Pages

Wednesday, April 03, 2019

आमचा कोंकण दौरा ...२०१४ दिवाळी - भाग 1

 2015 च्या दिवाळी दरम्यान लक्ष्मीपूजन करून दुसरया दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर ला सहकुटुंब कोकण दौरयावर निघायचे ठरले. मी  तळ कोकणातील  असलो तरी रायगड, रत्नागिरी च्या किनारपट्टीचा दौरा कधी केला नव्हता त्यामुळे या वेळेस ती पालथी घालायची ठरवली. नेहमी हे असेच होते . आपण जिथे राहतो त्या भागाचे आपल्याला अप्रूप नसते. पण मोठया हौसेने आपण कुठेतरी  दूरवर जातो आणि मग आपल्याला जाणवते की  आपले कोकण यापेक्षा कितीतरी सुंदर आहे.
 24 ऑक्टोबरला मुंबईहून निघून पहिला मुक्काम  दिवे आगर ला करणार होतो. त्यानंतर हरिहरेश्वर मार्गे दापोलीला जाऊन तेथे येथे दोन दिवस मुक्काम करायचे ठरले. दापोली जवळच हर्णे मुरुड चा किनारा आहे आणि तेथे महर्षी कर्वेचे स्मारक देखील आहे. दापोलीहुन गणपतीपुळ्याला मुक्काम करणार होतो. आणि तेथून मग गोव्याला आई बाबांना भेटून यायचे ठरले.
दापोली पर्यंतच्या मुक्कामाची बुकिंग करून पुढील  कार्यक्रम मागे पूढे करता यावा म्हणून बुकिंग केली नाहीत.
24 ऑक्टोबर ला सकाळी निघायाचा खरे तर विचार होता पण दिवाळी च्या गडबडीत सामानाचे पैकिंग करणे राहून गेले होते. त्यात पत्नी हॉस्पिटल मधून नाईट डयुटी आटपून सात वाजेपर्यन्त येणार होती. गाडीत पेट्रोल भरणे, PUC चे नूतनीकरण करणे, चाकातील हवा चेक भरुन घेणे या सर्व गोष्टी करता करता दुपारचे बारा वाजले तेव्हा कुठे आम्ही बाहेर पडलो!
गूगल मॅप वर दिवे आगार टाकल्यावर दोन ऑप्शन्स मिळाले. पहिला पर्याय म्हणजे पनवेल गोवा महामार्ग आणि दूसरा मार्गाने जायचे झाले तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे ने खालापुर पर्यन्त जायचे आणि त्यानंतर पाली मार्गे नागोठण्याजवळ  पनवेल गोवा महामार्गाला मिळायाचे. बऱ्याचदा अलिबाग- काशिद येथे छोट्या पिकनिक साठी जाताना गोवा मार्गाने जात असल्यामुळे यावेळी दूसरा मार्ग घ्यायचे ठरवले.
खालापुर टोल नाक्यापर्यंतचा ४०किलोमीटर चा  चा प्रवास एकदम जलद झाला. खालापुर टोल नाक्याच्या थोड़े पुढे आले की खोपोलीचा डावीकडे फाटा येतो तेथून खोपोली पाली रोड घेतला . आजकाल ऍडलॅब इमॅजिकाला जाणाऱ्यांमुळे या रस्त्यावरची वर्दळ फार वाढली आहे. नाहीतर पूर्वी फक्त अष्टविनायक वाल्या टुरिस्टचीच कायती वर्दळ असायची.  त्या फाट्यापासून ते इमॅजिकापर्यंतचा रस्ता ख़राब  झाला होता.  रोज येणारी शेकडो वाहने आणि त्यावेळी  नुकत्याच  सुरु झालेल्या वॉटरपार्क च्या उभारणी साठी ये जा करणारया वाहनांमुळे रस्त्याची ही अवस्था झाली असणार. या रस्त्याच्या आजूबाजूने आंबा नदी वहात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बऱ्यापैकी हिरवळ आहे. 
पुढे पालीजवळ पोहचल्यावर भुकेची जाणीव झाली.  एका हॉटेलपाशी थांबून जेवण घेतले आणि पुढील मार्गास लागलो. आम्ही तिघे प्रवास करत असताना जेवणासाठी थांबलो की  वेळेकडे पहात नाही ! प्रथम मेनूचे पारायण आणि नंतर डिश निवडल्यानंतर त्याचे Customization!! ऑर्डर घेणाऱ्याला प्रत्येकाच्या आवडी निवडी नुसार ऑर्डर केलेल्या डिश मध्ये काय हवे काय नको याचे सविस्तर वर्णन करायचे. मुलाला त्याच्या नान मध्ये पांढरे तीळ नको असतात. मला त्यातल्या त्यात झणझणीत पणा हवा असतो. प्युअर व्हेज  हॉटेल पाशी माझ्या गाडीचे आपोआप ब्रेक फेल होतात हे माझ्या मुलाला आणि बायकोला बरोबर माहित आहे. त्यामुळे जेवणासाठी गाडी थांबवताना मुलासाठी पनीर आणि माझ्यासाठी चिकन जिथे मिळेल तिथे थांबायचे हा अलिखित नियम ! तास दीड  तासाने जेवण आटपून आम्ही मार्गस्थ झालो.
हा रस्ता नागोठण्याच्या पुढे येऊन मुंबई गोवा रस्त्याला मिळतो.  दिवेआगर ला जाण्यासाठी माणगाव च्या पुढून उजव्या हाताला वळावे लागते. पुढील रस्ता काही फारसा मोठा नव्हता. काही ठिकाणी तर गावातून जाताना तो फारच अरुंद होत होता. शेवटी संध्याकाळच्या सुमारास दिवे आगार जवळील बोर्ली गावात मी बुक केलेल्या पांथस्थ प्रांगण या रिसॉर्ट मध्ये पोहचलो. हे रिसॉर्ट बुकिंग करतेवेळो Trip Advisor किंवा तत्सम पोर्टल वर दिसले नव्हते. इतर कुठल्यातरी वेब साईट वरून याचा पत्ता काढून मी फोन वर बुकिंग केले होते. आंबा काजू आणि इतर अनेक झाडांच्या सान्निध्यात कोकणातल्या घरांच्या धाटणीच्या छानशा रूम्स आणि कोटेजेस या रिसॉर्ट मध्ये आहेत. त्यावेळी नुकतेच सुरु झालेल्या त्या रिसोर्ट चे काम श्री पोटे पिता पुत्र बघत होते.

पांथस्थ प्रांगण येथील कॉटेज
संध्याकाळ  बरीच होत आली होती तरी समुद्र किनाऱ्यावर  एक चक्कर मारायची ठरले. तेथे जाताना बरेच लोक परत येताना दिसत होते. पर्यटन स्थळ असून सुद्धा किनाऱ्यावर  वर लाईटस नसल्यामुळे अंधारच होता. महाराष्ट्रातील मुंबई सोडल्यास बहुतेक सर्व बीच वर हीच स्थिती आहे.  पर्यटकांनी सोडलेले दिव्याचे कंदील आकाशात उडताना छान दिसत होते. आम्ही पण असा एक कंदील उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करून रिसॉर्ट वर परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिहरेश्वर ला निघायचे असल्याने रात्रीचे जेवण करून झोपी गेलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता करून नऊ वाजण्याच्या सुमारास हरिहरेश्वर साठी निघालो. दिवेआगरपासून हरिहरेश्वर ला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. दोन्ही मध्ये जवळ जवळ दहा किलोमीटर चा फरक आहे पण वेळ जवळपास तेवढाच लागतो. एक रस्ता सुरुवातीला समुद्राच्या काठाने जातो.  मला  याच मार्गाने  जायचे होते .  तेथून जाताना समुद्राचे सुंदर दर्शन होते.
बऱ्याच वर्षांपासून  त्या रस्त्याने जायचे असे मनात होते. पण चुकून आम्ही दुसरा रस्ता घेतला. जो पर्यंत ते आमच्या लक्षात आले तो पर्यंत उशीर झाला होता. आज पुन्हा मागे फिरणे म्हणजे अशक्य होते कारण त्याच दिवशी हरिहरेश्वर करून दापोली ला जायचे होते! आता पुन्हा कधी योग येतो ते पाहायचे.
हरिहरेश्वर ला पोहचल्यावर गाडी पार्क करून सर्वप्रथम दर्शन केले. जवळ जवळ अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शन झाले. मंदिराच्या परिसरात त्या वेळी बांधकाम चालू होते. लाल जांभ्याच्या दगडातले मंदिराचे खांब सुंदर दिसत होते . मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग खूप सुंदर आहे. डाव्या बाजूने वर चढले की  पायऱ्या उतरत असताना समुद्राचे दर्शन होते. पूर्ण पायऱ्या उतरल्यावर खडकाळ किनाऱ्यावर असणाऱ्या लाटांचे मनोहर दृश्य नजरेस पडते. आपण प्रदक्षिणा करतो आहोत हा विचार मागे पडतो आणि आपण नकळत कॅमेऱ्याला हात घालतो. आमचेही तसेच झाले. यथेच्छ फोटो काढून झाल्यावर आम्ही राहिलेली प्रदक्षिणा पुरी केली. प्रदक्षिणा मार्ग पुरा होतो तिथे शहाळ्याच्या पाण्याने श्रमपरिहार पण केला.
एव्हाना दुपार उलटून गेली होते आणि आम्हाला फार उशीर करून चालणार नव्हते. दापोलीला जाण्यासाठी आम्ही वेशवी ते बागमांडले फेरी घेण्याचे ठरविले. प्रत्युष चा फेरीतून कारने जाण्याचा तो पहिला अनुभव असणार होता. लहानपणी वेंगुर्ल्याहून गोव्याला जायचो ते दिवस आठवले. महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर सातार्डा गाव आहे. तेथे पूल नव्हता त्यामुळे एस टी मधून उतरल्या उतरल्या लोकांची होडी पकडण्यासाठी लगबग असायची. त्या छोट्याशा होडी मध्ये एखादी सायकल पण असायची. नदीच्या संथ पाण्यातून होडी जेमतेम एक फूट भरच वर असायची. थोडी भीती वाटायची पण त्यापेक्षा मजा जास्त यायची. होडी दुसऱ्या किनाऱ्याला लागली कि मग लोकांची बस पकसडण्यासाठी पुन्हा गडबड असायची

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर फेरीबोट आली. यापूर्वी मी बऱ्याच वेळा फेरीबोटीतून गेलो असलो तरी कार स्वतः चालवत फेरीबोटीत चढवायची आणि काढायची माझी पहिलीच वेळ होती . पलीकडे पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. रस्ता माहित नसल्यामुळे पूर्णतः गुगल मॅप वर अवलंबून राहावे लागणार होते. लवकरच काळोख पण झाला. रस्ता एकदम छोटा आणि आजूबाजूला कुठं वस्ती पण एवढी नव्हती. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून एवढे नक्की की आपण गुगल वर पूर्णतः अवलंबून राहू शकत नाही त्यामुळे अधून मधून लोकांना विचारून खातरजमा करून घेणे कधीही चांगले. परंतु रस्त्याच्या बाजूला घरे क्वचित दिसत होती. कोकणातील ती छोटीशी घरे आणि त्यात भरीस भर म्हणजे लाईट पण गेले होते त्यामुळे स्त्यावर तर काळोखाच पण एखादे घर लागले तर तेथेही मिणमिणता प्रकाश असायचा. शेवटी त्या काळोख्या वळणावळणाच्या रस्त्यावरून  हळू हळू गाडी चालवत रात्री साडे नऊ दहा च्या सुमारास दापोली मधील आमच्या रिसॉर्ट्स वर पोहचलो.

No comments: