Pages

Sunday, December 06, 2009

मुंबई ते मलबार व्हाया गुगल मॅप!


यावेळी पुन्हा एकदा मारुती झेन घेऊन मुंबईहून माही (केरळ) ला जायचा प्लान ठरला. मागील तीन चार वेळा जवळ जवळ तेराशे किलोमीटरचे हे अंतर मी गोवा -मंगलोर मार्गे (NH17 ) पार केले असल्याने या खेपेला कुठलातरी दुसरा मार्ग शोधावा असे मनात होते.
आतापर्यंत मुंबई ते गोवा बऱ्याचवेळा NH4 वरून अप -डाऊन केले असल्याने तो मार्ग मला सोयीस्कर वाटत होता.
कित्येकवेळा मुंबईहून गोव्याला जाऊन सुद्धा मी एकदापण चिपळूणमार्गे NH17 वरून गेलो नव्हतो. NH17 चा तो एकेरी वळणा- वळणांनी भरलेला रस्ता पॉवर स्टेअरिंग शिवाय पार करता करता दमछाक होण्याच्या भीतीमुळे किंवा माझ्या नातेवाईकांकडून ऐकलेले त्यांचे काही वाईट अनुभव अशा काहीना काही कारणांमुळे मी तो रस्ता सदा टाळत आलोय. त्याउलट रात्र असो वा दिवस ,मुंबई ते कोल्हापूर अंतर मी पाच तासाच्या आत न थकता सहज कापत आलोय. त्यामुळे यावेळी प्रवासाची सुरुवात NH4 वरूनच करायचे नक्की केले.
मुंबई ते उत्तूर ( निपाणी पासून अंदाजे २२ किलोमीटर ) मी एकटा ड्राईव्ह करणार होतो आणि मग माझा माझा मेहुणा "रेजी" मला सोबत करणार होता.
मार्ग निश्चिती:
प्रवासाला सुरुवात करण्या आधी पूर्ण मार्गाची आखणी करणे जरुरी होते. कित्येक वेळा रात्रीच्यावेळी रस्ता विचारण्यासाठी पण कुणी मिळत नाही आणि मिळालाच तर भाषेचा आणि नशेचापण प्रश्न येतो! त्यामुळे रात्रीचा प्रवास शक्यतो महामार्गावरूनच करण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे गुगल मॅप वर मार्ग निश्चित करणे सुरु केले. मला असा रस्ता
हवा होता की तो कुठेही NH17 ला मिळणार नाही. त्यामुळे बेळगाव ते मंगलोर जाण्याऱ्या बसेस जो मार्ग घेतात तो मी घेणार नव्हतो हे नक्की होते. शिवाय कर्नाटकातल्या महामार्ग सोडून अंतर्गत रस्त्यांच्या अवस्थेविषयी पण मी साशंक होतो. रस्त्यांच्या अवस्थेविषयी जाणून घ्यायचे असेल तर team -bhp .com ही एक उत्तम साईट आहे. या साईट वर बरीच उपयोगी माहिती वाचायला मिळाली. अगदी रस्त्यांच्या अवस्थेपासून ते ट्रक्सच्या ट्रॅफिक पर्यंत.
गुगल मॅप वरून मिळालेले पर्याय आणि team -bhp च्या टिप्स चा विचार करून शेवटी मुंबई - बेळगाव - हुबळी- हरीयार बायपास - शिमोगा - हासन - गोणीकोप्पाल- इरीट्टी- माही ( केरळ ) असा मार्ग निश्चित केला. पूर्ण प्रवास मी तीन टप्प्यात विभागाला. पहिला टप्पा मुंबई ते उत्तूर जिथे मला रेजी जॉईन करणार होता. तिथून पुढे बेळगाव ते हासन पर्यंत दुसरा टप्पा आणि तेथून माही पर्यंत तिसरा. गुगल मॅपवरून मिळालेल्या रुट चा प्रोब्लेम असा की त्यात मुख्यत्वेकरून मार्ग क्रमांक दाखवतात. गावांची नावे फारशी वापरलेली नसतात. आपल्याकडे महामार्ग सोडले तर रस्त्यांचे क्रमांक हे फक्त नकाशात दाखवण्यापुरते असतात असा रस्ते महामंडळाचा पक्का विश्वास असल्याने मी
आणखी खोलात जाऊन त्या मार्गावरल्या गावांची नावे शोधून काढली जी नंतर रस्ता विचारताना खूप उपयोगी पडली.


दुसरा टप्पा ( बेळगाव ते हासन )तिसरा टप्पा( हासन ते माही)
गुगल मॅपवरून काढलेला रुट वर दाखवलाय. बरोबर बऱ्याचशा खोलात जाऊन बनवलेला सविस्तर रुट होताच.

प्रवास :
प्रवासात माझ्याबरोबर असणार होती माझी मारुती झेन. या गाडीवर माझा बेहद विश्वास! माझ्या यापूर्वीच्या
कितीतरी केरळ , कोल्हापूर, सोलापूर , गोवा ट्रिप्सना या गाडीने कोणतीही तक्रार न देता साथ दिली आहे. "प्रत्यूष" माझा मुलगा सात महिन्याचा असताना केलेला 1600 km चा
केरळ प्रवास विलक्षण होता! त्या प्रवासा अगोदर मी साधे पंक्चर झालेले चाक पण बदलले नव्हते !

निघायच्या
आठवडाभर आधी नेहमी प्रमाणे गाडी वर्क-शॉप मध्ये पाठवली. "एवढ्या दूरच्या प्रवासासाठी जे काही गरजेचे असेल ते सारे काही कर " असे सांगितल्या मुळे माझ्या मॅकॅनिक ने पण हात जरापण आखडता न घेता पाच हजाराचे बिल हाती ठेवले! (मी जाणारा रस्ता हा दोन National parks मधून जाणारा असल्याने की काय त्याने दरवाजांची थोडीशी घट्ट असलेली रोलर असेम्ब्ली पण बदलून टाकली असावी! नाहीतर अस्वल यायचे आणि काच बंद करायला वेळ लागायचा!)

रविवार ,१५ डिसेंबर २००९ दुपारी बारा वाजता मी नवी मुंबई सोडले. मुंबई ते निपाणी हे अंदाजे ४०० km चे अंतर कधी पार पडते कळत नाही. बऱ्याचवेळा या मार्गावरून प्रवास केल्यामुळे रस्ता एकदम पाठ आहे. या रस्त्याची काही वैशिष्ठे आहेत... पुण्याच्या आसपास अचानक मध्ये येणारे बाईकवाले तुमच्या ड्रायव्हिंगचे कौशल्य तपासतात,
पुणे ते कराड रस्त्यावर क्वचित असणारे पण अंत पाहणारे खड्डे आढळतात. साताऱ्याच्या आसपास तळहातावर शीर घेऊन लढणारी (रस्ता क्रॉस करणारी वाचावे) प्रजा, शिरोली , कोल्हापूर, निपाणी भागात फोर्मुला वन मध्ये भाग घेतलेले ट्रॅक्टर-ट्रॉली अशा काही गोष्टींशी तुम्ही जेवढ्या लवकर जुळवून घ्याल तेवढे उत्तम!

पनवेल सोडल्यावर अंदाजे ४० km वर फूड मॉल येतो. सकाळी फक्त चहा- बिस्किट्स खाऊन निघाल्याने पोटाने फूड मॉल दिसल्याबरोबर भुकेची आठवण करून दिली. नानाविध पदार्थांची रेलचेल असताना मला खावीशी वाटली ती मराठभोळी झुणका भाकर! (येते काही दिवस केरळमध्ये डोसे खाऊन काढावे लागणार म्हणून नाही ना ?)
या वीस एक मिनिटांच्या ब्रेक नंतर पुढचा प्रवास सुरु केला. लोणावळ्याने मला माझ्या पावसातल्या ट्रिप्स ची आठवण करून दिली. धुक्याने भरलेल्या रस्त्यांवरून Amby Valley च्या दिशेने जाताना मन चिंब होते.

त्यानंतर चहाचा ब्रेक आणि पेट्रोल भरण्यासाठीचा ब्रेक वगळता थेट उत्तूर गाठले. उत्तूरला जाण्यासाठी निपाणी जाऊन छोटासा घाट लागल्यावर एक उजवीकडे फाटा जातो. येथे तुम्ही NH4 सोडता. उत्तूरला पोहचलो तेव्हा संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. नेहमीप्रमाणे तिथे एकदम मस्त थंड वातावरण होते. उत्तूर-आजरा-आंबोली ची आल्हादायक हवा तुम्हाला सारा शीण विसरायला लावते. माझा विचार खरे तर मस्तपैकी आंघोळ करून, जेवून एक वाजेपर्यंत झोप काढायचा होता! पण पुढील प्रवासाच्या उत्कंठतेने मला झोप येईना!

रात्री दीडच्या सुमारास मी आणि रेजी निघण्यास तयार झालो.आता मला ड्रायव्हिंग करायचे नसल्याने मी निश्चिंत होतो. उत्तूर - बेळगाव-हुबळी- हरिहर बायपास हे अंदाजे ३३० km चे NH4 वरचे अंतर चार तासात कापायचा आमचा विचार होता. म्हणजे जेव्हा आम्ही NH4 सोडून स्टेट हायवे ला लागू तेव्हा सकाळ झालेली असेल आणि रस्ता विचारायला माणसे भेटतील! आम्ही गाडी बाहेर काढायला आणि पावसाला सुरुवात व्हायला एकाच गाठ पडली. आम्हाला एकदम २००७ साली NH17 वर रात्रभर पूर्ण पावसात केलेला पणजी ते माही प्रवास आठवला! संकेश्वर जवळ आम्ही पुन्हा NH4 वर आलो.

पावसाचा जोर बराच होता. उत्तूर ते संकेश्वर हायवे हे अंदाजे २०-२५ किलोमीटर चे अंतर कापायलाच आम्हाला ४० मिनिटे लागली असावीत. हा रोड स्टेट हायवे असल्यामुळे आम्ही सुरुवातीला सावधपणे गाडी चालवणे पसंत केले. अशा अंतर्गत रस्त्यांवर अचानक येणारे भलेमोठे खड्डे गाडीचे चाक पंक्चर करू शकतात आणि प्रवासाच्या सुरुवातीलाच आम्हाला पावसात भिजून चाक बदलायचे नव्हते.

NH4 वर आल्यावर सारे चित्र पालटते. राष्ट्रीय महामार्ग कसा असावा याचे अगदी समर्पक उदाहरण म्हणजे निपाणी ते बेळगाव हा रोड. रस्त्याच्या मधोमध असणारी, व्यवस्थित जोपासलेली झाडे समोरून येणाऱ्या वाहनाच्या हेडलाईट चा
जरापण त्रास होऊ देत नाहीत. आता आम्ही ९०-१०० च्या वेगाने जात होतो. पेट्रोल चा इंडिकेटर लाल रंगाच्या आसपास घुटमळत होता त्यामुळे पेट्रोल टाकणे गरजेचे होते. पुणे - कोल्हापूर रस्त्यावर ज्या संख्येने पेट्रोल पंप आहेत त्या मानाने या मार्गावर कमी पेट्रोल पंप आहेत असे कुठेतरी नेटवर वाचले होते त्यामुळे रिस्क न घेता जो पहिला पेट्रोल पंप मिळेल तेथे पेट्रोल भरावे असे ठरवले. पाऊस आतासा ओसरला होता. रस्त्याचा दुसऱ्या बाजूला अखेर एक पेट्रोल पंप दिसला, पण मी रेजीला थांब थांब म्हणेपर्यंत आम्ही १०० मीटर दूर आलो होतो. आता गाडी पाठीमागे घेऊन रस्ता क्रॉस करावा लागणार होता. रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे गाडी पाठीमागे घेणे आणि टर्न करणे दोन्ही गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात. अशावेळी दुसऱ्या वाहनांना गृहीत धरून चालत नाही. ( हे लिहित असताना मला बांद्रा - वरळी सी-लिंक वरचा अपघात आठवतोय. पहाटेच्या वेळी लान्सर गाडी यु टर्न घेत असताना होंडा अकोर्ड ने त्यांना जोरदार टक्कर दिली होती.) पेट्रोल पंपावर जोरदार हॉर्न वाजवल्यावर कुठे एकजण उगवला. सुदैवाने पेट्रोल पण उपलब्ध होते पण महाराष्ट्रापेक्षा जास्त भाव बघून आश्चर्य वाटले. काही वर्षांपूर्वी स्थिती वेगळी होती . त्यावेळी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणारी वाहने कर्नाटकात कमी दर असल्याने कर्नाटकच्या सीमाभागातल्या पेट्रोल पंपावरून टाकी फुल करून घेत असत. त्यामुळे महाराष्ट्राकडच्या पेट्रोल पंपांवर कमी उलाढाल होत होती!

आता आम्ही निश्चिंत होऊन मार्गस्थ झालो. प्रवासाची तयारी म्हणून खास गाणी इंटरनेट वरून डाउनलोड केली होती ती वाजत होती! मला झोप तर बिलकुल येत नव्हती. आता धुके पडायला सुरुवात झाली . काही काही ट्रक्स टेल लाईट शिवाय बिनधास्त चालतात.. एक तर टेल लाईटस बंद असतात किंवा त्यावर एवढा चिखल- धूळ असते कि ते चालू असले तरी दिसत नाहीत . असे ट्रक्स अशावेळी खूप डोकेदुखी ठरतात. मग अशा ट्रक्सवर नजर ठेवण्याची जबाबदारी मी घेतली. एव्हाना हुबळी-धारवाड मागे पडले होते. सावनूर, हावेरी, ब्याडगी अशी गुगल ने दिलेली गावांच्या नावांना प्रमाण मानून आमचा प्रवास चालू होता. साडेतीनच्या सुमारास वाटेत वाटेत एका पंजाबी धाब्यावर मस्त चहा मिळाला. आता लक्ष होते हरीहर बायपास! NH4 ची हालत पण आता बिघडत चालली होती. मध्ये मध्ये तर रस्ताच गायब होत होता! पहाट होत आल्याने रस्त्यावर तुरळक माणसे मिळत होती. त्यांना विचारून आम्ही बरोबर रस्त्याने जात आहोत याची खात्री करून घ्यावी लागत होती.. मागे पडलेला तो प्रशस्त रस्ता, ते साईनबोर्ड्स यांचा माग- मागुस पण नव्हता. शेवटी रेजीचा samsang star 3G मोबाईल कामी आला. त्याचा widget मध्ये गुगल मॅप पण आहे. ते चालू केल्यावर आम्ही कुठे आहोत ते मॅप मध्ये दिसत होते आणि real -time अपडेट पण मिळत होता. याचा आम्हाला पुढे खूप उपयोग होणार आहे याची खात्री तेव्हाच पटली.

महामार्ग संपला!
साडे सहाच्या सुमारास आम्ही शेवटी हरीहर बायपास पाशी पोहोचलो. आता येथून शिमोगाचा रस्ता पकडायचा होता. गुगल मॅप प्रमाणे SH25 ! दूरवर ढगांच्या आडून उगवत्या सूर्याचे लोभसवाणे दर्शन होत होते.. थोडे जवळ गेल्यावर कळले कि ते ढग नसून factory मधून निघणारा धूरहोता! चार पाच ठिकाणी विचारल्यावर शेवटी शिमोग्याला जायचा फाटा सापडला.SH25 म्हणजे राज्य मार्ग २५ च्या नावाखाली दिसणारा तो छोटासा रस्ता पाहिल्यावर मला आमच्या पुढील कठीण प्रवासाची कल्पना आली! आमचा आता पर्यंतचा प्रवास ठरलेल्या वेळापत्रकानुसार झाला होता.
सात वाजले होते. म्हणजे सहा तास रेजी गाडी चालवत होता. एव्हाना पूर्ण दिसायला लागले होते. मी पण नुसता बाजूला बसून कंटाळलो होतो. रेजी त्या मानाने एकदम उत्साहित दिसत
होता ! मी रेजीला त्याची जागा घेतो असे सांगितले तर त्यावर त्याची मिश्कील प्रतिक्रिया होती," जरा थांब, खराब रस्ता सुरु होऊदे, मग गाडी तुझ्या हातात देतो"! पण मला आता नुसते बाजूला बसणे अशक्य वाटत होते. म्हणून शेवटी त्याला मी गाडी थांबवायला लावलीच!

आला व्हील माझ्या हातात होते. रेजीने बाजूची सीट जेवढी मागे करता येईल तेवढी करून ताणून दिली! रस्ता जरी छोटा असला तरी चांगला दिसत होता त्यामुळे मी वेग पकडला होता. माझा नेहमीचा अनुभव असा की सकाळी साडे सात -आठ च्या सुमारास शाळेत जाणाऱ्या मुलांची वर्दळ चालू होते त्यावेळी गाडी फार जपून आणि हळू चाललावी लागते. त्यामुळे तो जास्तीचा वेळ आधीच भरून काढावा म्हणून मी जरा वेगातच जात होतो. पण थोड्याच वेळात रस्ता एकदम बदलला. काही ठिकाणी अनेक रस्त्यावर खड्डे तर काही ठिकाणी खड्ड्यात रस्ता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती तरी गाडीच वेग ताशी तीस च्या वर जात नव्हता. तुंगभद्रा नदीच्या खोऱ्याची जमीन असल्यामुळे आजूबाजूला शेती आणि सुपारीच्या बागा पण दिसत होत्या. शिमोगा हा मुख्यमंत्री येदुरप्पांचा जिल्हा आणि भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असावा. या जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदार भाजपा चे आहेत.
शेवटी साडे नऊ च्या दरम्यान आम्ही शिमोग्यात पोहचलो. रस्त्याला लागून जर चांगले हॉटेल दिसले तर नाश्त्यासाठी थांबायचं विचार होता पण एकही हॉटेल पसंत पडेना आणि आम्हाला मुख्य रस्ता सोडून हॉटेल शोधायची इच्छा नव्हती. अशाने वेळ वाया गेला असता. गाडीत पुन्हा एकदा पेट्रोल टाकले. इथे तर शहरातल्या रस्त्यांची पण कामे चालली होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा जवळ आला असावा बहुदा!

आता पुढील महत्वाचा दीडशे किमीचा टप्पा होता तो हासन पर्यंतचा. हासन म्हणजे आपल्या माजी पंतप्रधान श्री देवेगौडा यांचा जिल्हा! भद्रावती, अरासिकेरे, मार्गे हासनला जायचा मार्ग गुगल मॅपवर दिसत होता. पुन्हा एकदा लोकांना विचारून आम्ही खात्री करून घेतली. इथे भाषेचा प्रश्न जाणवायला लागला होता. आतापर्यंत हिंदी मधून काम चालत होते. पण आता कन्नड शिवाय कुणी बोलत नव्हते. "staright होग, staright होग" याच्या शिवाय बरेच लोक काहीच सांगत नव्हते. पुढे एखादे सर्कल असेल आणि तेथून चार - पाच रस्ते जात असल्यास त्यातील "सरळ रस्ता" कुठला समजायचा याचाच प्रश्न पडायचा. बरे सर्कल च्या मधे जाउन एखाद्याला विचारावे तर तो ही सांगे " राइट , staright होग"! या वाक्यातील "राइट" हा शब्द दिशा नसून " तुमचा रस्ता बरोबर आहे" या अर्थाने आहे हे मला एकदा रस्ता चुकल्यावर कळले!

गुगल मॅपनुसार आम्ही राष्ट्रिय महामार्ग क्रमांक २०६ वर होतो पण त्या महामार्गाची अवस्था अधेमधे सलाइन चढवलेल्या पेशंट सारखी होती! अरासिकेरे जस जसे जवळ येत होते तस तसे भूक वाढत होती. रात्री एक वाजता निघाल्यानंतर आम्ही एकेठिकाणी फ़क्त चहा घेतला होता. बोर्ड वाचून हायसे वाटते न वाटते तोच मला गाड़ीचा समतोल बिघडलेला वाटला! लगेचच मी रेजीला त्याच्या बाजुचा टायर बघायला सांगितला.. "पंक्चर"! रेजी खिड़की बाहेरचे डोके आत न घेताच ओरडला स्वतः व्हील बदलायचा दोघांचीही इच्छा नव्हती पण गरेज १ किमी वर आहे असे कळल्यावर दोघानीही कंबर कसली! डिकी मधले सामान काढायचे, जॅक लावायचा, नट काढायचे ही कामे उन्हात दोघे करत होतो! त्यात गरम झालेल्या नट बोल्ट मुऴे माझ्या एक बोटाला चांगलाच फोड़ आला! कन्नड़ मध्ये "Arasiya+Kere" म्हणजे " राजकन्येचे तळे"! राजकन्येचा कुठे माग-मागुस नव्हता आणि तळे शोधण्यात पण वेळ घालवण्याची आमची तयारी नव्हती! नंतर वाचनात आले की जवागल श्रीनाथचे गाव याच तालुक्यातील आहे म्हणे!
चाक बदलून झाल्यावर आता पंक्चर काढून घेणे गरजेचे होते. नाहीतर पुन्हा एकदा असाच प्रसंग आल्यास प्रॉब्लम झाला असता. थोड़े पुढे गेल्यावर एक रांगेत पंक्चर काढून देणारी पाच सहा दुकाने दिसली आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक दुकानासमोर दोन तीन गिर्हाईके होती! माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली की यांनीच आपला धंदा चालवा म्हणून रस्त्यावर कही गोलमाल तर नाहीना केलाय! पंक्चर काढून पुन्हा मार्गस्थ होईपर्यंत आमचा जवळ जवळ एक तास फुकट गेला होता! म्हणजे जवळ जवळ साडे तीन तासाचे अंतर कापायला आता आम्हाला साडेचार तास लागणार होते! वाया गेलेल्या वेळाच्या विचाराने आमची भूक मागे पडली आणि "आधी लगीन कोंढाण्याचे" च्या धर्तीवर आम्ही आधी हासन ला पोहचायाचे ठरवले.

अरासिकेरे सोडल्यावर दोन रस्ते मिळतात. एक हासन ला जाणारा आणि दुसरा म्हैसूर ला जाणारा. म्हैसूर रोड चांगल्या अवस्थेत दिसत होता म्हणून तिथे उभ्या असलेल्या ट्रक वाल्याला चांगल्या रस्त्याने हासन ला जाऊ शकतो का विचारले. आपल्या मोडक्या तोडक्या हिंदी मध्ये त्याने उत्साहाच्या भरात बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण आम्हाला त्या रस्त्याने जाऊ शकतो पण अंतर थोडे जास्त पडेल एवढे कळले. अंतर जास्त पडले तरी रस्ता चांगला असल्यास आम्ही ते लवकर पार करू याचा विश्वास होता. त्यामुळे आम्ही तो रस्ता पकडला. एक विचार आला की आपण प्लान बदलून म्हैसूर मार्गे जाऊ पण नंतर आम्ही आमच्या ठरलेल्या मार्गाने जायचेच ठरवले. म्हैसूर ९४ किमी असताना आम्हाला तो चांगला रोड सोडवा लागला आणि आम्ही पुन्हा अत्यंत खराब रोड वर आलो. कर्नाटक स्टेट च्या बसेस त्या खड्ड्यांमधून बोट पाण्यावर डूलावी त्याप्रमाणे गचके खात शक्य तेवढ्या वेगाने जात होत्या पण आमच्या लो बेस वाल्या झेन ला ते शक्य नव्हते. शेवटी ३० च्या स्पीड ने आम्ही हासन ला पोचलो तेव्हा अडीज वाजले होते आणि आम्हाला फ्रेश होण्याची आणि जेवणाची नितांत आवश्यकता होती.

हासन मध्ये शिरल्यावर रस्ताच्या उजवीकडे एक चांगले हॉटेल दिसले आणि आम्ही दोघांनीही एकमताने येथे थांबायचे ठरवले. गाडी पार्क केली आणि फ्रेश होऊन जेवणावर आडवा हात मारला. जेवण छान होताच पण तेरा तासापेक्षा जास्त वेळ काही खाल्ले नसल्याने जेवण अधिकच रुचकर लागत होते.त्यावेळी वेळेचा विचार आमच्या मनात फारसा नव्हता. गुगल मॅपने दाखवलेल्या वेळेपेक्षा दीड तास आम्ही जास्त घेतला होता. त्याचं कारण म्हणजे एके ठिकाणी झालेले पंक्चर आणि खराब रस्ता. जेवता असतानाच पाउस पण सुरु झाला होता!

आता पर्यंत आम्ही एकही घाट उतरला नव्हता. माही हे गांव किनारपट्टीवर वसलेले असल्याने घाट उतरावा लागणार हे निश्चित होते! नुकतेच येऊन गेलेले चक्रीवादळ, कर्नाटकात एका महिन्यापूर्वी पावसाने घातलेले थैमान यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय असणार याची कल्पना होतीच. गुगल मॅपने दाखवलेल्या रूट प्रमाणे आम्हाला हासन - अर्क्लगुड- विराजपेत- इरीट्टी- तालाशेरी- माही असा अंदाजे १५० किमी चा प्रवास अजून करायचा होता. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. आमच्या अंदाजाप्रमाणे आणखी जास्तीत जास्त चार तास लागणार होते. म्हणजे आम्ही चार वाजता हासनहून जेवण आटोपून निघालो असतो तरी आठच्या दरम्यान घरी पोचलो असतो! कुल! जेवता जेवता घरी फोन करणे झाले. त्यांनाही आम्ही सांगितले की आठ च्या आसपास आम्ही तेथे पोचतोय!

हासन हून निघालो तेव्हा चार वाजले होते आणि बऱ्यापैकी पाउस पडत होता. मी आठ तास गाडी चालवल्यानंतर आता रेजी व्हील वर होता. रस्ता छोटासाच होता आणि वाहने पण फारशी दिसत नव्हती पण गाडीचा स्पीड मात्र तीस च्या आसपास होता कारण रस्त्यांची दुरावस्था. वातावरणात गारवा होता आणि हिरवाई वारेमाप होती. मला छोटीशी डुलकी लागली आणि जाग आली ती रेजीच्या आवाजाने. तो कुणालातरी रस्ता विचारात होता. रस्तांवर कोणतेही बोर्ड्स दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही रिअल टाइममघ्ये गुगल मॅप वर रस्ता बरोबर आहे की नाही ते बघत बसलो होतो. अर्क्लगुड, पेरीयापटना, हा परिसर गेल्यावर आम्ही कर्नाटकच्या कोडागु म्हणजेच कुर्ग जिल्यात प्रवेश केला.

कुर्ग हा केरळला लागून असलेला जिल्हा कॉफी च्या मळ्यांसाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे आम्ही थोडा मूर्खपणा केला होता. शिमोगा सोडल्यावर आम्ही पेट्रोल भरले नव्हते आणि आता काटा वेगाने खाली सरकत होता. खराब रस्त्यांमुळे गाडी पहिल्या दुसऱ्या गिअर मध्ये चालवायला लागल्याचा हा परिणाम होता. संध्याकाळ झाली होती आणि जंगलाच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या मोठ्या मोठ्या झाडांमुळे जास्तच काळोख वाटत होता. वाहनेही तुरळक आढळत होती. आता लवकरात लवकर गोनिकोप्पाल गाठायला हवे होते. वाटेत पेट्रोल संपले असते तर आम्ही जंगलात काय करणार असतो कुणास ठाऊक! शेवटी जंगल संपून एक चेक पोस्ट लागले. तिथे चहाची टपरी पण होती. त्या थंड वातावणात चहा हवाच होता. मोठ्या आशेने आम्ही गाडीतून उतरून त्याच्याकडे गेलो तर महाशयांनी दुध नसल्याचे जाहीर केले. त्या वातावरणात आम्हाला तसला चहा ही चालला असता. चहा पिता पिता रेजीने त्यांच्याशी गप्पा सुरु केल्या. केरळची बोर्डर असल्याने तेथील लोकांना मल्याळम येत होते. रेजीला पण मल्याळम येत असल्याने आता संभाषण सुलभ होत होते! तेथील पोलीस पण आमच्यात सामील झाला. आम्ही त्यांना आम्हाला कुठे जायचे आहे हे सांगितले आणि आमची पेट्रोल ची समस्या सांगितली. त्यांनी आम्हाला सांगितले की सर्वात जवळचा पेट्रोल पंप २५/३० किमी दूर आहे जर आम्ही शोर्ट कट ने गेलो तर! त्यांनी कसे जायचे ते सांगितले. आणि आम्ही तेथून निघालो.

आता रस्ता एकदम जेमतेम एक गाडी जाऊ शकेल इतका छोटासा होता ( विडिओ पहा). दोन्ही बाजूला कॉफीचे मळे आणि त्यामधून जाणारा छोटासा रस्ता हे चित्र एकदम विलोभनीय होते. अधून मधून कामावरून घरी परतणारे कामगार मिळत होते त्यांच्याकडून रस्त्याची खातरजमा करून घेत होतो. शेवटी एकदाचे आम्ही गोणीकोप्पलचा पेट्रोलपंप गाठला. आता फक्त शंभर किमी जायचे आहे म्हणून आम्ही निर्धास्त होतो. त्यामुळे मी दहा लिटरच पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. बस stand च्या जवळ आम्ही तलाशेरी ला(माहेच्या जवळील शहर) जायचा रस्ता विचारला. आता केरळच्या जवळ पोचल्याने गुगल माप ने दाखवलेली पुढची शहरे न विचारता आम्ही एकदम शेवटचे ठिकाण विचारले. दोघा- तिघांकडून खात्री केल्यावर kutta - mananthavady मार्ग निश्चित केला. एव्हाना काळोख पडला होता. रस्ता अजून खराब आणि निर्मनुष्य होत चालला होता. आता दोन्ही बाजूला मोठाले वृक्ष दिसत होते आणि आजूबाजूला किर्र काळोख! मी मोबाईल स्क्रीन वर बघितले तर आम्ही नागरहोले नॅशनल पार्क च्या मार्गाने चाललो होतो! क्षणभर वाटले आता समोर हत्ती येतील आणि आम्हाला जीव मुठीत घेऊन गाडीत बसायला लागेल ! त्यात साडे आठ - नऊ वाजल्यामुळे घरून फोन येणे चालू झाले होते. आम्ही कुठे आहे हे सांगितल्यावर NH17 वरून येणे किती चांगले होते ते सांगणे सुरु झाले होते! शेवटी काळजी वाटणे साहजिकच होते.

संपूर्ण घाटरस्ता अत्यंत खराब होता. काही ठिकाणीतर थांबून विचार करावा लागत होता की गाडी कुठून काढावी! अशावेळी चाक पंक्चर करून घेणे परवडणारे नव्हते. Kutta - Mananthavady पर्यंतचा संपूर्ण प्रवास दोघांनीही डोळ्यात प्राण आणून केला! त्यातले थोडे ड्रायव्हिंग मी केले तर बरेचसे रेजीने! संपूर्ण रस्त्यावर क्वचितच वाहन दिसत होते. शेवटी दहाच्या दरम्यान आम्ही केरळमधील वायनाड जिल्ह्यातील Mananthavady ला पोचल्यावर हायसे वाटले कारण आता आम्ही तलाशेरी - बंगलोर रोडवर होतो! कन्नूर - तलाशेरी वरून बंगलोर ला जाणारे ट्रक्स आणि खाजगी बसेस याच मार्गावरून जातात. मी मुंबई सोडल्यावर २४ तास होत आले होते आणि आता टेन्शन नाहीसे झाल्याने झोप अनावर होत होती!

तासाभराने मला जाग आली तेव्हा आम्ही Kuthuparamb च्या जवळ पोचलो होतो. म्हणजे माहे पंधरा किमी होते. अर्धवट झोपेत मी रेजीला हळू चालवायला सांगत होतो. इतक्या वेळ वीस- तीस च्या वेगाने चालवल्यामुळे पन्नास-साठचा वेग मला अर्धवट झोपेत फार जास्त वाटतहोता!

शेवटी साडेअकराच्या सुमारास आम्ही घरी पोचलो! सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतेच. पुन्हा एकदा केलेल्या दूरच्या प्रवासात यशस्वी साथ दिल्याबद्दल माझ्या झेन ला thumbs up देऊन मी घरात शिरलो!