Pages

Sunday, May 10, 2020

रमेश एम. टेक.

रमेश तामिळनाडू मधून एम.टेक. करण्यासाठी केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आला होता.त्याचे गाव पाँडेचरीच्या आसपास कुठेतरी होते. तामिळ पिक्चरचा जबरदस्त फॅन असलेला  रमेश  दिसायला आणि वागायला पण एकदम टिपिकल तामिळ सिनेमातले कॅरॅक्टर! उंच, सावळा, कपाळावरचे केस थोडेसे मागे गेलेले आणि टिपिकल रजनीकांत स्टाईल मिशा ठेवणारा. आम्ही सगळे त्याला “अण्णा” म्हणूनच हाक मारायचो! सिगारेट आणि केरळ मध्ये पॉप्युलर असलेली कळ्ळ ( माडी) चा शौकीन असलेला रमेश रंगात आला की रजनीकांत चे डायलॉग ऐकवायचा. त्यातल्या त्यात “शिवाजी” मधला रजनी त्याचा आवडता.

खरेतर त्याने  अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.टेक. केले होते. ‘अण्णा युनिव्हर्सिटी’ ही तामिळनाडू मधील एक नामवंत युनिव्हर्सिटी आहे.  बी.टेक. मध्ये सेकंड क्लास असल्यामुळे त्याने एम.टेक. करायचे ठरवले.  एम.टेक. ला एडमिशन साठी  ६० टक्के गुण असणे आवश्यक होते परंतु शासनाकडून मिळणाऱ्या सवलती मुळे त्याला त्यात  सूट मिळाली  होती.  शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मुळे त्याला सारी फी पण माफ होती.  मूळचा हुशार असणाऱ्या रमेश मध्ये बेफिकीरपणा होता. एम.टेक. करताना पण तो तेवढासा सिरीयस नव्हता. कधी कधी तो, बारावीला त्याला मॅथ्स मध्ये शंभर पैकी शंभर गुण पडले होते आणि बी.टेक. करत असताना तो बॅच मेट्स ना कसे मॅथ्स शिकवायचा याचे किस्से ऐकवायचा! तामिळनाडू मधून तो केरळ मध्ये शिकण्यासाठी आला होता खरा पण मल्याळी लोकांबद्दल त्याचे काही चांगले मत नव्हते! इथले शिक्षक मुद्दामहून आपल्या असाईनमेंट्सना कमी मार्क्स देतात ही तक्रार तो बऱ्याचदा ऐकवायचा!

“यु विल  नॉट फेस एनी प्रॉब्लेम दिनेशभाई, यु आर अ सन इन लॉ ऑफ केरला… दिज पीपल विल गिव्ह यू गुड मार्क्स!” एकदा तो मला म्हणाला होता!!

एम. टेक. चा कोर्स बऱ्यापैकी प्रॅक्टिकल वर आधारित होता. प्रत्येक विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा पण व्हायची. महाराष्ट्रात एम.टेक. च्या कोर्स मध्ये अशी प्रॅक्टिकल ची परीक्षा होताना कधी मी पाहिले नाही! तेथील प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची पद्धत इतर कॉलेजेस पेक्षा वेगळी होती. आम्हाला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन तीन चार तासांसाठी लॅब मध्ये सोडून दिले जायचे. इंटरनेट बंद केलेले असायचे आणि अधून मधून सर फक्त फेरी मारायचे. डिग्री प्रोग्रॅम ला घेतली जाते तशी कुठलाही एक्सपरिमेण्ट करून दाखवायची ती परीक्षा नव्हती!

त्या दिवशी “डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग” या विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा होती या विषयाची धास्ती सगळ्यांनीच घेतलेली असायची.  याच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार फिल्टर डिझाईन करून त्याचा कोड (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम) लिहून तो  कोड डीएसपी प्रोसेसर वर इम्प्लिमेंट करावा लागायचा आणि नंतर त्याला इनपुट सिग्नल देऊन मिळालेले आउटपुट हे दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार आहे की नाही ते दाखवावे लागायचे.  नऊ जणांच्या बॅचमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असायचे त्यामुळे कोणी कोणाची कॉपी करेल हे शक्य नसायचं आणि दिलेल्या वेळेत आपले काम पूर्ण करणे हे  ही महत्वाचे होते त्यामुळे कुणी कुणाला मदत करायच्या फंदात पडायचे नाही!

रमेश एक्झाम साठी गेल्यानंतर त्याला जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळालं तेव्हाच त्याला कळून चुकलं होतं की त्याच्याकडून हा प्रोग्रॅम लिहिणे काही होणार नाही! त्याच्या बॅचच्या  नऊ स्टुडंट्सची परीक्षा सकाळच्या सत्रात होती आणि दुपारच्या सत्रामध्ये बाकीचे नऊ स्टुडंट्स येणार होते. त्यामध्ये त्याचा रूम पार्टनर पण होता.  लॅब मध्ये कुणी सुपरवाझर नाही आहे हे बघून रमेशने त्याच्या पार्टनरला मोबाईल वरून प्रॉब्लेम स्टेटमेंट पाठवले आणि प्रोग्रॅम लिहून पाठवायला सांगितले!  इकडे रूमवर त्याचा पार्टनर दुपारी परीक्षा असल्यामुळे अभ्यासात गर्क होता रमेशला प्रोग्रॅम लिहून पाठविण्यात  त्याचा वेळ वाया जाणार होता. त्यामुळे त्याने त्याला मेसेज पाठवून दिला की त्याला काही हा प्रोग्राम लिहायला जमत नाही त्यामुळे तो पाठवत नाहीएय.

