Pages

Wednesday, December 30, 2015

सलाम एका जिप्सी ला ...कुणी तरी साद घातली दूर अनंतामधून …

आजच्या दिवसाची सकाळ कविवर्य मंगेश पाडगावकर गेले या दुखःद बातमीने झाली. गेली सत्ताविस वर्षे पाडगांवकरांची कविता जगत आलोय. नव्वद साली माझ्या एस .आई. इ. एस. कॉलेज मध्ये बोलगाणी सादर करणारे पाडगांववकर आज इतकी वर्षे डोळ्यासमोरून हलले नाहीत. कला आणि सहित्याच्या क्षेत्रातील माझ्या वेंगुर्ल्याच्या दोन व्यक्ती - कवीवर्य श्री. मंगेश पाडगांवकर व चित्रकार श्री. अरुण दाभोलकर माझ्यासाठी दैवतासमान. पाडगावकरांच्या कवितेत आणि दाभोलकरांच्या चित्रांमधे मला नेहमी साध्यर्म आढळते. जे एक कलाकार शब्दांतून व्यक्त करतो ते दुसरा कुंचल्यातून. मागे एकदा एका प्रदर्शनात दाभोलकरांना मी हे बोलून दाखवले पण पाडगांवकरांशी बोलण्याचा योग कधी आला नाही. कॉलेजच्या वर्षांमध्ये या दोघांचा प्रभाव एवढा की त्यांच्या कवितांसारखी कविता आणि पेंटिंग करण्यामध्ये तासन् तास निघुन जात. इंजिनियरिंग ला वारणेत असताना केलेली पाडगावकरांच्या बोलगाणी स्टाईल ची ही कविता.…


"एका पाखराचे गाणे"

मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
गाणं कालचं
गाणं आजचं
गाणं उद्याचं
किलबिल करणारं गाणं
आसवात चिंब नहातं
बागडून बागडून पाखरू थकतं
थकून झोपी जातं
मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
खरं तर हे गाणं
आपल्यासाठी कधीच नसतं
कुणाला तरी ते खुणवित असतं
हळुवार ताना घेत
वाऱ्याबरोबर झुलत असतं
पानापानातून फुलणारं हे गाणं
श्वासा श्वासातून जाणवतं
मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
पाखराच्या गाण्याने
जाग्या होतात आठवणी
सुगंधाने भरलेल्या जाई जुई
खळाळण्याऱ्या निर्झराचे
अवखळ पाणी
वाऱ्यावर डोलणाऱ्या गवतात
एक फुलपाखरू बागडतं
मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
गिरक्या घेत गाणं गातं ….
आपल्या भारलेल्या शब्दांनी माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा ठेवा देऊन गेलेल्या या अवलियाला माझी भावपूर्ण श्राद्धांजली . आज पुन्हा या तुमच्या ओळी आठवल्या …

व्योमांतुन उडतांना, ओढीतसे मज घरटे
अन उबेत घरट्याच्या, क्षुद्र तेच मज गमते.
हे विचित्र दु:ख असे, घेऊनि उरी मी जगतो
घरट्यातून, गगनातुन, शापित मी तगमगतो.