Pages

Monday, April 16, 2007

प्रत्यूष

दिवस रोज तसाच उजाडतो. प्रभाती पूर्वेचे असलेले रंग संध्येला पश्चिमेचे होतात..... उद्या पुन्हा तोच खेळ खेळ्ण्यासाठी. पण एखादी पहाट सारं आयुष्य बदलून टाकते. क्षणोक्षणी होणारी नानाविध रंगांची पखरण मन भारुन टाकते. सारी कोडी कशी पटकन उलगडतात. जगण्याचा अर्थ जाणवून देणारा हा किमयागार म्हणजेच प्रातःकाल.....ब्रम्हसमय...."प्रत्यूष"
......दिनेश गिरप

संध्याकाळचे गाणे


प्रत्येक संध्याकाळ
अशी का येते?
आपल्या भारलेल्या हातांनी
मला कवेत घेते
मी हरवतो
मी बदलतो
सारे काही गमावतो...
हताश आणि उदास असताना ती येते
निःशब्द चिंतेची भरजरी शाल लपेटून
गूढ स्मित ओठावर खेळवत
अन मी मलाच शोधतो
वाटतं,
इथेच कुठेतरी सापडेन "मी"
अस्तित्वहीन तर नक्कीच नसेन!
तीरप्या किरणांमधले धुलीकण
मला माझ्यासारखे वाटतात
दिशाहीन,
वाट चुकून भरकटलेले
वाऱ्याच्या हातातले बाहूलं बनलेले
गडद होत चाललेल्या वातावरणात
मी विरतो..
मंद वाहणारी,वाऱ्याची झुळूक सुध्दा थांबते
मी कासाविस होतो
पाणी...पाणी...पाणी
फक्त थेंबभरच हो!
घरट्याकडे परतणारे पक्षी मला हसतात
त्यांना वाटतं,
मी एक वेडा
घराकडे न परतता भटकणारा!
सावल्या दूरवर पोहचलेल्या असतात
मी मात्र असतो
आहे तिथेच
आहे तसाच...
...... दिनेश गिरप

Sunday, April 15, 2007

आठवतं...?

आठवतं...?
सुखमय पहाटवारा
ओलावता पहाटवारा
त्यात हरवून जाताना
किंचित विलगलेल्या ओठांनी
थरथरत्या गात्रांनी
फुललेल्या श्वासांनी
तुला सामावून घेतलेलं...?

आठवतं...?
आसुसलेला आवेग
तुझ्या मिटल्या डोळ्यातलं भरलेपण
पुलकित स्पर्शाचे नवखेपण
त्या उत्कट आसमंतात
तुला सामाउन घेतलेलं...?

आठवतं...?
स्व्प्नभारली मनाची खोली
ती विरलेली अगतिकता
एकबद्धतेचा अनुभव
अतीव दृढ विश्वासाने
तुला सामाउन घेतलेलं...?

माहिताय...?
त्या अभंग क्षणाला
भारलेल्या मनाची साक्ष
हरवलेल्या अस्तित्वाने
दुरस्थ एकल्या ताऱ्याने
ओघळ्त्या अश्रूत
अबोलीला सामावून घेतलेलं...!
........ दिनेश गिरप