Pages

Thursday, August 01, 2019

याला जीवन ऐसे नाव..

काल रात्री आठ साडेआठ च्या सुमारास बेल वाजली. दार उघडले तर वॉचमन होता. साठ  पासष्ट च्या आसपास वय आहे त्याचे. माझ्या दोन्ही गाड्या तोच धुतो. या वयातही एकदम छान काम करतो. गेट उघडायचे असेल तरी पळत येणार.
एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात 500 रु ची नोट घेऊन तो उभा होता. चेहरा विदीर्ण झालेला.
"साब, मेरी औरत नही रही... ये देखो फोन .. अभी अभी आया था.. बाईक पे पिछे बैठके जा रही थी तो  खड्डे की वजह से accident हो गया. गाव वाले तीन तीन अस्पताल लेके गये पर वो नही बच पाई.. मुझे अभी गाव के लिये निकलना पडेगा..
अभी तक घर नाही लाया उसे ऐसे कह रहे है... "तो मोबाईल दाखवत म्हणाला.
"ये महिनेका गाडी धोनेका पैसा मिलता तो मदत होगी.."
या वयात जिथे आपण आराम करायची स्वप्ने बघतो तिथे हा माणूस कुटुंब उत्तर प्रदेशात सोडून रात्रंदिवस इथे काबाडकष्ट करत होता आणि त्याच्यावर ओढवलेला आताचा हा प्रसंग.. काय बोलावे मला सुचत नव्हते. काहीतरी आपले बोलून मी त्याचे सांत्वन करायचा प्रयत्न करत होतो. पण ते पुरेसे नाही हे मला पण कळत होते. परिस्थितीच्या तडाख्यात तावून सुलाखून निघालेल्या या अशा माणसांची सहनशीलता अचाट असते पण अशा प्रसंगी नक्कीच कुणीही माणूस मुळापासून हलून जातो. जिचे पोट भरण्यासाठी या वयातही  तो इथे दिवसरात्र काबाडकष्ट करतोय तीच आता नाही हा विचार त्याला नक्कीच हैराण करत असणार..
मी पैसे दिले.. ते घेऊन तो म्हणाला "साब, एक महिना तो लगेगा वापस आने के लिये.. गाडी धोनेके लिये दुसरे को बोल दिया हूं! "
या प्रसंगात पण त्याचा तो इमानेइतबारे चाकरी करण्याचा गुण विसरला नव्हता . तो लिफ्ट मधून गेल्या नंतर ही मी दारातच उभा होतो.. आयुष्य नावाच्या अजब रसायनाचा विचार करत..
दिनेश G

No comments: