Pages

Sunday, March 04, 2018

प्रवासी घडीचा - असाही !

या मुंबईहून केरळला जाणाऱ्या ट्रेन्स जेव्हा बघावे तेव्हा भरलेल्या  असतात. 2007 ते 2010 या दरम्यान मुंबई ते  कालिकत प्रवासात बरीच वेगवेगळी माणसे भेटायची. त्यापैकीच ही एक वल्ली.
 दादरहून सुटणारी "दादर - एर्नाकुलम हॉलिडे एक्स्प्रेस".  रिझर्वेशन चक्क शेवटच्या क्षणी कन्फर्म झालेले! त्या दिवशी दुपारी साडे बारा वाजता  मी दादर हून गाडी पकडली. साईडचा बर्थ होता, समोर पनवेल पर्यंत कुणीच आले नव्हते. लांबच्या प्रवासात कुणीतरी गप्पा मारायला मिळाले की प्रवास  मस्त होतो. प्रत्युष साठी घेतलेल्या  भल्या  मोठ्या  इलेक्ट्रिक बाइकचा बॉक्स मी वरच्या बर्थ वर ठेवला होता. समोर ज्याची सीट असणार त्याने सहकार्य केले नाही तर पुढचा अठरा तासांचा प्रवास अडचणीचा ठरणार होता.
शेवटी ज्याची वाट पाहत होतो तो समोरचा  सीटवाला  पनवेलला आला. तो समोर बसल्या बसल्या मी त्याच्या कड़े बघून स्वागताचे हसलो!  साधारण पन्नास पंचावन्न वय असणारा काटकुळा गृहस्थ . डोक्यावरचे केस विरळ झालेले. डोळे काहीसे तांबरलेले. बसल्या बसल्या  त्याचा एक जोरदार उसासा. तो उसासा म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून  शेवटी एकदाची गाडी मिळाल्याचा  निश्वास होता हे  स्पष्ट दिसत होते.  त्याच्याकडे फारसे समानही  दिसत नव्हते. गाडी मार्गस्थ झाली आणि त्याचा मोबाईल वाजला. कोंकणी भाषेत तो समोरच्या व्यक्तीशी बोलत होता . मनात म्हटले बरे झाले, कोंकणी असल्याने मी आता त्याचाशी लगेच जवळीक साधू शकणार होतो ! प्रवासात किंवा आपला प्रदेश सोडून बाहेर कुठेही लागलीच जवळीक साधण्याचे हुकुमी साधन म्हणजे भाषा!
"गोयांक वता" ? मी सुरुवात केली.
"वय " त्याचे उत्तर.
" तू गोयांक वता "? त्याने विचारले
"ना रें , हाव केरलाक वता … माजे बाईल आणि चल्लो आसता थंय"
माझ्या नेहमीच्या अनुभवावरून समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खरेतर प्रश्नार्थक भाव दिसायला हवे होते. मी मराठी/कोंकणी बोलणारा; पत्नी आणि मुलगा केरळला असतात असे सांगितले की नेहमी प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. त्यामुळे मी आमच्या"Two States" ची संक्षिप्त कहाणी नेहमी तयार ठेवतो! पण या माणसाच्या चेहऱ्यावर अशा कोणत्या प्रकारचे भाव दिसले नाहीत. तो आपल्याच विचारात गढून गेलेला
थोड़े स्थिरस्थावर झाल्यावर त्याने बॅग मधून कोक ची बाटली काढली आणि एक मोठा घोट घेतला. त्याच्या एकंदर अविर्भावा वरून बाटली मध्ये कोक नव्हते हे निश्चित! जस जसा तो घोट घेत होता तस तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.
मी त्याच्याकडे निरखून बघतोय हे थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले असावे.
"गोव्यात घर आहे तुझे?" अचानक त्याने विचारले. संभाषण कोकणीतच सुरू होते.
"नाही, वेंगुर्ल्याला आहे" मी म्हणालो
"कोण असते तिथे?"
आई बाबा..
"बरे आहे"... त्याने पुन्हा उसासा सोडला.
"तुझे गोव्यात घर कुठे?" मी विचारले
"माझे नाही घर आता..." त्या बाटलीमधील "कोक" चा मोठ्ठा घोट त्याने उत्तराबरोबर रिचवला.
"मग? त्याचे काय झाले?" मी खरे तर  विचारावे की नाही असा  विचार करत होतो.
"माझ्या वडिलांचे होते पूर्वी गोव्यात घर पण आता नाही.
नातेवाईकांनी बळकावले.. आता कोर्टात केस सुरू आहे. उद्या तारीख आहे म्हणून चाललोय!" त्याच्या उत्तराने मला त्याच्या मघाच्या उसास्या मागचे कारण सापडले!
गोवा आणि कोकणात  अशी उदाहरणे नवीन नाहीत.
सत्तर ऐशीच्या दशकात किंवा त्याहूनही अगोदर तरूण मुले नोकरी धंद्याच्या निमित्ताने पुणे मुंबईची वाट धरायची ..माझे आजोबा पण चाळीस च्या दशकात असेच मिल कामगार म्हणून मुंबईत आलेले.(आजही स्थिती फारशी बदललेली  नाही म्हणा) घरी म्हातारे आईवडील असायचे. कालांतराने ते गेल्यावर मग गावाच्या फेऱ्या हळू हळू कमी होत जायच्या. सुरुवातीला गणपतीच्या निमित्ताने तरी नेमाने गावी येणारा चाकरमानी नंतर नंतर मुंबईला घरीच गणपती आणायला लागला. मुले मोठी झाली. त्यांना गावाकडची ओढ अजिबात नसायची. शिकून चांगल्या नोकरीधंद्याला लागली तर ठीक नाहीतर परेल लालबाग चे कट्टे होतेच! गावी असलेले घर आणि भोवतालच्या जागेवर शेजारी किंवा ईतर नातेवाईकांनी केव्हाच कब्जा केलेला असायचा. हळू हळू चाकरमानी निवृत्त व्हायला लागला की त्याला गावच्या घराची आठवण यायची. मग सुरू व्हायच्या कोर्ट कचेऱ्या!
"मी परळच्या रेल्वे वर्कशॉप मध्ये काम करतो... आता रिटायर्ड व्हायला तीन  वर्षे राहिली आहेत" तो म्हणाला.
एव्हाना मला त्याच्या पुढच्या कथेचा अंदाज आला! रिटायर्ड झाल्यावर मुंबईची रूम/फ्लॅट मुलाच्या स्वाधीन करून  गावी जाऊन राहायला जाणे हे चाकरमान्यांच्या स्वप्नांचा परमोच्च क्षण! तसाच प्लॅन याचा पण असणार.
"मग गोव्याला परत येऊन सेटल होणार का? " मी विचारले.
" नाही" तो उत्तराला.
मला खरेतर "नाही" उत्तर अपेक्षित नव्हते.
"घर आणि जागा ताब्यात मिळाल्यावर ती विकून टाकणार" तो म्हणाला.
कल्पना वाईट नव्हती. गोव्यात जागांचे भाव गगनाला केव्हाच पोहचले होते. चांगली रक्कम हाती पडली की मुंबईच्या फ्लॅट ला आणखीन एक दोन  बेडरूम सहज जोडल्या जाऊ शकल्या असत्या!
"तुला माउंट मेरी रोड वरचे  "शांती आवेदना सदन" माहीत आहे?" त्याने अचानक विचारले.
" हो" मी म्हणालो. अगदी शेवटच्या टप्प्यातल्या कॅन्सर पेशंट्सची सर्वोतोपरी काळजी घेणारी ही सेवाभावी संस्था मला माहित होती.
मी काही विचारणार एवढ्यात तोच पुढे सांगू लागला. "माझी बायको सहा महिन्यांपूर्वी  कॅन्सरने वारली. मला मुले नाहीत. शेवटची दोन वर्षे ती खूप आजारी असायची. खूप शुश्रूषा केली पण अगदी शेवटच्या टप्प्यावर माझ्या एकट्याने सारे मॅनेज होईना आणि त्या वेदना पाहवेनात. उपचारांसाठी पैसा हवा होता म्हणून नोकरी सांभाळणे गरजेचे होते. म्हणून मी शेवटचे काही दिवस बायकोला शांती सदन मध्ये ठेवले. तेथेच तिने शेवटचा श्वास घेतला."
त्याच्या डोळ्यातली वेदना स्पष्ट जाणवत होती. गप्पांना अनपेक्षित कलाटणी मिळाली होती.
"आता जर मी ही केस मी जिंकलो तर ही प्रॉपर्टी विकून मिळालेले पैसे मी शांती सदन ला दान करणार आणि माझ्या मृत्यूनंतर माझी इतर  मिळकतही ! " निव्वळ विचारानेच त्याचा चेहरा प्रसन्न दिसत होता. एव्हाना रिकामी झालेली "कोक" ची बॉटल त्याने खिडकीतून फेकून दिली आणि डोळे मिटून पाठीमागे रेलून बसला आणि पाच मिनिटात गाढ झोपी पण गेला!

No comments: