डिप्लोमाला प्रवेश
घेताय? मग कॉलेज
निवडण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या.. श्री दिनेश
देवेंद्र गिरप
दहावी झाल्यावर फक्त तीन वर्षात कमवायला लागायचे
असेल तर प्रोफेशनल डिप्लोमा सारखा दुसरा पर्याय नाही. विविध पर्यायांचा विचार करून डिप्लोमाला प्रवेश घेण्याचे
आपण निश्चित केले असेल तर एक चांगले पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) निवडणे खूप
महत्वाचे आहे. एखाद्या तंत्रनिकेतनामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी काही बाबी जरूर
जाणून घ्या
१. शासकीय, अनुदानित आणि विनानुदानित
शासकीय आणि अनुदानित तंत्रनिकेतानाची फी ही
विनाअनुदानित तंत्रानिकेतानांपेक्षा कितीतरी कमी असते. शहरी भागात बऱ्याचदा हा फरक
पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे पालकांचा ओढा हा साहजिकच प्रथम
अनुदानित तंत्रनिकेतानांकडे असतो.
२. इंडस्ट्री इंटर्नशिप
शैक्षणिक संस्था आणि इंडस्ट्रीज या दोन्ही घटकांनी एकत्र काम करणे ही काळाची गरज आहे.
तंत्रनिकेतनामधून बाहेर पडलेला विद्यार्थी लागलीच इंडस्ट्रीमध्ये सामाऊन
घेण्याच्या योग्यतेचा असेल तर त्याला नोकरी मिळण्यास कोणतीच अडचण येणार नाही.
त्यामुळे डिप्लोमा करत असतांनाच विद्यार्थ्याला कामाचा अनुभव मिळाला पाहिजे.
त्यासाठी इंडस्ट्री इंटर्नशिप ला पर्याय नाही हे सर्वांना कळून चुकले
आहे. अशा प्रकारची इंटर्नशिप पुरी केलेल्या विद्यार्थांना
नोकरीसाठीच्या मुलाखतीवेळी इतर उमेदवारांपेक्षा झुकते माप मिळणे साहजिकच आहे. अशा
प्रकारच्या इंडस्ट्री ट्रेनिंगला, बोर्ड ऑफ अॅप्रेन्टसशिप ची मान्यता असते आणि
त्यासाठी विद्यार्थाना इंटर्नशिपच्या दरम्यान विद्यावेतनही मिळते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज फार मोजक्या तंत्रनिकेतानामध्ये
अभ्यासक्रमात सहा महिने किंवा एका वर्षाच्या इंटर्नशिपचा समावेश आहे. मुंबईच्या एसएनडीटी
महिला विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन हे काही
मोजक्या तंत्रानिकेतानांपैकी एक की जिथे राबविल्या जाणाऱ्या दहा च्या दहा
अभ्यासक्रमांसाठी इंटर्नशिप सक्तीची आहे. बऱ्याचदा असे आढळते की
विद्यार्थी ज्या इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करत असतो तेथेच त्याला जॉब ऑफर पण
मिळते.
३. यशस्वी माजी विद्यार्थी
तंत्रनिकेतानामध्ये प्रवेश घेण्याअगोदर त्या
कॉलेजच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांबद्दल जाणून घ्या. कदाचित तंत्रनिकेतनाच्या
वेबसाईट वर ही माहिती पुरविलेली असू शकते. नाहीतर ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे
त्या शाखेच्या प्राध्यापकांशी बोलून ही माहिती काढू शकता. एक कार्यक्षम माजी
विद्यार्थी संगठना, सद्य विद्यार्थांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्लेसमेंटसाठी मदत करणे यात मोलाची कामगिरी करू शकते.
४. उद्योगजगताशी असलेले संबंध
कोणत्याही व्यावसाईक अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट हे
उद्योगजगताला हवे असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे असायला हवे. त्यासाठी या
दोन्ही घटकांनी हातात हात घालून काम करणे अपेक्षित आहे. इंटर्नशिप, इंडस्ट्रीज ना भेटी देणे, उद्योगजगताशी सबंधित
व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे, विद्यार्थ्यांना इंडस्ट्री प्रोजेक्ट्स वर
काम करायची संधी उपलब्ध करणे, वेगवेगळ्या कारणास्तव केलेले सामंजस्य करार याप्रकारे कॉलेज आपले उद्योगजगताशी असलेले संबंध वृद्धिंगत करू शकते.
या संबंधित माहिती कॉलेज चे माहितीपत्रक,वेबसाईट किंवा ब्लॉग यावर दिलेली असायला हवी.
५. जॉब प्लेसमेंट
डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच चांगला जॉब (नोकरी) मिळणे यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. पुढल्या करिअर
च्या दृष्टीने याचा खूप उपयोग होतो.
आपण डिप्लोमाला प्रवेश घेतोय ते फक्त पदविका
मिळविण्यासाठी नाही तर नोकरी मिळविण्यासाठी हे पक्के लक्षात असुदया नाहीतर नंतर
हातात नुसती पदविका घेऊन नोकरी शोधण्याची कसरत करावी लागेल. नुसती पदविका मिळवून
देणारी अनेक तंत्रनिकेतने आहेत पण तुम्हाला नोकरीच्या लायक बनवून ती प्राप्त करून
देणारी फार कमी तंत्रनिकेतने आहेत. मात्र यासाठी विद्यार्थ्यांची अथक परिश्रम
करायची तयारी हवी.
