Pages

Friday, April 19, 2019

फेलो ऑफ द रॉयल सोसायटी २०१९ - डॉ गगनदीप कांग 


"फेलो ऑफ द रॉयल सोसायटी २०१९ - डॉ गगनदीप कांग" 
UK  रॉयल सोसायटी च्या ३६० वर्षाच्या इतिहासात "फेलो ऑफ द रॉयल सोसायटी" म्हणून निवड होणारी  डॉ गगनदीप कांग या पहिल्या भारतीय स्त्री वैज्ञानिक आहेत.
 17व्या आणि 18 व्या शतकात खुद्द ब्रिटन मध्ये स्त्री शिक्षणाचे प्रमाण नगण्य होते. 360 वर्षांच्या इतिहासात एखाद्या स्त्री ला रॉयल सोसायटी ची फेलोशिप मिळण्यासाठी 1945 साल उजाडावे लागले.  2018 पर्यंत सुद्धा स्त्रियांचे प्रमाण 8.5 टक्क्यांच्या वर जाऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमी वर डॉ कांग यांचे हे यश खरोखर कौतुकास पात्र तर आहेच पण त्या बरोबर भारतातील जवळ जवळ निम्मी लोकसंख्या   (48 टक्के) जी  स्त्रियांची आहे त्यांच्या साठी खूपच प्रेरणादायी आहे. 

रॉयल सोसायटीच्या  फेलोशिप साठी, ज्यांनी   सायन्स , गणित, अभियांत्रिकी विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील  ज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा व्यक्तींची निवड केली जाते. १६ एप्रिल २०१९ रोजी रॉयल सोसायटीने  फेलो ऑफ द रॉयल सोसायटी म्हणून एकावन्न नामांकित शास्त्रज्ञांची निवड केली त्याशिवाय  १० नव्या परदेशी सदस्यांसह विज्ञान क्षेत्रातील अपवादात्मक योगदाना साठी  "मानद फेलो" म्हणून एकाची  निवड केली.  डॉ. गगनदीप कांग या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहे ज्यांना ही  फेलोशिप मिळाली आहे.

डॉ गगनदीप सध्या संसर्ग, आतड्याचे कार्य,  शारीरिक आणि संज्ञानात्मक विकास या सर्व गोष्टीमधील जटिल संबंधावर आधारित संशोधन करत आहेत आणि भारतात होणारे मानवी प्रतिरक्षाविज्ञान (Human Immunology) संबंधीचे संशोधन अधिक मजबूत करण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत.

रॉयल सोसायटीची फेलोशिप ही वैज्ञानिक जगामध्ये एक महत्वपूर्ण  सन्मान आहे.  डॉ गगनदीप कांग आणि इतर पाच नवीन भारतीय रॉयल फेलोंना  आता आयझॅक न्यूटन (1672), चार्ल्स डार्विन (183 9), मायकेल फैराडे (1824), अर्नेस्ट रदरफोर्ड (1j 9 03), अल्बर्ट आइनस्टाइन (1 9 21), श्रीनिवास रामानुजन (1 9 18) या सर्वांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळाला आहे. 

गगनदीप कांग यांनी वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून १९८७ साली  एमबीबीएस  आणि १९९१ मध्ये  मायक्रोबायोलॉजीमध्ये एमडी अभ्यासक्रम  पूर्ण केला  आणि १९९८ मध्ये पीएचडी प्राप्त केली. नंतर त्या  रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट्सची सदस्य बनल्या आणि डॉ. मेरी एस्टस्  समवेत हयूस्टन येथील बेलॉर कॉलेज ऑफ मेडिसीन येथे पोस्टडॉक्टरल  रिसर्च पूर्ण केला . 