त्याचा मेसेज वाचून रमेश ची उरली सुरली आशा संपली!  रमेशने पार्टनरला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या, पण तो काहीच करू शकत नव्हता! त्याच्याकडे आता करण्यासारखं काहीच उरले नव्हते. त्या दिवशी भारताची कुठलीतरी वन डे मॅच सुरू सुरू होती. प्रोग्रॅम लिहिणे जमत नाहीएय निदान क्रिकेटचा आनंद तरी घ्यावा म्हणून रमेश क्रिकेटचा स्कोअर बघायला लागला. तो स्कोअर  बघण्यात गर्क असतानाच नेमके सर लॅब मध्ये आले. मोबाईल मध्ये डोळे घालून बसलेल्या रमेश कडे बघून त्यांनी त्याचा मोबाईल मागून घेतला.

“सार, आय एम नॉट कॉपिंग सार” रमेश त्याच्या टिपिकल तामिळ चा प्रभाव असलेल्या इंग्लिश मध्ये म्हणाला.

“आय नो, यु आर नॉट कॉपिंग बट लेट मी सी युर मोबाईल” पर्यवेक्षक म्हणाले.

“आय वोज जस्ट चेकिंग स्कोर सार” रमेश म्हणाला.

“ओके, बट गिव्ह युवर मोबाईल”

“येस सार, यु कॅन सी सार” असे म्हणून रमेश ने सरांकडे मोबाईल दिला.

मधल्या काळात इकडे हॉस्टेलवर त्याच्या पार्टनरला काय वाटले कुणास ठाऊक, आपली तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी रमेशने पाठवलेला प्रॉब्लेम सोडवला आणि आता सोडवला आहेच तर रमेश ला मेसेज  पाठवूया म्हणून त्याने तो प्रोग्रॅम रमेशला पाठवूनही दिला!

सरांनी रमेश चा मोबाईल घ्यायला आणि त्याच्या रूमपार्टनर चा मेसेज यायला एकच गाठ पडली. त्यावेळी व्हाट्सएप नव्हते. SMS वरच बोलणे व्हायचे. मोठा मेसेज असेल तर तो तुकड्या तुकड्यात येई. प्रोग्रॅम मोठा असल्यामुळे सरांच्या हातातल्या मोबाईल वरचे मेसेज थांबत नव्हते!
सरांनी शांतपणे मोबाईल रमेश च्या समोर धरून विचारले

“रमेश, व्हाट इस धिस? कुड यु एक्सप्लेन?”

ते सारे मेसेज पाहून रमेश चा चेहरा बघण्यालायक झाला होता!

त्या परीक्षेत त्याचा ‘निकाल’ लागला हे सांगायला नको. तो अर्थातच नापास झाला.  कालिकत युनिव्हर्सिटी च्या नियमाप्रमाणे कोणत्याही विषयात एकदा नापास झाले की पुढच्या प्रयत्नात कितीही मार्क्स मिळाले तरी “पास क्लास” मिळतो. त्यामुळे त्याला एम.टेक. ला पण पास क्लास वर समाधान मानावे लागले.

त्या दिवशी संध्याकाळी, ‘आधी नाही म्हणून नंतर प्रोग्रॅम का पाठवला’ या कारणावरून  त्याची आणि पार्टनर ची चांगलीच जुंपली. रमेश च्या मते सारी चूक त्याच्या रूम पार्टनर ची होती! त्याच्या मते पार्टनरने   अगोदर ‘नाही जमणार’ असा मेसेज पाठविल्यामुळेच तो बिनधास्त मोबाईल वर स्कोर बघत होता. त्याच्या मते अगोदरच जर पार्टनर ने त्याला ‘पाठवतो’ असे सांगितले असते तर तो सतर्क राहिला असता! अर्थात त्याच्या या लॉजिक ला पार्टनर कडे उत्तर नव्हते!

#करिअरसोच #careersochh

आई

"आई"

दहावी झाली आणि माझे घर सुटले. घर सोडतानाचे सारे प्रसंग काही आठवत नाहीत पण आईचे ‘भरले डोळे’ तेवढे आठवतात. ‘मुंबईतली कॉलेजे चांगली आणि बारावी केल्यावर प्रोफेशनल कॉलेजात शिकण्यासाठी जायचेच आहे तर दहावी नंतरच बाहेर जाणे चांगले’ या बाबांचे म्हणण्याला तिची मूक संमती होती किंबहुना ती गृहीत धरली गेली होती!

सहा भावंडात माझ्या आईचा तिसरा नंबर. तिला चार बहिणी आणि एक भाऊ.  वडील हेडमास्तर असल्याने सगळ्या बहिणींचे शिक्षिका बनणे साहजिकच होते. पण आई थोडीशी बंडखोर! मुंबई महापालिकेतील शिक्षिकेची नोकरी सोडून स्वतःच्या हिमतीवर नर्सिंग ला प्रवेश घेऊन शेवटच्या वर्षी पुणे विभागातील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी परिचारिका म्हणून मुख्यमंत्री पारितोषिक मिळवलेली. त्यानंतरची सारी वर्षे महाराष्ट शासनाच्या आरोग्य सेवेत सिंधुदुर्गासारख्या ग्रामिण भागात ठिकठिकाणी परिचारिका म्हणून खूप चांगले काम केलेली.

खरेतर डॉक्टर बनण्याची इच्छा असणाऱ्या आईला नर्सिंग वर समाधान बाळगावे लागले पण तिच्यातली शिकण्यातील जिज्ञासा कुणी रोखू नाही शकले. लहानपणी कपाटात ठेवलेली जाडजुड इंग्लिश मध्ये असलेली पुस्तके पाहून आईचा कोण अभिमान वाटायचा! ग्लॉसी पेपरवर भरपूर  ब्लॅक अँड व्हाईट  चित्रे असलेली फॉरेनच्या लेखकांची ती मेडिकलच्या विषयाशी संबंधित पुस्तके तिने खूप सांभाळून ठेवली होती आणि ती अधेमध्ये ती रेफर पण करायची. इंग्लिश वाचता न येण्याच्या वयात मी फक्त पाने उलटून त्यातील चित्रे पहात बसायचो!

शिस्तीची  भोक्ती असलेल्या आमच्या आईने घातलेले काही नियम एकदम काटेकोर पणे पाळणे अनिवार्य होते! संध्याकाळी बाहेरून आल्यावर हातपाय धुऊन शुभंकरोती म्हणून पूजा करणे आणि ती झाल्यावर तसेच देव्हाऱ्यासमोर उभे राहून एक ते तीस पाढे म्हणणे हा त्यापैकीचा एक नियम! त्याशिवाय जेवायलाच मिळत नसे! मी जिथे सहावीपर्यंत शिकलो ते तर एकदम खेडेगाव होते. तेथे मला गावातल्या मुलांबरोबर गावात जाऊन खेळण्यास परवानगी नव्हती. माझे मित्र घरी येऊन खेळू शकत होते किंवा हॉस्पिटल च्या आवारात खेळण्यास परवानगी होती! एकदा मी नजर चुकवून गावात खेळण्यास गेलो होतो आणि आईस जेव्हा हे कळले तेव्हा खूप माराचा प्रसाद मिळाला होता. कदाचित गावातल्या मुलांमध्ये मिसळून मी अभ्यासात दुर्लक्ष करेन अशी भीती तिला असावी. एकदा मी असाच कुठूनतरी मालवणी मधील एक शिवी शिकून तिचा प्रयोग आमच्याकडे घरकाम करणाऱ्या मावशींवर केला होता. तेव्हा मला असे काही बदडून काढले गेले होते की अजूनपर्यंत कुणालाही शिवी देण्यास जीभ रेटत नाही! इंजिनिअरिंग ला गेल्यावर  ‘कुणी कुणाला शिव्या देऊन कसे काय बोलवतात आणि ओ देणाऱ्याला त्या शिवीचे काहीच कसे वाटत नाही’ असा नॉन इंजिनिअरिंग प्रश्न मला सुरुवातीला खूप सतवायचा तो याच मुळे! मुद्दा हा की आईचा ‘छडी’ या गोष्टीवर फार विश्वास होता! छडी वापरायचा प्रसंग आला आहे की ती घराबाहेर जाऊन लिंगडीचीच्या झाडाची ‘शिरटी’ तोडून आणायची! मालवणी लोकांना ‘लिंगड’ काय असते आणि ‘लिंगडीची शिरटी’ काय कमाल करू शकते याची कल्पना असेल! त्याची धाक एवढी असायची की मी फावल्या वेळात घराच्या सभोवतालची लिंगडीची झाडी तोडून टाकत असे!!

स्वावलंबनाचे धडे आईने फार अगोदर पासून गिरवायला लावले आणि आमच्यासाठी त्यावेळी  ती गरजसुद्धा होती . बाबा फक्त आठवड्याच्या शेवटी गोव्याहून यायचे त्यामुळे आईलाच तिच्या फिरत्या (हॉस्पिटल च्या सब सेंटर ना भेटी देणे), हॉस्पिटलच्या ड्युट्या आणि आम्हाला सांभाळायचे असायचे. स्वतःचे कपडे स्वतः धुणे, विहिरीवरून पाणी आणणे, जेवण बनवणे, झाडलोट करणे, रेशन दुकानातून सामान आणणे, दळण दळून आणणे अशी कामे अगदी लहानपणापासून अंगवळणी पडतील हे तिने कटाक्षाने पाहिले त्यामुळे मुंबईला नातेवाईकांकडे रहाणे असो वा हॉस्टेल मधले वास्तव्य, कधी कुणावाचून अडले नाही. माझी बहिण पण स्वयंपाक एकदम सुंदर करते त्या याच सवयींमुळे. या लॉक डाऊन मध्ये पण घरची कामे करताना आपण  काहीतरी वेगळे करत आहोत ही भावनाच नसते. ही लाईफ स्किल्स अशीच सतत उपयोगात येतात म्हणून तर त्यांना लाईफ स्किल्स म्हणतात.

मराठी नाटकांची आईला खूप आवड. चित्रपटांपेक्षा नाटके तिला प्रिय आहेत. मी नोकरीनिमित्ताने मुंबईला आल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे तिचे येणे व्हायचे. नंतर बाबांच्या आजारपणा मुळे आणि तिलाही लांबचा प्रवास सतत करणे जमत नसल्यामुळे नंतर तिचे येणे कमी झाले. पण जेव्हा जेव्हा ती मुंबईत यायची तेव्हा तेव्हा आम्ही खूप सारी नाटके पहायचो. एकदा रविंद्र नाट्य मंदिर मध्ये होणाऱ्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा अख्खा पास आम्हाला मिळाला होता. आम्ही दोघांनी त्यातली बरीचशी नाटके पहिली. रीमा लागू, वंदना गुप्ते यांची ती विशेष चाहती. माझ्या गाण्यांच्या हौशीला देखील तीच कारणीभूत आहे. लहानपणी तिने आमच्यासाठी झोपवताना गायलेली-  ‘दैव जाणिले कुणी’, ‘लिंबोणीच्या झाडामागे’, ‘शर आला तो धावून आला काळ’, ‘देव जरी मज’ ही गाणी अजूनही कानात तशीच गुंजतात.

‘रुग्णांची शुश्रूषा’  हे जणू काही व्रत घेऊन देवाने तिला पाठविले आहे. नोकरी करत असताना तिने रुग्णसेवेला वाहून घेतले होते. ड्युटीवर नसताना सुद्धा ती किती तरी वेळ हॉस्पिटल मध्येच असायची. ती प्रसूतिगृहात किंवा ऑपरेशन साठी बरोबर  असेल तर डॉक्टर सुद्धा निर्धास्त असायचे. तिच्या वडिलांचे आजारपण, माझ्या आज्जी आजोबांचे आजारपण हे सगळे तिने एक मुलगी किंवा सून म्हणून तर सांभाळलेच पण एक परिचारिका म्हणून पण अधिकची काळजी तिने घेतली. आजोबा कित्येकदा आईच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असत त्यावेळची तिची धावपळ नजरेसमोर आहे. आज आईला निवृत्त होऊन जवळ जवळ सोळा वर्षे झाली. या सोळा वर्षात ती बाबांची सुश्रुषाच करतेय.

तीन वर्षांपूर्वी तिलाच हार्ट अटॅक आला होता त्यातून ती सावरली. “काहीही झाले तरी माझी बायपास करायची नाही” हे तिने सर्वांना निक्षून सांगितले. अंजिओग्राफी करण्यासाठी पण ती तयार नव्हती , कसे बसे मी तिला तयार केले. सुदैवाने अंजिओग्राफी मध्ये क्लॉट विरघळलेले दिसली. याचे सारे श्रेय खरेतर तिच्या अत्यंत साध्या जेवणाला दिले पाहिजे. दिवसभरात दोन चपात्या आणि अगदी थोडासा भात हा तिचा आहार गेली कित्येक वर्षे ती पाळतेय. चिकन मटण तर ती पहिल्यापासून नाही खात नंतर तिने मासे पण बंद केले. जगण्याविषयीचे तिचे विचार अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट आहेत. त्यात कुठलाही गुंता नाही. नानाविध प्रसंगातून गेल्यावर, सतत रुग्णसेवेत राहिल्यावर जो चिडचिडेपणा, निर्विकारपणा येतो तो तिच्यात आहे पण तरी देखील ती माझ्यासाठी ‘देवमाणूस’ आहे! आजच ती फोनवर कॉविड मुळे मुंबईतील बिघडणाऱ्या परिस्थितीमुळे आम्हा सगळ्यांची काळजी करत होती. फोन ठेवताना तिचे नेहमीचे “ काळजी घ्या बाबा” वाक्य नेहमी आशीर्वादासमानच भासते!

Thursday, May 07, 2020

भंडारदरा भटकंती

दुपारी जेवण करून भंडारदऱ्याची भटकंती करायला बाहेर पडलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पावसाळ्यातील हिरवळ, उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगरकड्यावरून खाली येणारे ढग असे काही नजरेस पडणार नाही हे माहित असून सुद्धा माझी सुट्टी सुरु झाल्या झाल्या आम्ही येथे आलो ते थोडा निवांत वेळ शहराच्या धकाधकी पासून दूर घालवावा म्हणून.
शेंडी, मुरशेत, उदावणे,  घाटघर, सामराद, रतनवाडी, शेंडी असा वर्तुळाकार मार्ग चार तासात फिरलो. डावीकडे धरणाचा जलाशय, उजवीकडे उंच उंच डोंगराची शिखरे, अधून मधून विखुरलेली छोटी छोटी घरे सारा निसर्ग कसा मनात साठवून ठेवण्याजोगा. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधली विविधता मोहित करून टाकते. सातारा, कास, बामणोली चा परिसरा एवढाच भंडारदऱ्याचा परिसर भव्य वाटला. चहोबाजूने डोंगर कपाऱ्याने वेढलेलीे ही अगस्ती ऋषींची भूमी तेवढीच धीरगंभीर वाटलीे. पावसाळ्यात धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि पावला पावलावर डोंगरां वरून वेगाने खाली झेपावणारे पाणी आज दिसणारे रूप पालटून टाकत असणार याची खात्री आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्यानी काळ्या डोगराच्या पार्श्वभूमीवर आपत्या पांढऱ्या रंगाच्या सोडलेल्या खुणा पाणी कोसळत असल्याचा आभास निर्माण करतात. 
फोटो काढायला चांगली जागा दिसली की माझा पाय आपोआप ब्रेक वर जातो. मी आता बाहेर जाणार हे जाणताच आमच्या छोट्या हिरोची कुरबुर सुरु होते! गळ्यात दुर्बीण, खांद्यावर लटकलेला SLR आणि हातात मोबाईल कॅमेरा अशी आयुधे सांभाळत उन्हात गाडीबाहेर येऊन, परिसर न्याहाळून व फोटो काढून  " आता इथेच राहायचंय का?" असा प्रश्न सौ विचारायच्या आत शक्य तेवढ्या लवकर परत गाडीत परत  यायला किती कसब पणाला लावावे लागते याची कल्पना सर्वानाच नाही यायची!! नाही म्हणायला आज वाटेत करवंदाची आणि जांभळाची झाडे सापडल्यावर सहपत्नीक करवंदे, जांभळे तोडण्याचा योग आला!
सांधण व्हॅली पर्यंत चालत यायला दोघेही तयार नसल्याने ती इच्छा अर्धवटच राहिली! पुन्हा पावसाळ्यात आल्यावर पाहू जमते का! हजार वर्षापूर्वीचे हेमाडपंथी बांधणीचे रतनवाडीचे  अमृतेश्वर मंदिर पाहायला मिळाले. खूप सुंदर आणि सुबक असे हे छोटेसे मंदिर. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीपाशी पोहचायला चिंचोळ्या पायऱ्या उतरून जावे लागते व दुसऱ्या बाजूने पायऱ्या चढून वर यायचे. अशी पद्धत इतर कुठल्याच शंकराच्या मंदिरात पहायला मिळाली नव्हती.आम्हाला पाहून दोन तीन छोट्या फुले विकणाऱ्या  मुली धावत आल्या. त्यांच्या कडून दहा रुपयाची ती जास्वंदीची फुले घेऊन आम्ही देवळात गेलो. आत मंदिराचे निरीक्षण करत असताना एक सुरकुुतलेल्या चेहऱ्याचे एक म्हातारबाबा तेथे आले.
"कुठून आलात, मुंबईहून का?" त्यांनी विचारले
मी हो म्हणालो.
"हे पांडवकालीन मंदिर हाय. आता आमाला आमच्या आईबाबान सांगितलं म्हणून माहिती.. त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या सांगितले" बाबांनी माहिती दिली.
त्या नंतर बराच वेळ मी कशा कशाचे फोटो घेतोय ते पहात ते बसले होते!
एवढे सारे अनुभवायला मिळाल्यावर एकाच गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. शासनाने लक्ष घातले तर इथे खूप कायापालट होऊ शकतो. रस्ता चांगला करायला हवा, पर्यटकांसाठी सुविधा हव्यात आणि मुख्यत्वे करून येथील रहिवासी जो खूपच गरीब दिसला त्याची परिस्थिती सुधारायला हवी.
#भटकंती #भंडारदरा

Tuesday, May 05, 2020

Quotes by Me

Being human is to let your relationships decide the priorities in life, unfortunately for many people it is the other way round!
© Dinesh Girap


People suffer and make others suffer because of thier own ignorance about who they really are!
© Dinesh Girap


Some people fall in love accidentally and when wounds get healed they come out of it spontaneously
© Dinesh GirapWhen you find a bigger purpose, all the worries which u thought are taking toll on your life appear so small...
© Dinesh Girap"Silence is a language of God" Some people take it so seriously that they start believing that they are "God"
© Dinesh Girap


ये यादें भी कुछ अजीब होती है.. वह हमें सिर्फ जिंदा रखती है ..'जीने' नही देती!
© दिनेश Gबरसना है तो बरसो इस बारीश की बूंदों की तरह
जो अपनी अस्तित्व की भी पर्वा नहीं करती
मिट जाती है जब मिलती है धरती से
पर अपना बरसना कभी नही भुलती
©दिनेश G

सारी उम्र बीत गयी खुशीयोंको तलाशते तलाशते, आखिर  जिंदगी ने खुद उसे कह ही दिया- " Hello...मै ही हूँ खुशी"
© दिनेश G


Friday, April 24, 2020

वेंगुर्ल्याचे घर

मी दहा बारा वर्षाचा होई पर्यंत आमचे वेंगुर्ल्याचे घर मातीचे होते. तीन खोल्यांचे छोटेसे घर. घराच्या समोर पाण्याने भरलेला आड (न बांधलेली विहीर) बाजूने वाहणारा खळाळणारा ओहोळ, त्याच्या पलिकडे असलेली एक पूर्ण प्राथमिक शाळा आणि कुलदेवतेचे मंदिर, घराच्या मागे पुढे असलेली गर्द माडाची (नारळाची) झाडे, जेमतेम शंभर दीडशे मीटर वर असलेल्या पण झाडांच्या आड लपलेल्या समुद्राच्या लाटांचा सतत येणारा आवाज अशा  पार्श्वभूमीवरचे आमचे ते छोटेसे मातीचे घर एकदम त्या काळाला साजेसे होते! माझे आजोबा मुंबईत गिरणी कामगार. गावी पाच मुलांचा सांभाळ त्या छोट्याशा घरात एकट्या आजी ने केलेला. घरची शेती अशी काही नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आढळणारी  शेतीची अवजारे किंवा धान्याच्या गोण्या वगैरे असण्याचा संबंध नव्हता.

मी या घरात फारसा राहिलो नसलो तरी आमचे म्हणजेच कुटुंबाचे ते एकमेव स्वतःच्या  मालकीचे घर होते. मी लहानपणापासून आई सोबत हॉस्पिटल क्वार्टर्स मध्ये वाढलो पण सुट्टीत ‘घरी’ जायचे म्हटले की आमच्यासाठी हे वेंगुर्ल्याचेच घर असायचे.

मंगलोरी कौलांचे  चिरेबंदी घर हे १९८६ नंतर बांधले. त्या आधीच्या घराच्या भिंती मातीच्या आणि छप्पर नळ्यांचे होते.  मे महिन्यात "नळे परतणे" हा एक मोठा कार्यक्रम असायचा. पावसाळा आला की घराच्या पावळ्या नारळाच्या झावळी पासून बांधल्या जायच्या. त्यावरून अंगणात ठिबकणारे पावसाचे पाणी अंगणात नक्षीदार छोटे छोटे खड्डे तयार करायचे. मातीच्या भिंतींना पावसाच्या माऱ्यापासून वाचविण्यासाठी विणलेल्या झावळ्यांनी शाकारलेले होते पण त्यावेळी कोकणात एवढा तुफान पाऊस पडायचा की ओल जमिनीतून वर येऊन भिंतीमध्ये चढायची. जमिनी शेणाच्या होत्या त्यामुळे नित्य नियमाने शेणाने सारवणे आले. गावात ज्यांच्याकडे  गाईगुरे होती त्यांच्याकडून शेण आणले जायचे आणि मग घर आणि खळे दोन्ही सारवले जायचे. घरात मुख्यत्वेकरून हातानेच सारवले जायचे. सारवलेली जमीन सुकत असताना आणि सुकल्यावर सुद्धा जमिनीवर बोटांची  उमटलेली अर्धगोलाकार नक्षी छान दिसायची. खळ्यातले सारवणे केरसुणी ने केलेले चालायचे. कधी कधी छोटासा भाग सारवण्यासाठी मी मागून घेऊन माझी हौस पुरी करून घ्यायचो. तसे सारवणे माझ्यासाठी नवे नव्हते. सहावी पर्यंत मी ज्या शाळेत होतो तिथे शेणाची असलेली जमीन सारवण्याचे काम आम्हा मुलांकडेच असायचे.

घराच्या छपरावर उजेड येण्यासाठी मध्येच एखादी काच असे. जमिनीवर झोपलो असताना त्या काचेतून घरात येणारे उन्हाचे कवडसे पहात रहाणे मजेशीर वाटायचे. विशेषतः जेव्हा चुलीचा धूर घरात भरून राहिला असेल तेव्हा त्या कवडशामध्ये न्हाऊन निघालेल्या हजारो कणांचे नर्तन चालू असायचे तेव्हा. घराच्या बाजूला एक 'व्हाळ' होता. म्हणजे अजूनही आहे. 'व्हाळ' म्हणजे ओहोळ. हा व्हाळ बऱ्यापैकी मोठा आहे. थोडा पुढे जाऊन तो समुद्राला मिळतो. समुद्राच्या भरती ओहोटी बरोबर त्यातल्या कमी जास्त होणाऱ्या पाण्याची पातळी पहायला मजा येई. त्यावर सुरुवातीला लाकडाचा साकव (पूल) होता. सुरुवातीला बांबूचा असणारा हा साकव नंतर लोखंडाच्या स्ट्रक्चर वर फळ्या टाकून बनवण्यात आला. फक्त माणसे आणि सायकली त्यावरून ये जा करू शकत होत्या. आम्हा मुलांना त्याच्यावरून चालताना विशेष काळजी घ्यायला लागायची कारण त्याची मधलीच एखादी फळी निघालेली असायची.  आजी सांगायची की  पूर्वी एवढा  पाऊस पडायचा की व्हाळाचे पाणी तुडुंब भरून अंगणात यायचे. त्यात कुठून कुठून साप, विंचू वगैरे प्राणी पण वाहत यायचे. त्यामुळे कधी पूर आलाच की रात्री सगळे जागेच असायचे. सुदैवाने मी कधी असा पूर आलेला पाहीला नाही. याचे एक कारण की आजोबांनी मातीचा भराव घालून जमिनीची उंची वाढविली. त्यावेळी आम्ही घरातली सर्व लहान मोठी मंडळी आपापल्या परीने समुद्रकिनाऱ्यावरून वाळू आणत असू. ओहोळाचे पात्र पण थोडे रुंद आणि खोल केले. पूर्वी पावसाळ्यात पाण्याच्या तीव्रतेमुळे घराच्या बाजूची जमिन सारखी ढासळत असे. नंतर सिमेंट आणि दगडांनी ती बाजू बांधून घेतल्यावर ढासळणे बंद झाले.

सुरुवातीला घरी लाईटची जोडणी नव्हती त्यामुळे तो कंदिलांचा आणि रॉकेल च्या दिव्याचा प्रकाश अजून स्मरणात आहे. कंदील जेवढा शांत तेवणारा तेवढाच रॉकेल चा दिवा भणभण करणारा! तिसरीत वगैरे असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नवीन पुस्तके घ्यायला आजोबांबरोबर वेंगुर्ल्याच्या बाजारात गेलो होतो. घरापासून बाजार पाच सहा किलोमीटर होता. संध्याकाळची एस टी चुकल्यावर आजोबा आणि मी चालत घरी आलो होतो. केव्हा एकदा घरी  पोहचून ती नवीन पुस्तके वाचून काढतो असे झाले होते!  मग सर्व पुस्तके वाचून होई पर्यंत रोज रात्री कंदिलाच्या उजेडात नव्या पुस्तकांचा सुवास मनात साठवुन ठेवत वाचणे व्हायचे. प्रथम मराठी, त्यानंतर इतिहास, मग भूगोल वगैरे क्रम असायचा! नंतर लाईटचा मीटर लागल्यानंतर  होते ते पिवळा प्रकाश देणारे बल्ब.

घरासमोर  विहीर होती म्हणजे अजूनही आहेच. पण आत्ता ती पूर्ण पणे बांधलेली पक्की विहीर आहे पण पूर्वी बांधलेली नव्हती. अजूनही ही विहीर गावातल्या सर्व विहिरी आटल्या तरी आटत नाही. त्याकाळी विहिरीमध्ये एक मोठा झरा होता तो सतत खूप पाझरायचा. नवीन विहीर बांधताना त्याचे पाणी तात्पुरते बंद करण्यासाठी त्यावर एक दगड ठेवला गेला. जेव्हा तो दगड हटवला तेव्हा कळले की झऱ्याने आपला मार्ग बदललाय. आजूबाजूला खणून खूप प्रयत्न केले गेले पण तो झरा पूर्वरत नाही झाला. तरी सुद्धा आजही पाणी मुबलक असते. त्यावेळी नारळाच्या झाडांना शिंपण्यासाठी या विहिरीतील पाणीच वापरले जाई. ते काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकार वापरला जाई त्याला बोलीभाषेत “लाट” म्हणत. त्यामध्ये लाटेच्या (झाडाचे सरळ लाकूड ज्याची लांबी विहिरीच्या किंवा आडाच्या दीड पट असेल) एकबाजूला उभा बांबू बांधलेला असे ज्याला पाणी भरायचा कोळंबा (भांडे) लावलेला असे आणि दुसऱ्या बाजूला काउंटर वेट म्हणून दगड बांधलेले असत. ही लाट एका टेकू वर (जमिनीत रोवलेल्या  Y आकाराच्या लाकडावर मजबूत फांदीवर) बॅलन्स केलेली असे. एका बाजूच्या दगडाच्या वजनामुळे बेचक्यातल्या लाटेचे एक टोक जमिनीवरच राहाते. पाणी काढणारा माणूस उभा बांबू हातात पकडून विहिरीवर आडव्या टाकलेल्या एका झाडाच्या बुंध्यावरून किंवा फळी वरून चालत कोळंबा पाण्याच्या दिशेने खाली खेचायचा आणि भरल्यावर दुसऱ्या बाजूला असणारे दगडाचे वजन कोळंब्याला वर उचलायचे. कोळंबा खाली खेचताना सुरुवातीला त्यावर पायाने जोर दिला जायचा. हे पाणी मग एका छोट्या हौदात ओतले जायचे जेथून सर्व झाडांपर्यंत खेळवले जायचे. हे असे पाणी काढणे सर्वानाच शक्य नाही व्हायचे. ज्यांना लाट हा प्रकार प्रत्यक्षात पहायचा आहे त्यांच्यासाठी यु ट्यूब वर त्याचा व्हिडिओ खालील लिंक वर उपलब्ध आहे.  https://youtu.be/u9Z407G4G3w

उन्हाळ्यात मुंबईकरांचे आगमन व्हायचे मग घरातली पडवी गजबजलेली असायची. आमची खेळण्याची ती हक्काची जागा होती.  पडवीत फणस कापला की आम्ही मुले त्याच्या भोवती बसून गरे खायचो. दुपारी जेवण झाल्यावर मोठी माणसे वामकुक्षीसाठी तेथेच थोडी लवंडायची! खळ्या मध्ये (अंगणात) कोकमे आणि त्याच्या बिया वाळत घातलेल्या असायच्या. बाजूला एका परातीत फणसाच्या बिया पण वाळत असायच्या, पावसाळ्यातली बेगमी म्हणून.

१९८६ साली हे मातीचे घर पाडून त्या ठिकाणी चिऱ्याचे म्हणजे जांभ्या दगडाचे घर बांधले गेले. पहिल्यांदा छप्पर उतरवले गेले. बिना छप्पराचे लक्ख प्रकाशाने भरलेले घर वेगळेच भासत होते. त्या घरात एवढा प्रकाश बघायची डोळ्यांना सवय नव्हती. हळू हळू भिंती खाली आल्या. त्याजागी नवीन वास्तू उभी राहिली पण जुनी कायमची स्मरणात राहिली. त्या वयात आणि आता सुद्धा घराच्या भपकेबाज पणाच्या कल्पना मनाला कधी शिवल्या नाहीत. गावात काही  घरे तर नारळाच्या झावळ्यांपासून बनलेली होती.  पण ते ही “घरच” वाटायचे. आज्जीच्या तोंडून त्याच घरात राहून कशा परिस्थितीत पाच मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले हे ऐकले की त्या घर म्हणजे सर्वांच्या मागे रक्षणारसाठी उभा असलेला पर्वत वाटायचा. कोकणात पाचवीला पूजलेल्या भावाभावाच्या वाटण्यांनंतर पदरी पडलेल्या जमिनीच्या तुकड्यावर आजी आजोबांनी शून्यातुन सुरुवात करून मोठ्या कष्टाने उभे केलेले ते घर होते. आजूबाजूची सारी झाडे आजीने लावून मोठी केलेली. सात जणांच्या कुटुंबाला साहजिकच अपुऱ्या पडणाऱ्या गिरणी कामगाराच्या पगाराला हातभार लावण्यासाठी प्रसंगी बाजारात जाऊन मासे आणि नारळ विकलेल्या आजीला याच घराने मोलाचे पाठबळ दिले होते. अजूनही मी जेव्हा गावी जातो तेव्हा घरासभोवतीची फार जुनी नारळाची झाडे पहातो तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात आज्जीच्या तोंडून ऐकलेल्या या गोष्टींची आठवण झाल्यावाचून रहात नाही.
- श्रीस्वासम
#आठवणी

Monday, April 20, 2020

सांगेल राख माझी – आरती प्रभू

संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी गेल्यावरी जळून.

खोटी खरी दुधाची होती कशी बिजे ती,
बरसून मेघ जाता येईल 'ते' रुजून.

रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?
वेळूत संध्यावेळी येईल ते कळून.

लागे मला कशाची केव्हा कशी तहान :
चर्चा कशास? नाव काठास की अजून.

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले?
शेल्यावरी कुणाच्या असतील स्पर्श ऊन?

का ते कशास सांगू मांडून मी दुकान?
शब्दास गंध सारे असतील की जडून.

काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र
केव्हातरी पिकून गळणे नगण्य पर्ण.

आज कशी कोणास ठावुन ही कविता कुठल्यातरी पेज वर समोर आली आणि मग आजचा सारा दिवस “आरतीमय” झाला. आरती प्रभूंचा म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकरांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ले तालुक्यातील, बागलांची राई, तेंडोली येथला. माझे दुसरे श्रद्धास्थान कविवर्य मंगेश पाडगावकरांचा जन्मही वेंगुर्ल्यातलाच पण एक वर्ष अगोदरचा. ( १२ मार्च १९२९). दुर्दैवाने आरती प्रभू वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी वारले. ते दीर्घायुषी ठरले असते तर मराठी साहित्यात आणखी कितीतरी अनमोल भर पडली असती हे नक्की.

कोकणातील माणसाचं आणि निसर्गाचं नाते अतूट आहे. कोकणातल्या मातीत घडलेल्या खानोलकरांच्या साहित्यात  अंधार, डोंगर, कडे, आकाश, फुलं, पानं, गाभारा, समुद्र, विवर, नक्षत्रं, वारा, पाषाण, पाऊस, झाडं, वेली, विविध निसर्गरंग इत्यादी शेकडो प्रतिमा ठिकठिकाणी भेटतात. खानोलकरांचं बालपण आजोळी बागलांच्या राईत, वेंगुर्ल्याला गेलं. तेथील  मठातील घंटानाद, समुद्राच्या लाटांचा गजर, वाड्यांमधील हिरवाई, खोल घळीं मधला गूढ अंधार, माणसा माणसातील नाती ,स्वभावांतील कंगोरे. हे सगळं त्यांच्या लेखनात आढळते. कोकणातील पार्श्वभूमी व तेथील प्रचलित चालीरीती, कथा यांच्या अंगाने लिखाण भेटत राहते. कोकणातल्या निसर्गाप्रमाणे संवेदनशील माणूस त्यांच्या लेखनात भेटत राहतो.

“माझ्याभोवती मला सामावून जे जग आहे, जे संगीत आहे, ज्या चवी आहेत, ज्या रंगांचा विलास आहे, जे सुगंध आहेत, जो भोग आहे आणि जो संभोगही आहे, जो माणूस आहे आणि जो निसर्ग आहे त्याच्यावर मी मनापासून प्रेम करतो. मी आहे तोवर जशी मला माझ्या शरीरमनाची जाणीव आहे तसेच मी आहे तोवर माझ्या भोवतीच्या विस्ताराला अर्थ आहे. आयुष्याचा 'हा आत्ताचा' क्षण मी ज्या ताकदीनं पाऱ्यासारखा पकडीन, लोलकासारखा पाहीन, त्या प्रमाणात माझी संवेदनाग्रहणाची शक्ती वाढणार आहे... मी आजवर खूप लिहिलं. खूप लिहिणार आहे. त्यातलं काय शिल्लक राहील ते राहील. मी त्या वेळी नसेन. पण काळ तर उदंड आहे. त्याची खोली मला जमेल तसल्या डोळ्यांनी सध्या पाहतोय. कोंडुऱ्याचा नाद कानी घेऊन, त्या गाभाऱ्याची आठवण ठेवून, त्यातल्या गारगार सुगंधाची जाणीव ठेवून चालणे सुरू आहे. ईश्वराकडे मागतोय एक चिरंजीव अशी जाणीव, माझ्या या शब्दांसाठी.” – खानोलकर.

अवघ्या शेहचाळीसाव्या वर्षी काळाने आपली झडप त्यांच्यावर घातली हे मराठी साहित्याचे दुर्दैव. पण त्या अल्पशा काळात पण जो ठेवा, जो वारसा ते आपल्यासाठी ठेवून गेलेत तो अमूल्य असा.

आरती प्रभूंवर काही वाचावे असे
http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_637.html?m=1