६. शिक्षकवृंद
विद्यार्थ्यांच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांचे
महत्व अनन्यसाधारण आहे. आपण ज्या शाखेत प्रवेश घेतो आहे त्या शाखेमध्ये
शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आहे की नाहीत याची खात्री करून घ्या. साठ
विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी १०
अधिव्याख्याते ( लेक्चरर्स ) आणि एक विभागप्रमुख एवढा शिक्षकवृंद असणे आवश्यक आहे.
ही सर्वच्या सर्व पदे जर कायमस्वरूपी भरलेली असतील तर उत्तम. काही
ठिकाणी जर ही पदे भरलेली नसतील तर कोणत्या प्रकारे शिकविण्याचे कामकाज पार पाडले
जाते याची माहिती करून घ्या. काही तंत्रनिकेतनांमध्ये इंडस्ट्रीमधील अनुभवी तंत्रज्ञांना तासिका तत्वावर व्हिजीटींग लेक्चरर म्हणून
नेमले जाते. जी तंत्रनिकेतने अशा प्रकारची व्यवस्था करू शकतात ती आज उत्तम
तंत्रज्ञ निर्माण करत आहेत.
७. शैक्षणिक स्वायत्तता
जागतिक तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस बदलत असते.
तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलानुसार डिप्लोमाला शिकविला जाणारा अभ्यासक्रम बदलणे ही
काळाची गरज आहे. शैक्षणिक स्वायत्तता असलेल्या तंत्रनिकेतनांना इंडस्ट्रीच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करणे सोयीचे ठरते आणि त्याचा फायदा
चांगला जॉब मिळविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना नक्कीच होतो.
८. बक्षिसे आणि पुरस्कार
तंत्रानिकेतानाला आजपर्यंत मिळालेल्या
पुरस्कारांवर नजर जरूर टाका. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ
तंत्रनिकेतन पुरस्कार, आयएसटीई -
नरसी मोनजी पुरस्कार, एआयसीटीई- सीआयआय सर्व्हे अॅवार्ड असे काही पुरस्कार हे त्या कॉलेजच्या अथक
परिश्रमांची जाणीव करून देतात.
९. शासकीय व इतर मान्यता
कॉलेजमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमासाठी त्या वर्षीसाठीचे एआयसीटीई ने दिलेले EOA
( Extension of Approval ) हे प्रमाणपत्र असल्याची खात्री करून घ्या. अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ
अॅक्रिडीटेशन ची एकदा तरी मान्यता मिळाली असल्यास त्यास प्राधान्य दया.
१०. कौशल्य विकास पद्धती
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कोणत्या
विशेष पद्धतींचा अवलंब केला जातो ते समजून घ्या. विविध प्रोजेक्ट्स, वर्कशॉप्स, सेमिनार, इंडस्ट्री बरोबर मिळून स्थापन केलेल्या लॅब्ज या
सारख्या विविध माध्यमांचा वापर करुन कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात
११. अपारंपरिक अभ्यासक्रम
डिप्लोमा म्हटले की बहुतेकांच्या नजरेसमोर
इंजिनिअरिंग हा एकच पर्याय येतो. इंजीनियरिंग व्यतिरिक्त फॅशन टेक्नोलॉजी, फूड टेक्नोलॉजी, ज्वेलरी डिज़ाइन, ओफ्थैल्मिक टेक्नोलॉजी, ट्रॅवेल अँड् टुरिज़म या सारखे अनेक डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.या
पैकी बहुतांश क्षेत्रात आज भारतात उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच नोकरीच्या व
उद्योजक बनण्याच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत.
१२. प्रवेशक्षमता
एआयसीटीई च्या नियमानुसार प्रत्येक
अभ्यासक्रमाला 60 ची प्रवेशक्षमता असते. काही तंत्रनिकेतनांमध्ये 30 किंवा 40 ची प्रवेश क्षमता असते. कमी विद्यार्थीसंख्या असेल तर
शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या मूल्यमापनासाठी पुरेसा वेळ देऊ शकतात.
१३ इतर सुविधा
वेगवान इंटरनेट सुविधेने आणि पुस्तके, जर्नल्स नी सुसज्ज असलेली लायब्ररी म्हणजे
विद्यार्थ्यांसाठी वरदान. प्रॉजेक्ट्स,
असाइनमेंट्स साठी करावी
धावपळ त्यामुळे थोड़ी कमी होईल. आजकाल लेक्चर्स ही फ़क्त क्लासरूम पुरती मर्यादित न
ठेवता ती जर वीडियोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली तर त्याचा
खुप फायदा होतो. सर्व कसोट्यांवर उत्तीर्ण होणारे कॉलेज आपल्या घराच्या जवळ असेलच
असे नाही. तेव्हा अशा कॉलेज मध्ये होस्टेल ची चांगली सोय असेल तर त्याचा लाभ जरूर
घ्या.