डॉ गगनदीप कांग या सध्या  ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट , फरीदाबाद च्या (टीएचएसटीआय) कार्यकारी संचालक आहेत जी बायोटेक्नॉलॉजी विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारचा ची एक  स्वायत्त संस्था आहे. डॉ कांग आज भारतातील अग्रगण्य वैज्ञानिक आहेत  आणि त्यांच्या संशोधनात मुख्यत्वेकरून  मुलांमध्ये होणारे  व्हायरल इन्फेक्शन्स आणि रोटा व्हायरल लसींची चाचण्यांचा समावेश  आहे. त्यांनी  ३०० हून अधिक वैज्ञानिक संशोधन पेपर लिहिले आहेत. अनेक वैज्ञानिक नियतकालिकांच्या  संपादकीय मंडळांवर तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन निधी संस्थाशी निगडित असलॆल्या  पुनरावलोकन समित्या आणि  मुख्यत्वे लससंशोधनाशी  संबंधित असलेल्या सल्लागार समित्यांवर त्या कार्यरत आहेत. डॉ कांग या 2015 पासून, डब्ल्यूएचओ एसईएआरच्या प्रादेशिक टीकाकरण तांत्रिक सल्लागार समितीचच्या  अध्यक्षा  देखील आहेत.

2016 मध्ये, प्रतिष्ठित इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनने जगभरात आणि भारतात महत्त्वाच्या असलेल्या रोटाव्हायरस आणि इतर संक्रामक रोगांचा नैसर्गिक इतिहास समजून घेण्यासाठीच्या अग्रगण्य योगदानांसाठी लाइफ सायन्सेस श्रेणीतील  पुरस्कार गगनदीप कांग यांना दिला.

गगनदीप कांग यांनी  प्राप्त केलेले काही अन्य पुरस्कार 

2006: वर्षातील महिला बायोसायंटिस्ट 
2008: फेलो, रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट, लंडन 
2009: एबॉट ऑरेशन अवॉर्ड, इंडियन सोसायटी फॉर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी 
2010: फेलो, अमेरिकन एकेडमी ऑफ मायक्रोबायोलॉजी 
2011: फेलो, इंडियन एकेडमी ऑफ सायन्सेस 
2011: डॉ. वाय. एस. नारायण राव ऑरेशन पुरस्कार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च 
2013: फेलो, नॅशनल एकेडमी ऑफ सायन्सेस 
2014: वैद्यकीय संशोधन साठी रॅनबॅक्सी रिसर्च पुरस्कार 2013 
2015: डॉ एससी पारीजा ऑरेशन अवॉर्ड, इंडियन एकेडमी ऑफ ट्रॉपिकल पॅरासिटोलॉजी 
2016: फेलो, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी

 एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व 
डॉ कांग याना लहानपणापासून  विज्ञानामध्ये  मध्ये रस होता.  त्यांचे वडील रेल्वे मध्ये अभियंता  होते त्यामुळे त्यांचे शिक्षण हे अनेक अशा छोट्या छोट्या शहरांमध्ये झाले जिथे शनिवार- रविवारया सुट्टीच्या दिवशी फारसे काही करण्यासारखे नसायचे. अशा ठिकाणी त्यांच्या विरंगुळ्याचे साधन म्हणजे घरातील अतिरिक्त बेडरुममध्ये बनविलेली त्यांची  प्रयोगशाळा होती . त्यांचे  वडील एक अभियंता असल्याने, त्या दोघांचे बहुतेक प्रयोग हे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर आधारित असायचे. त्याचवेळी त्यांनी विज्ञानाच्या  निगडित क्षेत्रात आपले करिअर करण्याचे ठरविले होते.  

विविध विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या  महिलांना बऱ्याच  आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेषतः विज्ञान आणि संशोधन क्षेत्र हे पुरुषांची मक्तेदारी आहे असे आजही मानले जाते. डॉ कांग यांच्या मते 'विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग' या समस्येवर तोडगा काढण्यासाठी   विज्ञानाचे  महत्व जाणणाऱ्या आणि कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या  स्त्रियांना समर्थन देणाऱ्या समाजाची गरज आहे. समाजामध्ये या दोन गोष्टी रुजविल्या तर याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीचा असेल यावर त्यांचा विश्वास आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुण वर्गाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या च्या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाची , अखंड मेहनतीनंतर पुष्कळदा  मिळणाऱ्या असफलतेची आणि क्वचित मिळणाऱ्या असफलतेची जाणीव करून दिल्यास ती जाणीव तरुण पिढीच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी ठिणगी ठरेल असे त्या म्हणतात.  

दिनेश गिरप 


Tuesday, April 16, 2019

प्राजक्त


असतील सरले सरींचे अनेक पावसाळे तरीही
ओंजळीतील प्राजक्त अजुनी दरवळतोची आहे

Saturday, April 13, 2019

स्वप्न


व्योमाला कवटाळण्याचे पाहिले जे स्वप्न त्याने

हरवलेल्या अस्तित्वाचा त्याला आता गंध नाही

©

Friday, April 12, 2019

पालवी

पालवीने बहरलेले आंब्याचे झाड 

चैत्रात कोवळ्या पानांनी अख्खा पिंपळ नटतो  

पिंपळपाने 

Monday, April 08, 2019

चैत्राची पालवी

तुझ्या मायेची सावली
जशी चैत्राची पालवी

अंतरंगाला खुलवी
क्षणाक्षणाला भुलवी
वाऱ्यावरती झुलावी
तुझ्या मायेची सावली
जशी चैत्राची पालवी

खाली तपली धरती
वर उन्हे झळाळती
डोळे तुलाच शोधती
तुझ्या मायेची सावली
जशी चैत्राची पालवी

फुला फुलांची पाकळी
पाना पानाला खुलवी
ती  झाडे ही शोधती
तुझ्या मायेची सावली
जशी चैत्राची पालवी

आत्मविश्वास - किती खरा किती खोटा!

कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला आत्मविश्वास डळमळीत झाल्याचा अनुभव कधी ना कधी प्रत्येकाला येतो. माणसाला आत्मविश्वासाची गरज तेव्हाच भासते जेव्हा त्याच्या आयुष्यात स्पष्टतेचा अभाव असतो. उदाहरणार्थ, दिवसाच्या लख्ख प्रकाशात मोकळ्या रस्त्यावरून चालायला आत्मविश्वासाची गरज भासते का? तेच गर्द अंधारात चालायची वेळ आली तर मात्र आत्मविश्वासाची गरज पडते.
असा उभा केलेला आत्मविश्वास डळमळायला वेळ लागत नाही. दुसऱ्या लोकांचे आपल्याशी  वागणे  अथवा आयुष्यातील समस्या हा  आत्मविश्वास डळमळीत करतात. पण आपणाला  स्वतःविषयी आणि बाह्य गोष्टींबद्दल 'स्पष्ट' जाण असेल तर 'आत्मविश्वास' नावाच्या गोष्टीची मुळात गरजच पडत नाही! फक्त स्वतःकडे आणि बाह्य जगाकडे 'जसे आहे तसे' या स्वरूपात पाहता आले पाहिजे. एकदा का ही गोष्ट आपल्याला जमली की सारे काही 'स्पष्ट' दिसायला लागते. उणिवा जाणिवेमध्ये परावर्तित होऊन सारा मार्ग आपोआप दिसायला लागतो..

Sunday, April 07, 2019

एप्रिल महिना नुकताच सुरू झालाय. वाढत्या तापमानात हिरवाई सुकून चाललीय . 

Wednesday, April 03, 2019

आमचा कोंकण दौरा ...२०१४ दिवाळी - भाग 1

 2015 च्या दिवाळी दरम्यान लक्ष्मीपूजन करून दुसरया दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर ला सहकुटुंब कोकण दौरयावर निघायचे ठरले. मी  तळ कोकणातील  असलो तरी रायगड, रत्नागिरी च्या किनारपट्टीचा दौरा कधी केला नव्हता त्यामुळे या वेळेस ती पालथी घालायची ठरवली. नेहमी हे असेच होते . आपण जिथे राहतो त्या भागाचे आपल्याला अप्रूप नसते. पण मोठया हौसेने आपण कुठेतरी  दूरवर जातो आणि मग आपल्याला जाणवते की  आपले कोकण यापेक्षा कितीतरी सुंदर आहे.
 24 ऑक्टोबरला मुंबईहून निघून पहिला मुक्काम  दिवे आगर ला करणार होतो. त्यानंतर हरिहरेश्वर मार्गे दापोलीला जाऊन तेथे येथे दोन दिवस मुक्काम करायचे ठरले. दापोली जवळच हर्णे मुरुड चा किनारा आहे आणि तेथे महर्षी कर्वेचे स्मारक देखील आहे. दापोलीहुन गणपतीपुळ्याला मुक्काम करणार होतो. आणि तेथून मग गोव्याला आई बाबांना भेटून यायचे ठरले.
दापोली पर्यंतच्या मुक्कामाची बुकिंग करून पुढील  कार्यक्रम मागे पूढे करता यावा म्हणून बुकिंग केली नाहीत.
24 ऑक्टोबर ला सकाळी निघायाचा खरे तर विचार होता पण दिवाळी च्या गडबडीत सामानाचे पैकिंग करणे राहून गेले होते. त्यात पत्नी हॉस्पिटल मधून नाईट डयुटी आटपून सात वाजेपर्यन्त येणार होती. गाडीत पेट्रोल भरणे, PUC चे नूतनीकरण करणे, चाकातील हवा चेक भरुन घेणे या सर्व गोष्टी करता करता दुपारचे बारा वाजले तेव्हा कुठे आम्ही बाहेर पडलो!
गूगल मॅप वर दिवे आगार टाकल्यावर दोन ऑप्शन्स मिळाले. पहिला पर्याय म्हणजे पनवेल गोवा महामार्ग आणि दूसरा मार्गाने जायचे झाले तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे ने खालापुर पर्यन्त जायचे आणि त्यानंतर पाली मार्गे नागोठण्याजवळ  पनवेल गोवा महामार्गाला मिळायाचे. बऱ्याचदा अलिबाग- काशिद येथे छोट्या पिकनिक साठी जाताना गोवा मार्गाने जात असल्यामुळे यावेळी दूसरा मार्ग घ्यायचे ठरवले.
खालापुर टोल नाक्यापर्यंतचा ४०किलोमीटर चा  चा प्रवास एकदम जलद झाला. खालापुर टोल नाक्याच्या थोड़े पुढे आले की खोपोलीचा डावीकडे फाटा येतो तेथून खोपोली पाली रोड घेतला . आजकाल ऍडलॅब इमॅजिकाला जाणाऱ्यांमुळे या रस्त्यावरची वर्दळ फार वाढली आहे. नाहीतर पूर्वी फक्त अष्टविनायक वाल्या टुरिस्टचीच कायती वर्दळ असायची.  त्या फाट्यापासून ते इमॅजिकापर्यंतचा रस्ता ख़राब  झाला होता.  रोज येणारी शेकडो वाहने आणि त्यावेळी  नुकत्याच  सुरु झालेल्या वॉटरपार्क च्या उभारणी साठी ये जा करणारया वाहनांमुळे रस्त्याची ही अवस्था झाली असणार. या रस्त्याच्या आजूबाजूने आंबा नदी वहात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बऱ्यापैकी हिरवळ आहे. 
पुढे पालीजवळ पोहचल्यावर भुकेची जाणीव झाली.  एका हॉटेलपाशी थांबून जेवण घेतले आणि पुढील मार्गास लागलो. आम्ही तिघे प्रवास करत असताना जेवणासाठी थांबलो की  वेळेकडे पहात नाही ! प्रथम मेनूचे पारायण आणि नंतर डिश निवडल्यानंतर त्याचे Customization!! ऑर्डर घेणाऱ्याला प्रत्येकाच्या आवडी निवडी नुसार ऑर्डर केलेल्या डिश मध्ये काय हवे काय नको याचे सविस्तर वर्णन करायचे. मुलाला त्याच्या नान मध्ये पांढरे तीळ नको असतात. मला त्यातल्या त्यात झणझणीत पणा हवा असतो. प्युअर व्हेज  हॉटेल पाशी माझ्या गाडीचे आपोआप ब्रेक फेल होतात हे माझ्या मुलाला आणि बायकोला बरोबर माहित आहे. त्यामुळे जेवणासाठी गाडी थांबवताना मुलासाठी पनीर आणि माझ्यासाठी चिकन जिथे मिळेल तिथे थांबायचे हा अलिखित नियम ! तास दीड  तासाने जेवण आटपून आम्ही मार्गस्थ झालो.
हा रस्ता नागोठण्याच्या पुढे येऊन मुंबई गोवा रस्त्याला मिळतो.  दिवेआगर ला जाण्यासाठी माणगाव च्या पुढून उजव्या हाताला वळावे लागते. पुढील रस्ता काही फारसा मोठा नव्हता. काही ठिकाणी तर गावातून जाताना तो फारच अरुंद होत होता. शेवटी संध्याकाळच्या सुमारास दिवे आगार जवळील बोर्ली गावात मी बुक केलेल्या पांथस्थ प्रांगण या रिसॉर्ट मध्ये पोहचलो. हे रिसॉर्ट बुकिंग करतेवेळो Trip Advisor किंवा तत्सम पोर्टल वर दिसले नव्हते. इतर कुठल्यातरी वेब साईट वरून याचा पत्ता काढून मी फोन वर बुकिंग केले होते. आंबा काजू आणि इतर अनेक झाडांच्या सान्निध्यात कोकणातल्या घरांच्या धाटणीच्या छानशा रूम्स आणि कोटेजेस या रिसॉर्ट मध्ये आहेत. त्यावेळी नुकतेच सुरु झालेल्या त्या रिसोर्ट चे काम श्री पोटे पिता पुत्र बघत होते.

पांथस्थ प्रांगण येथील कॉटेज
संध्याकाळ  बरीच होत आली होती तरी समुद्र किनाऱ्यावर  एक चक्कर मारायची ठरले. तेथे जाताना बरेच लोक परत येताना दिसत होते. पर्यटन स्थळ असून सुद्धा किनाऱ्यावर  वर लाईटस नसल्यामुळे अंधारच होता. महाराष्ट्रातील मुंबई सोडल्यास बहुतेक सर्व बीच वर हीच स्थिती आहे.  पर्यटकांनी सोडलेले दिव्याचे कंदील आकाशात उडताना छान दिसत होते. आम्ही पण असा एक कंदील उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करून रिसॉर्ट वर परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिहरेश्वर ला निघायचे असल्याने रात्रीचे जेवण करून झोपी गेलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता करून नऊ वाजण्याच्या सुमारास हरिहरेश्वर साठी निघालो. दिवेआगरपासून हरिहरेश्वर ला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. दोन्ही मध्ये जवळ जवळ दहा किलोमीटर चा फरक आहे पण वेळ जवळपास तेवढाच लागतो. एक रस्ता सुरुवातीला समुद्राच्या काठाने जातो.  मला  याच मार्गाने  जायचे होते .  तेथून जाताना समुद्राचे सुंदर दर्शन होते.
बऱ्याच वर्षांपासून  त्या रस्त्याने जायचे असे मनात होते. पण चुकून आम्ही दुसरा रस्ता घेतला. जो पर्यंत ते आमच्या लक्षात आले तो पर्यंत उशीर झाला होता. आज पुन्हा मागे फिरणे म्हणजे अशक्य होते कारण त्याच दिवशी हरिहरेश्वर करून दापोली ला जायचे होते! आता पुन्हा कधी योग येतो ते पाहायचे.
हरिहरेश्वर ला पोहचल्यावर गाडी पार्क करून सर्वप्रथम दर्शन केले. जवळ जवळ अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शन झाले. मंदिराच्या परिसरात त्या वेळी बांधकाम चालू होते. लाल जांभ्याच्या दगडातले मंदिराचे खांब सुंदर दिसत होते . मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग खूप सुंदर आहे. डाव्या बाजूने वर चढले की  पायऱ्या उतरत असताना समुद्राचे दर्शन होते. पूर्ण पायऱ्या उतरल्यावर खडकाळ किनाऱ्यावर असणाऱ्या लाटांचे मनोहर दृश्य नजरेस पडते. आपण प्रदक्षिणा करतो आहोत हा विचार मागे पडतो आणि आपण नकळत कॅमेऱ्याला हात घालतो. आमचेही तसेच झाले. यथेच्छ फोटो काढून झाल्यावर आम्ही राहिलेली प्रदक्षिणा पुरी केली. प्रदक्षिणा मार्ग पुरा होतो तिथे शहाळ्याच्या पाण्याने श्रमपरिहार पण केला.
एव्हाना दुपार उलटून गेली होते आणि आम्हाला फार उशीर करून चालणार नव्हते. दापोलीला जाण्यासाठी आम्ही वेशवी ते बागमांडले फेरी घेण्याचे ठरविले. प्रत्युष चा फेरीतून कारने जाण्याचा तो पहिला अनुभव असणार होता. लहानपणी वेंगुर्ल्याहून गोव्याला जायचो ते दिवस आठवले. महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर सातार्डा गाव आहे. तेथे पूल नव्हता त्यामुळे एस टी मधून उतरल्या उतरल्या लोकांची होडी पकडण्यासाठी लगबग असायची. त्या छोट्याशा होडी मध्ये एखादी सायकल पण असायची. नदीच्या संथ पाण्यातून होडी जेमतेम एक फूट भरच वर असायची. थोडी भीती वाटायची पण त्यापेक्षा मजा जास्त यायची. होडी दुसऱ्या किनाऱ्याला लागली कि मग लोकांची बस पकसडण्यासाठी पुन्हा गडबड असायची

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर फेरीबोट आली. यापूर्वी मी बऱ्याच वेळा फेरीबोटीतून गेलो असलो तरी कार स्वतः चालवत फेरीबोटीत चढवायची आणि काढायची माझी पहिलीच वेळ होती . पलीकडे पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. रस्ता माहित नसल्यामुळे पूर्णतः गुगल मॅप वर अवलंबून राहावे लागणार होते. लवकरच काळोख पण झाला. रस्ता एकदम छोटा आणि आजूबाजूला कुठं वस्ती पण एवढी नव्हती. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून एवढे नक्की की आपण गुगल वर पूर्णतः अवलंबून राहू शकत नाही त्यामुळे अधून मधून लोकांना विचारून खातरजमा करून घेणे कधीही चांगले. परंतु रस्त्याच्या बाजूला घरे क्वचित दिसत होती. कोकणातील ती छोटीशी घरे आणि त्यात भरीस भर म्हणजे लाईट पण गेले होते त्यामुळे स्त्यावर तर काळोखाच पण एखादे घर लागले तर तेथेही मिणमिणता प्रकाश असायचा. शेवटी त्या काळोख्या वळणावळणाच्या रस्त्यावरून  हळू हळू गाडी चालवत रात्री साडे नऊ दहा च्या सुमारास दापोली मधील आमच्या रिसॉर्ट्स वर पोहचलो.