप दरम्यान मिळणाऱ्या स्टायपेंड च्या रुपात मिळवून देईन. याचाच अर्थ तुम्हाला शैक्षणिक खर्चापोटी एक पैसाही खर्च करायची गरज नाही"
पैशाची अडचण न येता आपली नात इंजिनियर बनू शकते या शक्यतेने आता आज्जींचा चेहरा उजळला होता. कुठेतरी आशेचा किरण त्यांना गवसला होता.
"आज्जी तुम्ही निश्चिंत रहा... डिप्लोमा झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट मध्ये नोकरी पण मिळवून देण्याची  जबाबदारी माझी आणि इतर कुठल्याही कारणाने शिक्षण अर्धवट राहणार नाही याची पण जबाबदारी मी घेतो" मी म्हणालो.
आज्जीच्या डोळ्यात पाणी होते.    शब्द जड झाले होते. तिने नुसतेच हात जोडले.
"आज्जी, हे महिला विद्यापीठ आहे. तुमच्या नाती सारख्या गरजू विद्यार्थीनींना स्वतःच्या पायावर उभे करणे हे ध्येय आहे इथे प्रत्येकाचे. होतकरू आणि मेहनती विद्यार्थीनींना मदत करायला कितीतरी व्यक्ती आणि कंपन्या पुढे येतात हा आमचा आजवरचा अनुभव आहे. तुम्ही निश्चिंत रहा, आपण स्कॉलरशिप्स साठी पण अर्ज करू. त्यातून मिळणाऱ्या पैशाने तुमच्या नातीचे शिक्षण विनासायास होईल, फक्त हिची खूप मेहनत करायची तयारी पाहिजे. घरी जागे अभावी अभ्यासाचा प्रॉब्लेम होत असेल तर शनिवारी रविवारी मी लायब्ररी उपलब्ध करून देईन " मी म्हणालो.
मी तिच्या नातीकडे पाहिले. माझ्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर  आत्मविश्वास उमटलेला दिसत होता. थोडासा सपोर्ट विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो हा माझा आजवरचा अनुभव. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास मला समाधान आणि खात्री देऊन गेला.
" मी करेन खूप मेहनत, मला आवडेल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बनायला" ती म्हणाली.
माझ्या सहकाऱ्याला मी त्यांचा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या सूचना दिल्या. उठताना पाहिले तर आज्जींच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. माझ्या केबिन च्या बाहेरपर्यंत त्यांना सोबत करावी म्हणून मी उठलो तर आज्जीनी हात पकडून खूप सारे आशिर्वाद दिले. मीही त्यांना आश्वस्त केले.
त्यांना बाहेर सोडून केबिन मध्ये परतल्यावर बाहेरचा पाऊस डोळ्यात कधी आला कळलेच नाही. एक अतीव समाधान मनात जाणवत होते. आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे समाधान. मला एकवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला.  इंजिनियरिंग झाल्यावर याच एका ओढीने शिक्षकी पेशा आनंदाने स्विकारला होता... विद्यार्थ्यांची आयुष्य घडवायची होती.. वाट चुकलेल्यांना वाट दाखवायची होती. गेली आठ वर्षात एस एन डी टी महिला विद्यापीठात अशा संधी वारंवार येत आहेत आणि माझेच आयुष्य समृद्ध करून जात आहेत.  ' तुम्ही जगाची आई आहात' आणि 'तुमच्या जबाबदाऱ्या अमर्याद आहेत' या सद्गुरुंच्या 'ईनर इंजिनियरिंग' क्रॅशकोर्स च्या दोन तत्वांची पदोपदी जाणीव अशावेळी होत राहते.
- दिनेश गिरप
dineshgirap@gmail.com

No comments: