Pages

Wednesday, December 30, 2015

सलाम एका जिप्सी ला ...कुणी तरी साद घातली दूर अनंतामधून …

आजच्या दिवसाची सकाळ कविवर्य मंगेश पाडगावकर गेले या दुखःद बातमीने झाली. गेली सत्ताविस वर्षे पाडगांवकरांची कविता जगत आलोय. नव्वद साली माझ्या एस .आई. इ. एस. कॉलेज मध्ये बोलगाणी सादर करणारे पाडगांववकर आज इतकी वर्षे डोळ्यासमोरून हलले नाहीत. कला आणि सहित्याच्या क्षेत्रातील माझ्या वेंगुर्ल्याच्या दोन व्यक्ती - कवीवर्य श्री. मंगेश पाडगांवकर व चित्रकार श्री. अरुण दाभोलकर माझ्यासाठी दैवतासमान. पाडगावकरांच्या कवितेत आणि दाभोलकरांच्या चित्रांमधे मला नेहमी साध्यर्म आढळते. जे एक कलाकार शब्दांतून व्यक्त करतो ते दुसरा कुंचल्यातून. मागे एकदा एका प्रदर्शनात दाभोलकरांना मी हे बोलून दाखवले पण पाडगांवकरांशी बोलण्याचा योग कधी आला नाही. कॉलेजच्या वर्षांमध्ये या दोघांचा प्रभाव एवढा की त्यांच्या कवितांसारखी कविता आणि पेंटिंग करण्यामध्ये तासन् तास निघुन जात. इंजिनियरिंग ला वारणेत असताना केलेली पाडगावकरांच्या बोलगाणी स्टाईल ची ही कविता.…


"एका पाखराचे गाणे"

मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
गाणं कालचं
गाणं आजचं
गाणं उद्याचं
किलबिल करणारं गाणं
आसवात चिंब नहातं
बागडून बागडून पाखरू थकतं
थकून झोपी जातं
मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
खरं तर हे गाणं
आपल्यासाठी कधीच नसतं
कुणाला तरी ते खुणवित असतं
हळुवार ताना घेत
वाऱ्याबरोबर झुलत असतं
पानापानातून फुलणारं हे गाणं
श्वासा श्वासातून जाणवतं
मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
पाखराच्या गाण्याने
जाग्या होतात आठवणी
सुगंधाने भरलेल्या जाई जुई
खळाळण्याऱ्या निर्झराचे
अवखळ पाणी
वाऱ्यावर डोलणाऱ्या गवतात
एक फुलपाखरू बागडतं
मनाच्या फांदीवरचे गुणी पाखरू
गिरक्या घेत गाणं गातं
गिरक्या घेत गाणं गातं ….
आपल्या भारलेल्या शब्दांनी माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा ठेवा देऊन गेलेल्या या अवलियाला माझी भावपूर्ण श्राद्धांजली . आज पुन्हा या तुमच्या ओळी आठवल्या …

व्योमांतुन उडतांना, ओढीतसे मज घरटे
अन उबेत घरट्याच्या, क्षुद्र तेच मज गमते.
हे विचित्र दु:ख असे, घेऊनि उरी मी जगतो
घरट्यातून, गगनातुन, शापित मी तगमगतो.

Tuesday, May 19, 2015

देवाचा एड्रेस

इकडचा देव पावतो तिकडचा पावत नाही
 हे असं काही असेल हे मनाला पटत नाही...
देव भेटला तर विचारेन म्हणतो
खरेच का रे बाबा तू असा वागतो?
बडव्यांनी वेठीस धरून सुद्धा त्यांचीच री ओढतो...
तुझे VIP दर्शन परवडत नाही रे सगळ्यांना
'रांगेतल्या कष्टांचे फळ मोठे' असे समजावावे लागते स्वतःला
रंजल्या गांजल्यांना  तू म्हणतो आपुला
गेले सांगुनी तुकोबा आम्हाला 
आज पुजारी काही वेगळच सांगतो 
पाच नारळ आणि पाचशे रुपये मागतो 
पूर्वी सारखी आकाशवाणी आता कर बाबा एकदा
तुझा खरा खुरा एड्रेस कळू दे लोकांना

Tuesday, May 12, 2015

शिरोडा वेळागर भेट

खुप साऱ्या वर्षांनी शिरोडयाच्या समुद्रकिनारी म्हणजे वेळागरावर जायचा योग आला. तब्बल पंचवीस सव्विस वर्षापूर्वीचे दिवस आठवले. माझ्या 9 वर्षाच्या मुलास मी एक एक आठवणी सांगत होतो.
किनाऱ्यावर जायच्या रस्त्यावर डाव्या बाजूला भली मोठी मोकळी जाग आहे. तिथे कुणी शेती करत असल्याचे आठवत नाही. ती आमची सीजन बॉल क्रिकेट खेळायची जागा होती. ती जागा थोडीशी सखल असल्यामुळे बऱ्यापैकी हिरवळ असायची. तेथे मॅट टाकून क्रिकेट खेळायचो. साऱ्या मित्रानी मिळून क्रिकेटचे किट्स घेतले होते. मुलाला हे सारे सांगितले तर तो विचारतो की ते किट आता कुठे आहे! म्हटले, माझा एक मित्र अजूनही क्रिकेट खेळतो.. त्याच्या कड़े आहे! नाही म्हटले तरी  यातली अर्धी गोष्ट खरी आहे. माझा गावचा एक वर्ग मित्र "आशिष" अजूनही म्हणजे वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा विशिच्या जोमाने क्रिकेट खेळतो. कांगा लीग ला राम राम ठोकल्यावर गावी स्थायिक झाल्यानंतर नोकरी करत आणि मुख्यत्वे दुखपतींचा सामना करत त्याने आपले क्रिकेट सुरु ठेवले.
शिरोडयाच्या किनाऱ्यावर सुरुच्या झाडांचे छान बन आहे. आता इतक्या वर्षानंतर झाडे विरळ झाली आहेत पण पूर्वी घनदाट झाडी होती. दहावीचा अभ्यास आम्ही सारे मित्र मिळून या बनात करायचो ते आठवले. आपली आपली पुस्तके घेऊन सायकल वर टांग मारुन आम्हा मित्रांचा ग्रुप तिथे दुपारी पोहचायचा आणि एक एका मोठाल्या झाडाच्या बुंध्याला टेकुन आम्ही संध्याकाळ पर्यंत अभ्यास करायचो. संध्याकाळ झाल्यावर समुद्रावरचे पाण्यात डुंबणे किंवा विस्तीर्ण किनाऱ्या वरचा फेरफटका खुप आनंद देऊन जायचा.
कधी कधी मित्रांचा मिळून पूर्ण दिवसाचा प्लॅन बनायचा. शिरोडयापासून जवळच सागरतीर्थ म्हणून आरवलीचा सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. तेथे पूर्ण दिवस घालावायचा. घरुन जेवण बनवून आणायचे आणि बरोबर खुप सारे खायचे पदार्थ. दिवसभर समुद्राच्या पाण्यात डुंबायचे आणि अहोटी सुरु झाली की किनाऱ्यावरच्या कडक वाळूत क्रिकेट खेळायचे. त्या दिवशी सुरुच्या बनात बसून केलेल्या जेवणाची सर इतरवेळी यायची नाही.
वि. स. खांडेकर ज्या टेकडीवर बसून लिखाण करायचे ती "भिके डोंगरी" टेकडी येथेच आहे. तेथून विहंगम दृष्य दिसते. शाळेत असताना वचनाचा भयंकर नाद...एका मागोमाग एक अशी विविध विषयांवरची पुस्तके वाचायचो.  दर दिवशी खटखटे  वाचनालयाची फेरी चुकत नसे. मी ज्या शाळेत जायचो त्या ट्यूटोरियल हायस्कूल मध्ये खांडेकरानी कित्येक वर्षे अध्यापन केले होते. जेव्हा जेव्हा त्या टेकडीवर जाणे व्हायचे तेव्हा तेव्हा  वि स खांडेकर तेथे बसून लिहित आहेत असा आभास व्हायचा.
आता काळ बदलतोय आणि एवढ्या वर्षे जैसे थे असलेला मालवणी मुलुख सुद्धा बदलतोय. पर्यटनाच्या नावाखाली किनाऱ्यालगत रिसॉर्ट्स उभारली जात आहेत. शिरोडा ते वेळागर या रस्त्यावर  छोटी छोटी होटेल्स दिसली. किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स चालु केलेले आढळले. उंटाला पाहुन तर धन्य झालो. थोड्या फार फरकाने हाच प्रकार मी दापोली, दिवे आगार, हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर पण पहिलाय. पण सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर पर्यटनसाठी निव्वळ हे टिपिकल गोवा मॉडेल कितपत यशस्वी होईल याबाबत मी साशंक आहे. त्यासाठी तारकर्ली मालवण येथे ज्या प्रकारे वेगवेगळे पर्याय उपलब्ध केलेले आहेत तसे काहीसे पर्याय येथील प्रत्येक किनाऱ्यांवर उपलब्ध करुन द्यायला हवेत.

Monday, May 11, 2015

एक होते एसटी महामंडळ!!

काल मुंबईहून गावी वेंगुर्ल्याला पुणे मार्गे येताना एसटी महामंडळाची दुरावस्था पाहायला मिळाली. लोणावळया जवळ एक्सप्रेस वे वर हिरकणी बसने पेट घेतला होता. प्रवासी कसेबसे उतरून बस पासून शक्य तेवढे लांब पळायच्या प्रयत्नात दिसले. थोड्या पुढे अजुन एक बस बंद पडल्याने प्रवासी दुसऱ्या वाहनाच्या प्रतिक्षेत एक्सप्रेस वे वर उभे होते. एक्सप्रेस वे वर वाहन उभे करुन प्रवाशांचा जीव पुन्हा एकदा एसटीने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला होता. खंबाटकी घाटच्या अगोदर एक लाल एसटी बस बंद पडली होती. ड्राइव्हर कंडक्टर सहित काही प्रवासी नजिकच्या दुकानातून पाण्याच्या बाटल्या भरून बहुदा रेडिएटर मध्ये टाकण्यासाठी पाणी घेऊन येत होते! त्यानंतरच्या प्रवासात सुद्धा दोन तीन गाड्या बंद पडलेल्या आढळल्या.

याचा अर्थ महामंडळाच्या गाड्यांची देखभाल नीट होत नाही आहे हे स्पष्ट आहे. पण यामुळे आपण प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहोत हे महामंडळच्या व शासनाच्या लक्षात येत नाही आहे का? शासन दरबारी भरती साठी  होणारी दिरंगाई सर्वाना परिचीत आहे पण ती लोकांच्या जीवावर बेतणार असेल ते अक्षम्य आहे...
हळू हळू अपघात वाढत जातील, गाड्या रस्तो रस्ती बंद पडलेल्या दिसतील... मग प्रवाशानी पाठ फिरवल्यावर भारमान कमी म्हणून फेऱ्या रद्द केल्या जातील. मग उत्पन्न कमी म्हणून खर्च कपात मग भरतीवर निर्बंध हे चक्र सुरु...शेवटी महामंडळ बरखास्त होणार आणि रिलायन्स बस सेवा सुरु करणार!

Saturday, April 25, 2015

समाधानी देशांच्या यादीत भारत 117 व्या स्थानी!!

एका सर्वेक्षणा नुसार सुखी समाधानी देशांच्या यादीत भारत 117 नंबर वर!! पाकिस्तान 81 व्या स्थानावर तर बांग्लादेश पण भारताच्या पुढे!! अचंबित करणारा सर्वे म्हणावा लागेल...कधी कुठे केव्हा बॉम्ब फुटेल याची शास्वती नसणारा, अमेरिकेच्या मदतीवर जगणाऱ्या पाकिस्तानातील नागरिक समाधानी आणि भारतातील नागरिक असमाधानी?  सर्वे साठी कोणती राज्ये निवडली होती कुणास ठावुक! केरळ, पंजाब, आंध्र प्रदेश अशी राज्ये निवडली असल्यास तेथील नागरिक अमेरिकेस किंवा दुबईला जायला न मिळाल्यामुळे असमाधानी असू शकतात! प्रभूंची रेल्वे अजुन नॉर्थ ईस्ट ला न पोहचल्यामुळे तेथील जनता असमाधानी असू शकते! प. बंगाल , बिहार, उत्तर प्रदेश "अच्छे दिन" अजुन न आल्यामुळे दुःखी असावेत! गुजरातला खरे तर असमाधानी होण्याचे कोणतेच कारण नाही.. आज HPCL च्या IVR वर पण "गॅस बुक करवा माटे 1 दबाव" म्हणून कुठली तरी बेन मला मुंबईत सांगत होती!! महाराष्ट्राची माणसे असमाधानी असणेच शक्य नाही.. "अनंता ठेविले तैसेचि रहावे" ही परंपरा जपणारी माणसे आम्ही!! "अथिति देवो भवः" म्हणत आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करण्यात मग्न असणाऱ्या महाराष्ट्रात कुणी असमाधानी असेल असे वाटत नाही!! बिचाऱ्या शेतकऱ्याकडे सर्वेवाले जाउन काही विचारतील याच्यावर माझा विश्वास नाही! एकंदरीत तुर्तास या सर्वेवर विश्वास ठेवावा असाच विचार करतोय!!!

Tuesday, March 17, 2015

कोकण रेल्वे अणि दंडवते

कोकण रेल्वेचे संगमेश्वर स्थानक. समोरून येणाऱ्या गाड़ीमुळे आमची मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस सायडिंग ला थांबलेली. पाय मोकळे करण्यासाठी मी प्लॅटफ़ॉर्म वर उतरलो असताना पैंट्रीचे दोन कामगार आणि एक पैसेंजर यांच्या मधला हा  संवाद तुमचे नक्की मनोरंजन करेल.
कुणीतरी या पैंट्री कर्मचाऱ्यांची फोनवरुन त्यांच्या कंपनीला तक्रार केल्यामुळे ते त्रस्त होते. आपल्याला उत्तर भारतीय रेल्वे कामगार बघायाची सवय. कोकण रेल्वेच्या कृपेने समोरचे हे दोघे बहुदा कामाला लागलेले. त्यातला एक वैतागुन दुसऱ्याला सांगत होता " आता समोरून आलेल्या गाड़ीसाठी ही गाड़ी थांबवली म्हणून सुध्दा रेल्वे मंत्र्यांना तक्रार करा म्हणावे"
" लोकांचे काही खरे नाही... लोकं ते पण करतील" दुसऱ्याने त्याची री ओढली
(रेल्वे मंत्री  कोकणचे असल्याचा परिणाम असावा)
त्यावर समोर उभा असलेला प्रवाशाला बहुदा राहावले नाही त्यामुळे त्याना समजावयाच्या सुरात म्हणाला " नाही हो..मिळून मिसळून रहायचे ही कोकणची संस्कृती, म्हणून तर येथे एवढे बाहेरचे लोक येवून राहतात" ( बोलण्यात खंत होती का अभिमान ते कळले नाही)
दोघे कर्मचारी माना डोलावतात. त्यामुळे प्रवाशाला हुरुप येतो. तो पुढे चालू करतो " ही कोकण रेल्वे धावते आहे ती त्या मधु दंडवतेंमुळे. नाहीतर किती मंत्री आले आणि गेले. कुणाला जे नाही जमले ते त्यानी केले. कोकणातल्या प्रत्येक माणसाने कोकण रेल्वेत चढ़ते वेळी दंडवतेंची आठवण काढली पाहिजे. मी तर माझ्या घरातल्यांना असे बजावून ठेवले आहे"
समोरचे दोन कामगार आता पुरते भारावून गेलेले असतात. त्यातला एक- " बरोबर आसा, बाकी कोनी आठवण काडुनी काय नको, मी मातर प्रत्येक टायमाक आठवण हमखास काडतय !"
" मग? काढायलाच हवी..कोकणाने किती मोठ-मोठे नेते देशाला दिले आहेत माहिती आहे?" कोकणी माणूस गप्पा मारायला लागला की ग्रामपंचायतीच्या तात्या सरपंचापासून ते आता बराक ओबामा पर्यंत सगळ्यां विषयी तेवढयाच अधिकार वाणीने बोलू शकतो याचे मूर्तिमंत उदहारण होता तो प्रवासी!
मला वाटले आता तो बॅरिस्टर नाथ पै यांच्या पासून सुरु करणार म्हणून मी मनातल्या मनात तो आणखी कोणती नावे घेणार याचा अंदाज घेऊ लागलो!
तोवर प्रवाशाने नावे सांगायला सुरुवात केली.."मधु दंडवते...आणि ते आपले....."
पुढची नावे त्याला आठवेनात. थोड्या पॉज नंतर तो पुन्हा बोलता झाला  " आगरकर, टिळक... हे नक्की कोकणचे की बाहेरचे माहित नाही पण महाराष्ट्रने सुद्धा देशाला या सारखे कितीतरी नेते दिले!"
त्याची गाड़ी आता कोकणातून राज्यपातळी वर येऊन पोहचली होती.
तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला त्यामुळे त्याला देश आणि जागतिक पातळी गाठता आली नाही!